मंदिर जोरदार पावसामुळे पडल्याचा प्रशासनाचा दावा

नरोवाल (पाकिस्तान) – पाकच्या पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्यात असलेल्या सिराज गावात अनुमाने १०० ते १२५ वर्षे जुने हिंदु मंदिर धर्मांध मुसलमानांकडून पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हे मंदिर १ सहस्र चौरस मीटर भूमीवर बांधलेले होते. स्थानिक रहिवासी, अल्पसंख्यांक संघटना आणि एक राजकीय पक्ष यांनी आरोप केला आहे की, २१ ऑगस्ट या दिवशी काही धर्मांध मुसलमानांनी मंदिराची भूमी त्याच्या जवळच्या मदरशामध्ये समाविष्ट करता येईल म्हणून मंदिर पाडले; मात्र सरकारी अधिकार्यांचे म्हणणे आहे की, जोरदार पावसामुळे जुने मंदिर कोसळले.
१. ‘पाकिस्तान मसीहा मिल्लत पार्टी’ने पंजाब सरकारकडून कारवाई आणि मंदिराच्या पुनर्बांधणीची मागणी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष असलम परवेज सहोत्रा यांनी सांगितले की, त्यांनी पंजाबच्या अतिरिक्त गृह सचिवांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली आहे. त्यांनी आरोप केला की, मंदिराच्या शिखराची धातूची जोडणी, विटा आणि इतर साहित्यही नंतर तिथून काढून टाकण्यात आले. पंजाबमधील हिंदूंची मंदिरे, शिखांचे गुरुद्वारे आणि ख्रिस्त्यांचे चर्च यांच्या सुरक्षिततेची हमी देण्यात यावी.
२. सहोत्रा यांच्या मते, मंदिराला लागून असलेली भूमी यापूर्वी ‘इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डा’ने मदरसा बांधण्यासाठी भाडेतत्त्वावर दिली होती. अनेक वर्षे भाडे न भरल्यामुळे आणि ठरलेल्या उद्देशासाठी परिसराचा वापर न झाल्याने हा करार रहित करण्यात आला होता. त्यानंतरही काही लोकांनी मालमत्तेच्या भागांवर अतिक्रमण केले होते. आता जेव्हा अतिक्रमण हटवण्याची वेळ आली, तेव्हा ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ पक्षाने हे मंदिर पाडले आणि मदरशामध्ये समाविष्ट केले.
३. सहोत्रा यांनी सांगितले की, बोर्डाच्या सियालकोट डेप्युटी प्रशासकाने २९ जानेवारी २०२६ या दिवशी मदरशाचा भाडेकरार रहित करून अतिक्रमण करणार्यांना हटवण्याचा आणि मालमत्तेला टाळे ठोकण्याचा आदेश दिला होता. हा आदेश लागू करण्यात आला नाही.
४. हिंदु समुदायाचे नेते रतन लाल यांनी मंदिर पाडल्याची निंदा करत त्याच्या पुनर्बांधणीची मागणी केली. त्यांनी म्हटले की, जिल्हा प्रशासन आणि ‘इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड’ मंदिराच्या सुरक्षेत अपयशी ठरले. मदरशामुळे लोक आता मंदिराच्या जागी जाण्यासही घाबरतात.
५. ‘इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डा’चे वरिष्ठ अधिकारी राणा इफ्तिखार यांनी म्हटले की, १०० ते १२५ वर्षे जुने मंदिर जोरदार पावसामुळे कोसळले. मंदिराची भूमी कुणालाही भाडेकरारावर देण्यात आली नव्हती.
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या इस्लामी देशांमध्ये हिंदूंची मंदिरे पाडणे, हिंदूंना ठार मारणे, त्यांचे धर्मांतर करणे, हिंदूंच्या मुलींचे अपहरण करणे, हे नवीन राहिलेले नाही. अनेक दशके हे होत असतांना भारतातील १०० कोटी हिंदु, त्यांच्या संघटना, त्यांची सरकारे निष्क्रिय रहातात . – संपादक, हिंदू जनजागृती समिती







