Menu Close

६० वर्षे जुन्या रहित झालेल्या कागदपत्रांच्या आधारे बळकावलेली श्री भगवानपुरी संस्थानची भूमी मुक्त !

  • महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पाठपुराव्याला यश !

  • अपर जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

अमरावती – चांदूरबाजार तालुक्यातील फुबगाव येथील ‘श्री भगवानपुरी संस्थान, कुरळपूर्णा’ या नोंदणीकृत ‘सार्वजनिक धार्मिक ट्रस्ट’च्या मालकीची शेतभूमी बळकावण्याचा डाव महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या सजग आणि कायदेशीर पाठपुराव्यामुळे उधळला गेला. अपर जिल्हाधिकारी, अमरावती यांनी या प्रकरणात संस्थानच्या बाजूने निकाल देत अवैध फेरफार नोंदी रहित केल्या असून महसूल विभागाने ७/१२ उतार्‍यावर पुन्हा संस्थानचे नाव पूर्ववत नोंदवले आहे.

१. नोंदणीकृत असलेल्या संस्थानच्या मालकीची ही शेतभूमी आहे. वर्ष २०२३ मध्ये एका रहित आणि ६० वर्षे जुन्या आदेशाचा अपलाभ उठवून महसूल अधिकार्‍यांची दिशाभूल करण्यात आली. त्याआधारे फेरफार उतार्‍यावरून संस्थानचे नाव परस्पर न्यून करून कै. गुलाबराव हंबीरजी चर्जन यांच्या नावे मालकी हक्काची नोंद करण्यात आली. याविरोधात संस्थानने उपविभागीय अधिकारी, अचलपूर यांच्याकडे केलेले अपील फेटाळले गेल्याने भूमी हडपण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

२. या अन्यायाविरुद्ध संस्थानच्या विश्वस्तांनी महाराष्ट्र मंदिर महासंघाशी संपर्क साधला. महासंघाचे राज्य पदाधिकारी श्री. अनुप जयस्वाल यांनी या प्रकरणातील मूळ कागदपत्रांचा सखोल अभ्यास केल्यावर धक्कादायक वास्तव समोर आले.

३. ३१ जानेवारी १९६६ च्या ज्या आदेशाचा आधार घेऊन खरेदी प्रमाणपत्र दाखवण्यात आले होते, तो आदेशच तत्कालीन उपविभागीय अधिकार्‍यांनी ३१ ऑक्टोबर १९६८ या दिवशी रहित केला होता. १८ फेब्रुवारी १९७० या दिवशी फेरचौकशीअंती अतिरिक्त तहसीलदार तथा शेतभूमी न्यायाधिकरणाने निर्णय दिला होता की, ही भूमी नोंदणीकृत धार्मिक संस्थानची असून त्यातून मिळणारे उत्पन्न देवस्थानच्या कार्यासाठीच वापरले जाते.

४. कुळ कायद्यातील नियमानुसार अशा धार्मिक संस्थानच्या भूमींचे कुळाला सक्तीने हस्तांतर करता येत नाही. हा वर्ष १९७० चा आदेश अंतिम झालेला असतांनाही रहित कागदपत्रांच्या आधारे अवैध फेरफार नोंदी संमत करून घेण्यात आल्या होत्या.

५. हे भक्कम कायदेशीर पुरावे समोर ठेवून महासंघाच्या सहकार्याने अपर जिल्हाधिकार्‍यांच्या न्यायालयात अपील प्रविष्ट करण्यात आले. प्रकरणाची वस्तूस्थिती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे लक्षात घेऊन अपर जिल्हाधिकारी गोविंदा दाणेज यांनी संस्थानच्या बाजूने निकाल दिला. त्यांनी उपविभागीय अधिकार्‍यांचा आदेश आणि अवैध फेरफार नोंदी रहित करण्याचा आदेश दिला.

६. या आदेशानुसार महसूल विभागाने २३ जुलै २०२६ या दिवशी नवीन फेरफार नोंद संमत करून ७/१२ उतार्‍यावर ‘श्री भगवानपुरी संस्था’ची नोंद पूर्ववत अधिकृतरित्या केली.

७. या न्यायालयीन लढ्यात संस्थानच्या वतीने अध्यक्ष श्री. गजानन चिठोरे आणि सचिव श्री. अमोल वासनकर यांनी बाजू मांडली. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पाठपुराव्यामुळे मंदिराची हडपलेली कोट्यवधी रुपयांची भूमी सुरक्षित झाली असून सर्वत्र या कारवाईचे स्वागत होत आहे.

Latest News