
म्हापसा – काणका, म्हापसा येथील बिलिव्हर्सच्या कार्यकर्त्यांचा धर्मांतराचा डाव ‘म्हापसा रिपोर्टर’ न्यूज पोर्टलने (वृत्त संकेतस्थळाने) ६ सप्टेंबर या दिवशी उघडकीस आणला आहे. या प्रकारामुळे बिलिव्हर्सच्या कार्यकर्त्यांनी काणका, म्हापसा येथून काढता पाय घेतला.
गोवा सरकारने बलपूर्वक, आमीष दाखवून, फसवणूक करून किंवा विवाहाच्या माध्यमातून होणार्या अवैध धर्मांतराला आळा घालण्यासाठी प्रस्तावित केलेले ‘गोवा अनधिकृत धर्मांतर प्रतिबंधक विधेयक, २०२६’ ३१ ऑगस्ट या दिवशी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्याऐवजी ते विरोधकांच्या दबावामुळे मागे घेतले आहे. या पार्श्वभूमीवर काणका, म्हापसा येथील घटना कायद्याचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. काणका, म्हापसा येथील घटनेविषयी पत्रकार गिरीश मांद्रेकर म्हणाले, ‘‘६ सप्टेंबर या दिवशी सकाळी बिलिव्हर्सच्या टोळीतील काही सदस्य काही घरांमध्ये फिरून त्यांना पत्रके वाटत होते. पत्रके वाटतांना ‘आपल्या पंथामध्ये या’, असे ते घरातील लोकांना सांगत होते. मी त्या भागातून जातांना मला संशय आल्याने याविषयी अधिक माहिती घेतली असता मला हा सर्व प्रकार समजला. या वेळी बिलिव्हर्सच्या निरनिराळ्या टोळ्या या ठिकाणी कार्यरत असल्याचे मला समजले. घरांची पूर्वी रेकी करून घरात एकटेच रहात असल्यास अशा घरांना ही टोळी लक्ष्य करत असते. या घटनेनंतर मी त्यांचा पाठलाग करून धर्मांतर करू इच्छिणार्यांना गाठले आणि त्यांना त्याविषयी विचारले. याविषयी खडसावल्यानंतर आणि ‘पोलिसांना याविषयी माहिती देतो’, असे त्यांना सांगितल्यानंतर बिलिव्हर्सचे कार्यकर्ते तेथून दुचाकीवरून पसार झाले. हे कार्यकर्ते कोकणी बोलत होते आणि ते गोव्याचेच होते. ते ‘बिलिव्हर्स’च्या माध्यमातून धर्मांतरित झाले होते असे वाटते.’’
मागील आठवड्यातच ‘व्हॉयस ऑफ गोवा’ या गोव्यातील एका न्यूज पोर्टलने अशाच प्रकारे बिलिव्हर्सच्या मेरशी येथील ‘नेपाळी चर्च’मध्ये चालू असलेल्या कारवायांवर प्रकाश टाकला होता. या घटनांमुळे गोव्यात बिलिव्हर्सच्या वाढत्या धर्मांतराच्या कारवाया पुन्हा उघडकीस येऊ लागल्या आहेत.







