हिंदुत्वनिष्ठ आमदार राजासिंह ठाकूर यांच्या चेतावणीचा परिणाम !
स्वपक्षातील कार्यकर्त्यांच्या हत्यांना उत्तरदायी असणार्या माकपला विरोध करणारे भाजपमधील एकमेव आमदार राजासिंह ठाकूर यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

भाग्यनगर : येत्या १९ मार्च या दिवशी निझाम महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित केलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सभेला पोलिसांनी अनुमती नाकारली आहे. या सभेला केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन् संबोधित करणार होते. सभेचा भाग गोशामहाल मतदारसंघात येत असल्याने या भागाचे भाजपचे आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांनी या सभेला विरोध केला होता. ‘ज्या केरळ राज्यात भाजप आणि संघ यांच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठांंच्या हत्या होत आहेत, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती माझ्या मतदारसंघात सहन केली जाणार नाही’, अशी चेतावणी श्री. ठाकूर यांनी दिली होती. ‘त्यासाठी कुठल्याही स्तराला जाण्याची आमची सिद्धता आहे’, असे त्यांनी म्हटले होते.
श्री. ठाकूर यांनी पोलीस महासंचालक अनुराग शर्मा यांना पत्र लिहून त्यांच्या मागण्या कळवल्या होत्या. श्री. ठाकूर यांचा माकपच्या सभेला विरोध नव्हता; मात्र त्यात केरळच्या मुख्यमंत्र्यांना बोलू देण्यास त्यांचा विरोध होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


