श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणार्या भक्तांकडून प्रवेशकर वसूल करण्याचे प्रकरण
देवस्थानाशी संबंधित घोटाळ्यांची वाढत जाणारी कक्षा शासनकर्त्यांना लज्जास्पद ! प्रत्येक क्षेत्रात घोटाळा होणारा जगातील एकमेव देश भारत ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणार्या भक्तांकडून तुळजापूर शहर प्रवेशकराच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट करणारे ठेकेदार सीताराम उपाख्य राम विलास छत्रे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश धाराशीवचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. ठेकेदार छत्रे आणि त्यांचे साथीदार हे यात आरोपी असून त्यांच्यावर आर्थिक अपव्यवहार करून फसवणूक करणे आणि बळजोरीने पैसे वसूल करणे (खंडणी) या अंतर्गत गुन्हे नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धाराशीवचे उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी केलेल्या सविस्तर चौकशीच्या अहवालात अनेक गंभीर सूत्रे उपस्थित केली आहेत.
१. तुळजापूर येथे शहरात प्रवेश करणार्या प्रत्येक चारचाकी वाहनाकडून प्रवेशकराच्या नावाखाली ४० ते ५० रुपये सर्रास लुटले जात होते. हा रझाकारी पद्धतीचा कर भाविकांकडून तुळजापूर शहरातील प्रत्येक चौकात आणि प्रवेश करण्याच्या ठिकाणी गुंडगिरी करून बळजोरीने वसूल केला जात होता.
२. हे प्रकरण पत्रकारांनी उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकारसंघाच्या मीट द प्रेस या कार्यक्रमात पुराव्यांसहीत जिल्हाधिकारी गमे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. (जे पत्रकारांच्या निदर्शनास येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ? पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यावर चौकशीचे आदेश देणारे प्रशासन जनहितकारी कारभार काय करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. शहर प्रवेश कर सक्तीने वसूल केला जात असल्याचा अनुभव स्वतःलाही आल्याचे जिल्हाधिकार्यांनी या पत्रकार परिषदेत मान्य केले होते. (स्वतः अनुभव घेतल्यावरही त्वरित कारवाई न करणे म्हणजे गुन्ह्याला मूक संमती देणे नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यानंतर धाराशीवचे उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे यांना सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले होते. गिरासे यांनी केलेल्या चौकशीअंती ठेकेदार छत्रेंवर गुन्हा प्रविष्ट करण्याचे आदेश तुळजापूर मुख्याधिकारी यांना दिले असून त्याचा अनुपालन अहवाल तात्काळ सादर करण्यास जिल्हाधिकारी यांनी लेखी पत्रातून सांगितले आहे.
४. तुळजापूर येथील वाहनतळावर वाहन उभे केल्यास वाहनतळ कर घेण्याचा ठेका तुळजापूर नगर परिषदेने ठेकेदार राम छत्रे यांना लिलावाद्वारे दिला होता; मात्र वाहनशुल्क वसुलीची पावतीपुस्तके तुळजापूर मुख्याधिकारी यांच्याकडून प्रमाणित न करता वाहनशुल्काची वसुली केली जात होती. त्यामुळे ठेकेदारांचा आर्थिक अपव्यवहाराचा मानस दिसून येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
५. आजवर वाहनकराच्या फाडलेल्या सर्व पावत्या वाहनमालकाकडे दिल्याने आणि पावत्या चौकशी समितीसमोर उपलब्ध न झाल्याने पावत्यांवर वाहन क्रमांक आणि वाहनाचा प्रकार दर्शवला नाही. तसेच वाहनतळावर करवसुली करणार्या ठेकेदाराच्या कर्मचारीवर्गाकडे गणवेश आणि ओळखपत्र ठेवणे बंधनकारक असतांना ते ठेवले जात नव्हते.
६. तुळजापूर शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी वसुलीचे मोठे फलक लावले होते. तुळजापूर शहर प्रवेश कर घोटाळ्याची व्याप्ती पुष्कळ मोठी असून यात अनेक राजकीय नेते आणि शासकीय अधिकारी गुंतले असल्याची चर्चा आहे.
काय आहे घोटाळा ?
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानीमातेच्या तुळजापूर शहरात कोणत्याही वाहनाला प्रवेश करायचा असेल, तर ४० ते ५० रुपये इतका वाहन प्रवेशकर द्यावा लागत होता. तुळजापुरात येणार्या भक्तांची लूट ठेकेदार आणि नगरपरिषदेतील काही भ्रष्ट अधिकारी आणि पदाधिकारी हे संगनमताने करत होते. विशेष म्हणजे नगरपरिषदेच्या नावावर शहर प्रवेशकर आणि स्वच्छताकर असे फलक तुळजापूर शहरातील सर्व प्रवेशमार्गांवर लावले आहेत. मुळात महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात प्रवेश करायचा असेल, तर कोणताही कर आकारला जात नाही; मात्र तुळजापुरात हा कर गेल्या अनके वर्षांपासून वसूल केला जात होता. (इतकी वर्षे असा घोटाळा होऊ देणारे सर्वपक्षीय शासनकर्ते ! अशी स्थिती असेल, तर देश भ्रष्टाचारमुक्त कसा होणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात







