
पुणे – गणेशोत्सवातील ‘डीजे’ आणि ध्वनीप्रदूषण यांचा विषय सध्या बराच चर्चेत आहे. हिंदु जनजागृती समिती गेल्या २४ वर्षांपासून ‘उत्सवांमध्ये डीजे किंवा कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावू नका’, याविषयी प्रबोधन करत आहे. ‘उत्सवांतील अपप्रकार रोखा’ अशी व्यापक प्रबोधनपर मोहीमही राबवत आहे.
अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी काही वर्षांपूर्वी जसे ‘श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते’, असा प्रचार करत खोटे कथानक (नॅरेटिव्ह) पसरवले होते, तसे वर्षातील ३६५ दिवस नदी प्रदूषित होण्याला ज्या गंभीर गोष्टी कारणीभूत आहेत, त्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून केवळ गणेशोत्सवातील १० दिवसांत प्रदूषण होत असल्याचे कारण पुढे करून श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम हौद बांधण्याची टूम चालू झाली. त्याच प्रकारे आता ध्वनीप्रदूषणाची टूम आली आहे.
‘डीजे’मुळे गणेशोत्सवात होणारे ध्वनीप्रदूषण थांबायला हवे; पण वर्षभर ध्वनीप्रदूषण करणार्या अन्य कारणांचा आपण विचार करणार आहोत कि नाही ? विद्यानंद बापट आणि पुरोगामी टोळी ‘ध्वनीप्रदूषण करणारे मशिदींवरील भोंगे उतरवा, ३१ डिसेंबरच्या रात्रीचे कार्यक्रम, तसेच ‘सनबर्न’सारखे मोठे संगीत कार्यक्रम थांबवा’, या मागण्यासुद्धा करतील का ?
केवळ गणेशोत्सवाला लक्ष्य करून हिंदु धर्मातील ‘द्वैत-अद्वैत तत्त्वज्ञाना’ला ‘बौद्धिक हस्तमैथुन’ म्हणणे, सण-उत्सवांना ‘लष्करे-उत्सव’ म्हणणे, ही ध्वनीप्रदूषणाच्या सूत्राच्या आडून धर्मावर आघात करणारी तथाकथित पुरोगामी मानसिकता दिसून येते, याचा आम्ही निषेध करतो.
भारतात राज्यघटनेचे राज्य आहे. त्यामुळे ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार अवश्य कारवाई व्हावी; मात्र ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्मावर टीका करणार्यांवरही कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी’, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली.
श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की,

१. हिंदु जनजागृती समिती उत्सवाचे पावित्र्यरक्षण आणि धार्मिकता जपण्यासाठी मंडपांमध्ये जुगार खेळणे, दारू पिणे, दारूच्या नशेत अंगविक्षेप करत नृत्य करणे, श्री गणेशूर्तीच्या मंडपासमोर अश्लील गाणी लावणे, मंडपासमोर मद्यपान-धूम्रपान करणे, सक्तीने वर्गणी मागणे आदी अपप्रकारांच्या विरोधात २ दशकांपासून जनजागृती करत आहे. त्यामुळे ‘डीजे विरोध’ एवढीच आमची भूमिका नसून ‘आदर्श आणि सात्त्विक सार्वजनिक उत्सव’ ही आमची व्यापक भूमिका आहे.
२. गणेशोत्सव धर्माचरण, संस्कृतीचे संवर्धन, राष्ट्रभक्ती, समाजप्रबोधन आणि समाजोपयोगी उपक्रम यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या दृष्टीने त्याकडे पहायला हवे.







