हिंदूंनो, १ जानेवारीएेवजी गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करून वैचारिक आणि सांस्कृतिक धर्मांतर टाळा !

हिंदूंनो, १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करा !

३१ डिसेंबर साजरा करणे म्हणजे एका दिवसापुरते धर्मांतरच !

New_year-scr

हिंदूंनो, निदान एक दिवस तरी हिंदु म्हणून अभिमानाने जगा ! 

खरे तर ३१ डिसेंबर हा दिवस साजरा करणे, ही पाश्‍चात्त्य संस्कृतीचा एक भाग आहे; मात्र आता हिंदूंनाही हा दिवस म्हणजे भारतीय उत्सवांपैकी एक आहे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे ते हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करू लागले आहेत. या दिवशी काय काय करायचे, नवीन काय खरेदी करायचे, कोणत्या हॉटेलमध्ये जायचे, सुटीसाठी कोणत्या ठिकाणी जायचे, याची सिद्धता ते जोमाने करतात. आजही मुख्य शहरांपासून ते ज्या ठिकाणी वीज आणि पाणीसुद्धा नियमित येत नाही, अशा गावागावांमध्येही हा दिवस नियमितपणे साजरा केला जातो. पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करून आपण आपली संस्कृती तर नष्ट करतच आहोत; परंतु आपल्या भावी पिढीवरही पाश्‍चात्त्य विचारसरणीचे संस्कार करून त्यांना भोगवादी समाजाचे एक सदस्यच बनवत आहोत, याचे भान हिंदूंना राहिले नाही. याच गोष्टींचा ऊहापोह करणारा हा लेखप्रपंच.

धर्माभिमान नसलेले हिंदू !

एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केल्यानंतर ती व्यक्ती त्या धर्मातील प्रथा व उत्सव साजरा करून त्या धर्माचे आचरण करते. याचप्रमाणे आपणही जर आपल्या धर्माप्रमाणे आचरण न करता, इतर धर्मांप्रमाणे म्हणजेच ३१ डिसेंबर वा ख्रिसमस यांसारखे दिवस साजरे करायला लागलो, तर इतर धर्माप्रमाणे आचरण केल्याने एका दिवसापुरते का होईना, आपण धर्मांतरण केल्यासारखेच होईल. मात्र हिंदूंना आपला धर्म विसरून भोगवादी पाश्‍चात्त्यांचे दिवस साजरे करतांना धर्मद्रोहाचे पाप आपल्याच माथी लागत आहे, याची जाणीव नाही. आज हिंदूंमध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.

गुढीपाडवा सणापेक्षा ३१ डिसेंबरच्या रात्रीला अधिक महत्त्व देणारे जन्महिंदू !

हल्ली ३१ डिसेबरच्या रात्री लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण एकमेकांना भेट कार्डाद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून हॅपी न्यू इयर म्हणत नववर्षाच्या शुभेच्छा देत असतात. मुळात भारतीय संस्कृतीप्रमाणे गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षदिन असतांना हिंदू मात्र नववर्षदिन म्हणून ३१ डिसेबरची रात्र साजरा करण्यात धन्यता मानतात. अलीकडच्या काळात गुढीपाडवा या भारतीय वर्षारंभी एकमेकांना शुभेच्छा देणारे हिंदू बघायला मिळणे दुर्मिळ झाले आहे.

भोगवादी युवापिढीचे निद्रिस्त पालक!

हिंदु धमार्र्त सांगितल्याप्रमाणे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ब्राह्ममुहुर्तावर म्हणजेच पहाटे लवकर उठून, स्नान करून, स्वच्छ वस्त्रे व अलंकार परिधान करून, धार्मिक विधीने करतात. त्यामुळे व्यक्तीवरही त्या वातावरणातील सात्त्विकतेमुळे चांगले संस्कार होत असतात.
३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून, धांगडधिंगा करत भोगवादी वृत्तीने रात्र घालवल्याने आपल्या चित्तावर होणारे संस्कारही तसेच भोगवादाचेच होणार, तसेच रात्रीच्या वेळी वातावरणही तामसिक असल्याने आपल्यातील तमोगुण वाढणार. या गोष्टींचे ज्ञान नसल्याने म्हणजेच धर्मशिक्षणाच्या अभावामुळे या प्रकारांना बळी पडून आजची तरूण पिढी भोगवादी व चंगळवादी बनत चालली आहे आणि याबाबत कोणत्याही प्रकारची जाणीव त्यांच्या पालकांमध्येही दिसून येत नाही.

रावणरूपी पाश्‍चात्त्य संस्कृतीच आक्रमण मोडून काढून गुढीपाडव्याला नववर्षाची गुढी उभारूया !

आज हिंदु धर्मावर विविध मार्गाने आक्रमणे होत असून पाश्‍चात्त्य संस्कृतीचे आक्रमण सर्वांत मोठे आहे, हे आक्रमण मोडून काढण प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. ज्या प्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्र रावणवधानंतर अयोध्येला आले आणि तेथे गुढी उभारून विजयदिवस साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे हिंदूंनो, या रावणरूपी पाश्‍चात्त्य संस्कृतीचे आक्रमण मोडून काढून गुढीपाडव्याला नववर्षाची गुढी उभारून आपले धर्मकर्तव्य बजावा !

हिंदूंनो, पाश्‍चात्त्य संस्कृतीप्रमाणे १ जानेवारीला नव्हे, तर भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करा !

सध्या नववर्षारंभ सर्वत्रच पाश्‍चिमात्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला साजरा केला जातो. नववर्षारंभ साजरा करण्याच्या या पद्धतीस विकृत स्वरूपही प्राप्त झाले आहे. ३१ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत खार्‍या, गोड्या जेवणावळी, मद्यपान करून ध्वनीवर्धकाच्या तालावर हिडीस अंगविक्षेप करत नृत्य करणे, धिंगाणा घालणे, मारामार्‍या करणे, मद्यपान करून भरधाव वेगाने वाहने हाकणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून बाटल्या फोडणे, अश्‍लील शब्दांत बोलणे, सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे, महिलांची छेड काढणे, यांसारखे अनेक गैरप्रकारही होतात. यांमुळे नव्या वर्षाचा प्रारंभ शुभ होण्याऐवजी अशुभ पद्धतीने होते. नव्या वर्षाचा प्रारंभ मंगलदायी व्हावा, यासाठी शास्त्र समजून घेऊन भारतीय संस्कृतीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करणे हे नैसर्गिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक या सर्वच दृष्टीने श्रेयस्कर आणि फायदेशीर आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजेच सत्ययुगाला आरंभ झाला, तो गुढीपाडवा हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण केल्याने भारतीय संस्कृतीचे होणारे अध:पतन आपणच रोखणे, हे आपल्या सर्वांचेच आद्यकर्तव्य आहे. – सौजन्य : सनातन संस्था

भारतियांनो, राष्ट्रीय वर्षही गुढीपाडव्यालाच प्रारंभ होते, हे लक्षात घ्या !

१. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी सौर कालगणना सिद्ध करून घेणे

भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने मान्यवर शास्त्रज्ञ डॉ. मेघनाद सहा यांच्या अध्यक्षतेखाली कालगणना पुनर्रचना समितीने १९५६ पासून सौर कालगणना सिद्ध केली. २२ मार्च १९५७ पासून ही कालगणना आपल्या देशाची राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणून अस्तित्वात आली; पण शासकीय उदासीनतेमुळे ही दिनदर्शिका कुठेही वापरली जात नाही. ग्रेगेरियन दिनदर्शिकेचा प्रसार आक्रमकरित्या होत असल्याने ती सर्वत्र वापरली जाते.

२. चैत्र प्रतिपदेचे वैज्ञानिक महत्त्व जाणा !

ग्रेगेरियन दिनदर्शिकेप्रमाणे १ जानेवारीला वर्षाचा आरंभ होतो. वास्तविक त्या दिवशी अवकाशात कोणतीही विशेष घटना होत नसते. त्याउलट सौर वर्षाप्रमाणे नववर्ष दिन १ सौर चैत्र असतो. त्या दिवशी सूर्य विषुववृत्तावर येत असल्याने दिवस आणि रात्र दोन्ही समसमान असते. म्हणूनच या दिवसाला, म्हणजेच विषुवदिनाला वैज्ञानिक महत्त्व आहे.

३. सौर कालगणनेसाठी झटणारी मराठी विज्ञान परिषद

शास्त्रीय घटनेवर आधारित असल्याने जागतिक स्तरावर सौर दिनदर्शिकेचा वापर होण्याची तिची पात्रता आहे, असा मराठी विज्ञान परिषदेचा दावा आहे. तिच्या प्रसारासाठी प्रयत्नदेखील होत आहेत; परंतु त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ही दिनदर्शिका काळाच्या ओघात विस्मरणात जाऊ लागली आहे. सौर कालगणनेच्या वापराच्या आग्रहामुळे मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यकर्त्यांना अनेकदा न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ आली आहे. पण त्यानंतरही त्यांनी या कालगणनेचाच वापर व्हावा हा आग्रह सोडलेला नाही, हे कौतुकास्पद ! (दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २१.१२.२०१५)

 

नववर्ष गुढीपाडव्याला कसे साजरे करायचे, याविषयी जाणून घ्या !

हे लक्षात ठेवा आणि इतरांच्याही लक्षात आणून द्या !

  • ३१ डिसेंबराला रात्री नववर्षारंभ साजरा करणे, ‘पार्ट्या’ करणे इ. पाश्चात्त्य प्रथा टाळा; कारण ते वैचारिक धर्मांतरच आहे !
  • ‘१ जानेवारी’ ला नववर्षाच्या शुभेच्छा देऊ नका वा स्वीकारू नका !
  • गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करा आणि हिंदु संस्कृती जोपासा !
  • नववर्ष पाश्चात्त्यांप्रमाणे ३१ डिसेंबरच्या रात्री नव्हे, तर हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला साजरे करा !
  • हिंदूंनो, १ जानेवारीला नववर्ष साजरे करून किती काळ इंग्रजांच्या दास्यत्वात रहाणार ?
  • गुढीपाडव्याला वर्षारंभ करणे म्हणजे स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्म यांचा अभिमान बाळगणे !

३१ डिसेंबरनिमित्त पुणे येथे घेण्यात आलेली गड संरक्षण मोहीम आणि त्याविषयीची सूत्रे

श्री. सुनील घनवट

३१ डिसेंबर २०११ आणि १ जाने २०१२ या दिवशी अभिनव भारत निर्माण संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राजगड, ता. वेल्हे, जिल्हा पुणे येथे गडसंरक्षण मोहीम घेण्यात आली. ती मोहीम १०० टक्के यशस्वी झाली. समितीच्या वतीने गड संरक्षण मोहिमेचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेच्या आयोजनातील सूत्र, अडचणी, सूचना आणि करावयाचे प्रयत्न या लेखाद्वारे देत आहोत. या सूत्रांचा पन्हाळागड, सिंहगड, रायगड आदी ठिकाणी गड संरक्षण मोहीम घेण्यासाठी लाभ होऊ शकतो.

१ जानेवारीला ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्री अपप्रकार घडतात. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले गड, किल्ले यांवर अनेक हिंदू नववर्ष साजरा करण्याच्या नावाखाली मौजमजा करतात. तेथे मद्यपान करणे, सिगारेट ओढणे, गुटखा खाणे, चित्रपटातील गाणी लावून त्यावर नाचणे, पत्ते खेळणे, पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ, तसेच कचरा टाकून गडावर अस्वच्छता करणे आदी चुकीचे प्रकार चालतात. यामुळे समस्त हिंदूंचे स्फूर्तीस्थान असलेल्या गडांचे पावित्र्य नष्ट होत आहे. हे अपप्रकार रोखण्यासाठी गड-संरक्षण मोहिमेचे नियोजन करण्याबाबत सूत्रे देत आहोत.

१. मोहिमेचे नियोजन कसे करावे ?

अ. मोहीम ज्या गडावर राबवायची आहे, तो गड निश्‍चित करणे. तेथे अपप्रकार चालत असल्यास स्थानिकांकडून त्यांची वस्तूनिष्ठ माहिती मिळवावी.

आ. गडाला शहरी भागातील किती लोक नियमित आणि सुट्ट्यांच्या दिवशी भेट देतात, हेही जाणून घ्यावे. गडाला भेट देणार्‍यांची संख्या अल्प असल्यास प्रतिसाद अल्प मिळून मोहीम अयशस्वी होऊ शकते.

इ. गड संरक्षण मोहिमेच्या संदर्भात अनेकांचे सकारात्मक मत असते. त्यासाठी मोहिमेत स्थानिक गावकरी, हिंदुत्ववादी संघटना, गड-किल्ले यांसाठी कार्य करणार्‍या संघटना, धर्मशिक्षणवर्गातील मुले, प्रशासन, पोलीस यांना विश्‍वासात घेऊन सहभागी होण्यास सांगू शकतो.

२. मोहीम घेण्याचे ठरवल्यावर प्रसिद्धी आणि वातावरण निर्मिती करणे

अ. मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषद घेणे, तसेच स्थानिक वर्तमानपत्रांना प्रसिद्धीपत्रक देणे

आ. महाविद्यालयात मोहिमेच्या संदर्भात भित्तीपत्रक लावणे आणि सहभागी होण्यासाठी नावनोंदणीसाठी प्रोत्साहित करणे

इ. सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमांतून अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणात अनेकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांना सहभागी होण्याचे आवाहन करू शकतो. पुणे येथील मोहिमेत अशा प्रकारच्या प्रसाराला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

ई. गावकरी, स्थानिक संघटना यांची मोहिमेच्या १५ दिवस अगोदर १-२ वेळा बैठक घेणे आणि त्या माध्यमातून कार्यात सहभागी होण्याच्या उद्देशाने जवळीक साधणे

उ. स्थानिक पोलिसांना निवेदन देणे, तसेच त्यांना समितीच्या वतीने आयोजित मोहिमेस भेट देण्याचे निमंत्रण देणे.

ऊ. प्रायोजक मिळाल्यास होर्डिंग्ज आणि कापडी फलक लावून प्रसिद्धी करू शकतो.

३. राजगड येथे घेतलेल्या मोहिमेचे स्वरूप

अ. ही मोहीम ३१ डिसेंबर या दिवशी सकाळी ९ ते १ जानेवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत होती.

आ. गडाचे पावित्र्य राखण्यासाठी पायथ्याशी काही कार्यकर्त्यांचे पथक गडावर जाणार्‍यांची तपासणी करत होते. त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या, गुटखा, तंबाखू आदी साहित्य सापडल्यास हे पथक त्यांना रोखायचे आणि त्यांच्याकडील साहित्य त्यांना तेथेच फेकून देण्यास सांगायचे. ते या कृती करत असतांना त्यांचे छायाचित्रण करण्यात आले. यामुळे आपल्याकडे त्याचे पुरावेही राहिले.

इ. मोहिमेच्या शेवटच्या दिवशी गडाच्या पायथ्याशी रिकाम्या बाटल्यांचा खच जमा झाला होता. नंतर त्या पोत्यात भरण्यात आल्या.

४. तपासणी पथकासाठी काही सूत्रे

अ. कुणी मद्य पिऊन आल्यास त्यांना गडावर जाऊ देऊ नये. चौघांपैकी दोघे मद्य पिऊन आले असल्यास मद्यपींना गडावर जाण्याची अनुमती देऊ नये.

आ. गड पावित्र्याविषयी प्रबोधन करतांना गडप्रेमींशी नम्रपणे बोलून त्यांना मोहिमेचा उद्देश सांगावा, म्हणजे वादाचे प्रसंग टळू शकतील.

इ. तपासणीच्या वेळी कोणी धटिंगगिरी करत असल्यास किंवा वादाचा प्रसंग घडल्यास स्थानिक हिंदुत्ववादी, गावातील उत्तरदायी व्यक्ती, सरपंच यांचे साहाय्य घेऊ शकतो. या सर्वांचे दूरभाष क्रमांक सिद्ध ठेवणे. तसेच असे काही घडल्यास साहाय्य लागणार असल्याची आधीच कल्पनाही देऊन ठेवावी.

ई. कुठल्याही प्रसंगात कार्यकर्त्यांनी भावनिक स्तरावर जाऊन मारामारी करू नये. समितीच्या तत्त्वांनुसार सनदशीर मार्गानेच मोहीम राबवायची आहे, हे सूत्र लक्षात ठेवावे.

उ. पोलिसांच्या साहाय्याने तपासणी करतांना खिसे, पाकीट, पिशव्या, बूट यांची पूर्ण तपासणी करावी. या सर्व घटनांचे चित्रीकरण करून ठेवू शकतो.

ऊ. तपासणी पथकात काही मुली किंवा महिला असतील, तर त्यांची तपासणी महिलांनीच करावी. महाविद्यालयीन तरुणीही त्यांच्यासमवेत व्यसनाचे साहित्य घेऊन येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांची तपासणी करण्याचे नियोजन केवळ दिवसाच्या वेळीच करावे. पथकातील महिला कार्यकर्त्यांनी शहरात पोहोचवण्याची योग्य वाहन व्यवस्था करावी.

ए. खाण्याच्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या यांचा कचरा गडावरच न टाकता तो कचरा पेटीत टाकण्याविषयी सांगावे, अथवा परत घेऊन येण्यास सांगावे.

ऐ. गावकरी लोकांची खाण्याच्या पदार्थांची काही दुकाने गडाच्या पायथ्याशी असतात. त्यांना विक्री करण्यास मनाई करू नये; कारण ते त्यांचे उपजीविकेचे साधन असते.

ओ. गडावर पावित्र्य राखण्यासाठी कापडी फलक किंवा फळा लावू शकतो.

औ. मोहीम रात्रीही चालू असल्याने त्यासाठी कार्यकर्त्यांचे आळीपाळीने जागरणाचे नियोजन करणे.

अं. गडाला बरेच वेळा एक प्रमुख दरवाजा असतो आणि अन्य काही दरवाजेही असतात. आपले संरक्षण पथक प्रत्येक दरवाजावर ठेवणे शक्य नसते. यासाठी गडावर फिरते पथक ठेवू शकतो. त्या कार्यकर्त्यांनी अन्य दरवाज्यातून प्रवेश करून कुणी अपप्रकार करत असल्यास त्यांना थांबवावे. रात्रीच्या वेळीही असे गस्तीपथक गडावर फिरते ठेवावे.

५. क्रांतीकारकांचे प्रदर्शन आणि इतर प्रदर्शने

अ. गडावरून उतरत असतांना वाटेत किंवा गडाच्या पायथ्याशी क्रांतीकारकांचे प्रदर्शन लावू शकतो. तेथे शक्य असल्यास पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करावी. गडप्रेमींना गड उतरतांना थकवा आल्याने ते पाणी पिण्यास थांबतात.

आ. प्रदर्शनाच्या ठिकाणी मुबलक प्रकाशव्यवस्था असावी, यासाठी गावकर्‍याचे साहाय्य मागू शकतो.

इ. प्रदर्शन कक्षात जिज्ञासूंची नाव नोंदणी, जागो हिंदू लघुसंदेश पाठवण्यासाठी भ्रमणभाष क्रमांक आणि समितीची संपत्रे पाठवण्यासाठी ई-मेल नोंदणी करू शकतो.

ई. सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन आणि ग्रंथप्रदर्शन लावू शकतो.

उ. दैनिक, साप्ताहिक आणि मासिक सनातन प्रभातचे वर्गणीदार करण्यासाठी कक्ष उभारू शकतो. आलेल्या जिज्ञासूंचे अभिप्राय घेण्यासाठी अभिप्राय कक्ष आवर्जून ठेवावा. हा कक्ष आपल्याला जिज्ञासूंशी जोडून ठेवण्यास महत्त्वाचा ठरतो.

६. प्रदर्शनासंदर्भातील काही सूत्रे

अ. धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांना क्रांतीकारकांच्या प्रदर्शनाची माहिती सांगण्याची संधी देऊ शकतो. त्यातून त्यांचा सेवेचा उत्साह वाढेल. प्रथमोपचार पेटी ठेवू शकतो किंवा शक्य असल्यास प्रथमोपचार कक्ष उभारू शकतो.

आ. प्रदर्शन पहाण्यासाठी गावकरी, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना निमंत्रण देऊ शकतो.

इ. प्रदर्शनाच्या ठिकाणी श्रीकृष्णाचे चित्र ठेवावे. तेथे परिस्थितीनुसार पूजा आणि आरती करू शकतो.

ई. प्रदर्शनाच्या उद्घाटनाला स्थानिक शिवप्रेमी किंवा गावातील प्रतिष्ठित धर्माभिमान्यांना बोलावू शकतो.

उ. प्रदर्शन पहाण्यासाठी गावकरी, पोलीस, प्रशासकीय अधिकारी यांना निमंत्रण देऊ शकतो.

ऊ. सहभागी झालेल्यांशी जवळीक साधणे आणि त्यांना धर्मशिक्षण देणे – अन्य संघटनेचे कार्यकर्ते, गावकरी, समाजातील धर्माभिमानी या मोहिमेत सहभागी झालेले असतात. या मोहिमेच्या काळात आपण त्यांच्याशी जवळीक साधू शकतो, तसेच त्यांना धर्मशिक्षण अन् साधना यांची आवड असल्यास त्या संदर्भातील सूत्रे सांगू शकतो.

ए. शिवप्रेमी, हिंदु धर्माभिमानी रात्री गडावर मुक्कामाला येणार असतील, तर लॅपटॉप आणि ध्वनीक्षेपक यांच्या साहाय्याने त्यांना धर्मजागृतीपर ध्वनीचित्र-चकती दाखवू शकतो.

ऐ. परिस्थितीनुसार रात्री स्थानिक इतिहासकार आणि वक्ते यांचे मार्गदर्शन ठेवू शकतो.

ओ. काही जणांना स्वत: गड चढून जाण्याची मनीषा असते, त्यांना दिशादर्शनाचे नियोजन करू शकतो.

७. गडरक्षण मोहिमेत सहभागी होणार्‍या कार्यकर्त्यांनी समवेत ठेवायचे साहित्य

अ. मोहीम दोन किंवा अधिक दिवसांची असू शकते. यासाठी सहभागींनी आपले अंथरूण-पांघरुण समवेत आणावे.

आ. थंडीच्या दिवसात गरम कपडे, कानटोपीही समवेत आणावी.

इ. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी समितीची टोपी समवेत ठेवावी.

ई. गड चढण्यासाठी आणि स्वरक्षणासाठी समवेत काठी असावी.

उ. रात्री प्रकाशासाठी विजेरी समवेत आणावी, तसेच पिण्याच्या पाण्याची बाटली आवश्यकतेनुसार जुजबी औषधेही न्यावीत.

ऊ. कार्यकर्त्यांच्या जेवणाची व्यवस्था गावकर्‍यांच्या साहाय्याने करू शकतो किंवा कार्यकर्त्यांना एक दिवसाची शिदोरी आणि एक दिवसाचा शिधा समवेत आणण्यास सांगू शकतो. एक दिवसाचे जेवण गडावर आणलेल्या शिध्यातूनही करू शकतो. (जेवणाच्या संदर्भात स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा.)

८. आध्यात्मिक स्तरावर करावयाचे प्रयत्न

अ. मोहिमेच्या वेळी प्रत्येक अर्ध्या घंट्याने प्रार्थना करण्यासाठी आठवण करावी

आ. मोहिमेच्या माध्यमातून ईश्‍वराने धर्मसेवा करण्याची संधी दिल्याविषयी कृतज्ञता भाव मनात ठेवून प्रत्येक कृती करणे

इ. सेवेत होणार्‍या चुका सांगून एकमेकांना साहाय्य करणे

र्इ. मोहिमेनंतर त्या गावात धर्मशिक्षण वर्ग चालू करू शकतो आणि तेथील धर्माभिमान्यांना आपल्या कार्याशी जोडून घ्यावे

पुणे येथे झालेल्या गडरक्षण मोहिमेला २ सहस्रांहून अधिक गडप्रेमींनी भेट दिली आणि गावात धर्मशिक्षणवर्गाची मागणीही आली. स्थानिक गावकरी आपल्याशी चांगले जोडले गेले आहेत.

– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती भ्रमणध्वनी : ९४०४९५६५३४

गड संरक्षण मोहिमेत सहभागी होणार्‍यांसाठी आवाहन

गड संरक्षण मोहिमेचे आयोजन करतांना ३१ डिंसेबरच्या १० ते १५ दिवस आधी संरक्षण मोहिमेत सहभागी होण्यासाठी हिंदुत्वादी संघटना यांना संपर्क करावा, स्थानिक वर्तमानपत्रे, सामाजिक संकेतस्थळे यातून प्रसार करावा.​संबंधित बातम्या

तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘३१ डिसेंबर’विरोधी जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

‘३१ डिसेंबर’विरोधी जनजागृती ! समाजात जनजागृती करण्यासाठी समितीच्या वतीने तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. Read more »

राष्ट्र-धर्माच्या रक्षणासाठी प्रतिदिन एक घंटा वेळ देऊन कृतीच्या स्तरावर सिद्ध व्हा ! – कु. प्राची शिंत्रे, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना देवता, राजे, वीर योद्धे यांनी शौर्याचा इतिहास दिला आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वतःतील हिंदुत्व जागृत राखणे, हिंदुत्व जोपासणे हेच हिंदूंसाठी ‘शौर्य जागरण’ आहे. ‘३१ डिसेंबर साजरा करणे’ ही एक वैचारिक विकृती असून त्याला आपण विरोध केलाच पाहिजे. Read more »

पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन व्याख्यानातून हिंदु संस्कृतीविषयी जागृती !

३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी काय प्रयत्न करावेत ? या संदर्भात माहिती देण्यासाठी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

पुणे येथे ‘हिंदु नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करा’ या विषयीच्या हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात आलेल्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

आंबेगाव पठार (पुणे) ज्ञान प्रसारक विद्या मंदिरात मुख्याध्यापकांनी समितीच्या कार्याचे कौतुक करून केला सन्मान ! Read more »

जोगश्वरी (मुंबई) येथील शिकवणीवर्गांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

जोगश्वरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोन शिकवणीवर्गांत झालेल्या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरा करण्याचा निर्धार केला आणि ३१ डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करणे टाळले. Read more »