Menu Close

अंधेरी येथे ‘सेंट अरनॉल्ड कॉलेज’मध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवकांचे प्रबोधन !

मुंबई – अंधेरी पूर्व ‘सेंट अरनॉल्ड नाईट डिग्री कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स’ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीचे श्री. राज जाधव यांनी ‘तरुण-तरुणींवर वाढत चाललेले आघात आणि कारणे’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.

या वेळी श्री. राज जाधव म्हणाले, ‘‘कायदा-सुव्यवस्था राखण्याचे दायित्व केवळ पोलीस प्रशासनावर ढकलून न देता प्रत्येक नागरिकाने स्वतः सुसंस्कृत नागरिक बनले पाहिजे. आजच्या तरुण पिढीत असंवेदनशीलता, सोशल मीडिया आणि स्मार्टफोन यांचा अनिर्बंध अन् गैरवापर, तसेच झटपट पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास वाढीस लागला आहे. या नादात तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर भरकटत चालला आहे. विचलित मानसिकतेमुळे तरुणांमध्ये अपप्रवृत्ती वाढत आहे. मुलांवर संस्कार करणे आणि त्यांना अपप्रवृत्तीपासून दूर ठेवणे, हे पालकांसाठी मोठे आव्हान आहे. युवकांची शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवणे आवश्यक आहे. यासाठी हिंदु जनजागृती समिती युवकांसाठी स्वरक्षण प्रशिक्षण विनामूल्य देते. यामध्ये अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे’’, असे आवाहन श्री. राज जाधव यांनी केले.

या वेळी दाखवण्यात आलेल्या स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांमध्ये तरुण-तरुणींचा उत्साह दिसून आला. कार्यक्रम संपल्यानंतर ४ मुलींनी स्वतःहून पुढे येऊन उपक्रम आणि मार्गदर्शन यांविषयी अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया देऊन माहिती जाणून घेतली.

Latest News