हिंदु विधीज्ञ परिषदेची नगर परिषदेकडे तक्रार

पुणे – येथील तळेगाव-दाभाडे रेल्वेस्थानकाच्या परिसरातील मुख्य चौकामध्ये आणि मुख्य रस्त्यावर मटणविक्रीची अवैध दुकाने थाटण्यात आली आहेत. दर्शनी भागामध्ये प्राण्यांचे देह लटकवून या दुकानांतून मांसविक्री चालू आहे. उघड्यावरील मांसविक्रीमुळे येथे अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे उल्लंघन होत आहे. असे असूनही स्थानिक प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेने याविषयी तळेगाव – दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी परिषदेने अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरि झिरवाळ यांच्याकडेही लेखी तक्रार केली आहे.
तक्रारीमध्ये म्हटले आहे की,
दुकानाच्या दर्शनी भागात उघड्यावर विक्रीसाठी मांस ठेवले जाते. त्यांवर मोठ्या प्रमाणात माशा-कीटक बसतात, तसेच रस्त्यावरील धूळ आणि जंतू जमा होतात. उघड्यावर करण्यात येणार्या या मांसविक्रीमुळे परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या विशेषत: लहान मुलांच्या आरोग्यासाठी हे धोकादायक आहे. अशा प्रकारे उघड्यावर ठेवून मांसाची विक्री करणे हे ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायद्या’नुसार, तर परवानाधारक पशूवधगृहाच्या व्यतिरिक्त इतरत्र सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची हत्या करणे ‘प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक (कत्तलखाना) नियमा’नुसार गुन्हा आहे. त्यामुळे या दुकानांची प्रशासनाने पडताळणी करावी. सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची हत्या करून मांसाची उघड्यावर विक्री करणार्या दुकानांवर तात्काळ बंदी घालावी.’’
पडताळणी करून कारवाई करू ! – दत्ताजी ढवळे, स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद
तक्रारीतील सूत्रांची पडताळणी करू. दुकाने अवैध असतील आणि त्यांमध्ये चुकीच्या प्रकारे मांसविक्री केली जात असेल, तर कारवाई केली जाईल, असे नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्ताजी ढवळे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले.
संपादकीय भूमिका
ही स्थिती नगर परिषदेला दिसत नाही का ? याकडे दुर्लक्ष करणार्यांवरही कारवाई व्हायला हवी !
संदर्भ : सनातन प्रभात







