Menu Close

नवी मुंबईतील २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार

बैठकीला उपस्थित हिंदु जनजागृती समितीचे डॉ. उदय धुरी, श्री. सुनील घनवट, स्वामी अव्ययामृतानंद पुरी, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. प्रविणा पाटील

नवी मुंबई – येथील २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार नेरूळ येथील एका बैठकीत केला. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आयोजित येथील मंदिर विश्वस्त आणि प्रतिनिधी यांची बैठक माता अमृतानंदमयी मठ, ब्रह्मगिरी येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी नेरूळ येथील ‘माता अमृतानंदमयी मठा’चे मठाधिपती स्वामी अव्ययामृतानंद पुरी, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सर्वांनी संघटित व्हावे ! – स्वामी अव्ययामृतानंद पुरी 

आपल्या कार्याला अम्मांचा (माता अमृतानंदमयी यांचा) आशीर्वाद आहे. सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे. ‘संघे शक्ति कलौःयुगे ।’ या वचनानुसार जात-पात, संप्रदाय बाजूला ठेवून आपण एकत्र आले पाहिजे.

मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात असल्यासच त्यांचे सुव्यवस्थापन होईल ! – सुनील घनवट  

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आजवर १७ सहस्र मंदिरांचे संघटन करण्यात आले आहे. राज्यातील मंदिरांच्या अनेक समस्या आहेत. एकीकडे सरकारने एकही मशीद आणि चर्च कह्यात घेतले नाही, मग मंदिरेच का कह्यात घेतली जात आहेत ? मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात असल्यासच त्यांचे सुव्यवस्थापन होईल, यासाठी मंदिरांच्या विश्वस्तांनी संघटित होणे आवश्यक आहे. त्या निमित्त २२ मार्च या दिवशी महाराष्ट्र मंदिर संघाच्या वतीने सातारा येथे चौथी ‘राज्यस्तरीय मंदिर महासंघा’ची परिषद होणार आहे. याला अधिकाधिक विश्वस्तांनी उपस्थित रहावे !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी २३ आणि २४ मे या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे आयोजित ‘शंखनाद रामराज्याचा’ या महोत्सवाची माहिती सांगितली, तसेच ‘या महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे’, असे आवाहन केले.

Latest News