Menu Close

तमिळनाडू सरकार पुढील वर्षापासून नैसर्गिक जलस्रोतांमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन पूर्णतः थांबवणार

  • तमिळनाडूतील तमिळगा वेत्री कळघम् सरकारने केंद्रीय हरित लवादाला दिली हमी

  • चेन्नईतील २ समुद्रकिनार्‍यांवर पुढील वर्षापासून श्री गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी  

चेन्नई (तमिळनाडू) – येथील फोरशोअर इस्टेट आणि नीलांकराई या समुद्रकिनार्‍यांवर पुढील वर्षापासून श्री गणेशमूर्ती विसर्जनाला अनुमती दिली जाणार नाही, अशी हमी तमिळनाडूमध्ये सत्तेत असलेल्या तमिळगा वेत्री कळघम् (टिव्हीके) सरकारने राष्ट्रीय हरित लवादाला दिली आहे. तसेच वर्ष २०२७ पासून नैसर्गिक जलस्रोतांमध्ये श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. मूर्तीच्या आकारानुसार विसर्जन शुल्क आकारण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत ? याविषयीही राष्ट्रीय हरित लवादाने तमिळनाडू सरकारकडे विचारणा केली.

१. श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे जलस्रोतांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक निर्देश देण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादामध्ये सुनावणी झाली. या सुनावणीत तमिळनाडू सरकारने ही भूमिका मांडली.

२. सर्वोच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवाद यांनी दिलेले निर्देश, तसेच लागू असलेल्या नियमांचे पालन करून पुढील उपाययोजना केल्या जातील, असे सरकारने सांगितले.

३. राज्यभरात श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत, याचा तपशील सरकारकडून लवादासमोर प्रविष्ट करण्यात येणार्‍या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केला जाणार आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग आणि रसायन यांमुळे जलप्रदूषणाचा दावा

श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे नैसर्गिक जलस्रोतांवर होणार्‍या पर्यावरणीय परिणामांचे सूत्र याचिकाकर्त्यांनी लवादासमोर मांडला. प्लास्टर ऑफ पॅरिस, विविध प्रकारचे रंग, रसायने आणि इतर साहित्य पाण्यात मिसळल्यामुळे जलस्रोतांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. तसेच त्याचा जलचरांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे याचिकाकर्त्याने सांगितले. पुढील वर्षापासून सर्व समुद्रकिनार्‍यांवर श्री गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी घालण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. नैसर्गिक जलस्रोतांची हानी टाळण्यासाठी तात्पुरती कृत्रिम विसर्जन तलाव बनवण्याची सूचनाही याचिकाकर्त्याने केली आहे. त्यामुळे भाविकांना धार्मिक विधी पार पाडता येतील आणि नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषणही टाळता येईल, असा युक्तीवाद करण्यात आला.

संपादकीय भूमिका

वर्षाचे ३६५ दिवस विविध माध्यमांतून नैसर्गिक जलस्रोतांना प्रदूषित केले जात असतांना त्याविषयी कुणीही राष्ट्रीय हरित लवादाकडे जात नाही आणि तोही स्वतःहून याविषयी काही प्रयत्न करत नाही; मात्र हिंदूंचा वर्षातून येणार्‍या एका सणाविषयी मात्र हिंदूच पर्यावरणाची तथाकथित काळजी घेऊन न्यायालयात जातात आणि सरकारही मग जागे होऊन यावर निर्बंध घालते, हे हिंदूंना लज्जास्पद !

Read more on Anti Hindus

Latest News