
रत्नागिरी – जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील श्रीदेव गणपति मंदिरात येत्या १ जानेवारी २०२७ पासून भाविकांसाठी वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) सक्तीची केली जाणार आहे. मंदिराचे पावित्र्य, परंपरा आणि संस्कृती जपण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ‘संस्थान श्रीदेव गणपतीपुळे’ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नीलेश कोल्हटकर यांनी दिली.
अध्यक्ष श्री. कोल्हटकर म्हणाले की,
१. गेल्या वर्षीच मंदिरात या वस्त्रसंहितेची प्राथमिक स्वरूपात कार्यवाही चालू करण्यात आली होती. त्या वेळी काही भाविकांनी माहिती नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती. भाविकांची ही अडचण लक्षात घेऊन आणि त्यांच्यात गैरसमज राहू नयेत; म्हणून गेल्या काही महिन्यांपासून जनजागृती मोहीम राबवण्यात येत होती. आता या मोहिमेनंतर येत्या १ जानेवारी २०२७ पासून नियमांची काटेकोर कार्यवाही केली जाईल.
२. नवीन नियमावलीनुसार मंदिरात येतांना गुडघ्यापेक्षा वर असणारे तोकडे कपडे, शॉर्ट्स किंवा स्कर्ट घालून येणार्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. हा नियम महिला आणि पुरुष या दोघांनाही समान रितीने लागू असेल. १० वर्षांखालील लहान मुलांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. गुडघ्याखाली येणारे स्कर्ट अथवा शॉर्ट्स परिधान केलेल्या भाविकांना दर्शनापासून रोखले जाणार नाही.
३. लहान मुलांनी तोकडे कपडे घातल्यास ते अयोग्य वाटत नाही; मात्र सज्ञान व्यक्तींनी मंदिरात असे कपडे घालून येणे शोभनीय दिसत नाही. मंदिराचे पावित्र्य आणि आपली प्राचीन संस्कृती-परंपरा राखणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याने भाविकांनी मंदिरात प्रवेश करतांना योग्य वेशभूषा करावी अन् सहकार्य करावे.
४. गणपतीपुळे येथे प्रतिवर्षी साधारण २५ लाख भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरात प्रतिदिन सरासरी १ सहस्र भाविक उपस्थित असतात, तर संकष्टी आणि विनायकी चतुर्थीच्या दिवशी हा आकडा पाच पटींनी वाढतो. दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानाच्या वतीने अन्नछत्र आणि निवासव्यवस्था यांची पुरेशी सोय उपलब्ध करण्यात आली आहे.







