‘टुकडे-टुकडे गँग’पासून ‘दिमागी (वैचारिक)’ नक्षलवाद्यांपर्यंत देशविरोधी विचारसरणीचे अनेक चेहरे ! – चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक, युवा ब्रिगेड

बेंगळुरू (कर्नाटक) – एकेकाळी पशुपतीनाथपासून तिरुपतीपर्यंत ‘रेड कॉरिडॉर’मध्ये (नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेला पट्टा) पसरलेले बंदूकधारी नक्षलवादी जवळपास संपले आहेत. त्यांच्या जागी आता शहरांमधील सुशिक्षित ‘अर्बन (शहरी) नक्षली’ सिद्ध झाले आहेत. ते स्वतःच्या बुद्धीपेक्षा आंतरराष्ट्रीय कारस्थाने आणि परदेशी निधीच्या साहाय्याने काम करत आहेत. हे लोक समाजमाध्यमांच्या अल्गोरिदमचा पद्धतशीरपणे वापर करून हिंदु विचारांना दाबण्याचे आणि देशविरोधी लेखांना प्रोत्साहन देण्याचे तंत्र अवलंबत आहेत. ‘कॉकरोच जनता पक्षा’ (सीजेपी)सारख्यांच्या समाजमाध्यमांवरील अनुयायांची सूची पाहिल्यास दिमागी नक्षलवाद्यांना सहज ओळखता येऊ शकते. टुकडे-टुकडे गँगपासून (देशाचे तुकडे करू पहाणारी टोळी) दिमागी नक्षलवाद्यांपर्यंत देशविरोधी विचारसरणीचे अनेक चेहरे आहेत. म्हणून सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे, असे विधान ‘युवा ब्रिगेड’चे संस्थापक श्री. चक्रवर्ती सुलीबेले यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘सीजेपी’ आंदोलनात दिमागी नक्षलवाद ?’, या चर्चासत्रात बोलत होते.

या वेळी ‘राष्ट्र-धर्म संघटने’चे संस्थापक श्री. संतोष केचंबा आणि समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी संबोधित केले. या कार्यक्रमाला १५० हून अधिक राष्ट्र-धर्मप्रेमी उपस्थित होते.
समाजमाध्यमांमधून देशविरोधी ‘इकोसिस्टम’ निर्माण करण्याचा डाव ! – संतोष केचंबा, राष्ट्र-धर्म संघटना

संसदेच्या पावसाळी अधिवेशनासारख्या महत्त्वाच्या वेळी लोकांमध्ये गदारोळ निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमांवर कृत्रिम प्रभाव (आर्टिफिशियल ट्रेंड) निर्माण केला जात आहे. या कटाचा एक भाग म्हणून ‘कॉकरोच’सारख्या किळसवाण्या चित्रांचा आणि ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा) परीक्षेसारख्या विषयांचे केवळ निमित्त म्हणून वापर करून देशाविरोधात असंतोष पसरवला जात आहे. या संपूर्ण कारस्थानाचा मुख्य उद्देश ‘परदेशी अंशदान नियमन कायद्या’ला विरोध करणे, हा आहे. आंतरराष्ट्रीय शक्तींशी हातमिळवणी केलेले ‘आंदोलनजीवी’ आणि ‘दिमागी नक्षल’ भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत आज जागतिक मुत्सद्देगिरीत (ग्लोबल डिप्लोमसी) अग्रस्थानी असून अशा वेळी देशविरोधी ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) समजून घेऊन अन् सर्वांनी संघटित होऊन हे कटकारस्थान उधळून लावले पाहिजे.
देशावरील वैचारिक आक्रमणाच्या विरोधात संघटित व्हा ! – मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

भारतावर आज केवळ भौतिक आक्रमणेच होत नसून अत्यंत धोकादायक असलेली ‘वैचारिक’ आणि ‘अर्बन’ नक्षली यांची आक्रमणे चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेला ‘दिमागी नक्षली’ हा आज समाजात शहरी नक्षलींच्या रूपात अत्यंत धोकादायकपणे वाढत आहे. या माध्यमातून तरुणांची दिशाभूल करण्याचा कट पद्धतशीरपणे रचला जात आहे. या बौद्धिक नक्षलवादाचा सामना करण्यासाठी भक्कम असे ‘हिंदु नॅरेटिव्ह’ आणि ‘हिंदु थिंक टँक (वैचारिक गट) यांची अत्यंत आवश्यकता आहे. राष्ट्रविरोधी शक्ती एकत्र येत असतांना आज सर्व राष्ट्रप्रेमींनी संघटित होऊन भारताला हिंदु राष्ट्राच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.







