मंदिर महासंघ आणि वारकरी संघटनांच्या याचिकेवर ऐतिहासिक निकाल

पंढरपूर : कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूर येथील दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तात्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत, न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे लेपन करण्यास मनाई केली आहे.
वारकरी संप्रदाय, श्री. बाळकृष्ण डिंगरे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. पुरुषोत्तम (गणेश) लंके यांनी पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती सोनाली राऊळ यांच्या न्यायालयात हा दावा दाखल केला होता. या प्रकरणी याचिकाकर्त्यांच्या वतीने अधिवक्ता सुधीर रानडे यांनी भक्कम युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मंदिर समितीला वज्रलेप न करण्याविषयी सक्त ताकीद दिली आहे.
🚩 विजय!
⚖️ पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!🛕वारकरी संघटना व @mandirmahasangh च्या याचिकेला मोठे यश!
मूर्तीचे पावित्र्य, परंपरा आणि धर्मशास्त्रीय तत्त्वे जपण्यासाठी घेतलेल्या भूमिकेला न्यायालयाची मान्यता pic.twitter.com/mQIZjUpL0c
— Mandir Mahasangh (@mandirmahasangh) June 22, 2026
न्यायालयात मांडण्यात आलेले महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये हिंदु धर्मशास्त्रानुसार मूर्ती ही केवळ दगडी किंवा पाषाण शिल्प नसून त्यात साक्षात देवत्व (प्राण) असते. काकड आरतीपासून ते नैवेद्यापर्यंत सर्व कृती याच भावनेतून केल्या जातात. मंदिर समिती केवळ ‘दगडाची मूर्ती’ समजून कृत्रिम आणि अपवित्र रासायनिक पदार्थांचा (उदा. इपॉक्सी) वापर करत आहे, ज्यामुळे मूर्तीचे देवत्व नष्ट होऊ शकते. आतापर्यंत ४ वेळा रासायनिक लेपन करूनही त्याचा फोलपणा सिद्ध झाला आहे. कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊन मूर्ती आतून अधिक ठिसूळ होण्याचा मोठा धोका आहे.
Jai Shri Vitthal! Jai Shri Rukmini! धर्मजय!
The Ld.Joint Civil Judge, Pandharpur has passed a Temporary Injunction staying the proposed chemical (epoxy) coating on the sacred Swayambhu Shri Vitthal-Rukmini idols, which was scheduled to be undertaken on 23rd and 24th June 2026.… pic.twitter.com/2abcv8769J
— Amita Sachdeva, Advocate (@SachdevaAmita) June 23, 2026
’महाकालेश्वर मंदिर’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा न्यायालयात संदर्भ देण्यात आला. यानुसार भक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही निर्णय प्रशासनाला घेता येणार नाहीत. करवीर पीठाच्या जगद्गुरु शंकराचार्यांनी या रासायनिक लेपनास स्पष्ट विरोध करणारे पत्र दिले असून, न्यायालयाने त्याचीही नोंद घेतली आहे.
या निर्णयावर समाधान व्यक्त करताना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, तब्बल २८ युगे विटेवर सुखरूप उभा असणाऱ्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाला कोरोना टाळेबंदीच्या काळात खड्डा कसा पडला आणि श्री रुक्मिणीमातेचे पाय का खराब झाले? याचे कोणतेही शास्त्रीय उत्तर अद्याप मंदिर समिती किंवा पुरातत्त्व विभागाला देता आलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केवळ मते नोंदवली गेली; मात्र कोणती रसायने वापरणार आणि संवर्धन कसे करणार याची कोणतीही स्पष्ट माहिती प्रशासनाने दिली नाही. अचानक पत्रक काढून मंदिर बंद ठेवत वज्रलेपाचा निर्णय जाहीर केल्याने भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. मूर्ती संवर्धनासाठी ‘आयुर्वेदिक वज्रलेप’ हा अधिक सुरक्षित आणि परंपरेस अनुरूप असल्याचे आम्ही न्यायालयात सप्रमाण मांडले आहे. यापुढील काळात तरी मंदिर समिती वारकरी, धर्माचार्य, संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या भावनांचा आदर करेल, अशी आम्हाला आशा आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला हानी पोहोचल्यास मंदिरे समिती व पुरातत्त्व विभागावर फौजदारी खटला दाखल करू !
-
मंदिर महासंघ व वारकरी संघटना यांचा इशारा !
-
मूर्तीला जबरदस्तीने रासायनिक लेपन करत असल्याचे प्रकरण !

पंढरपूर – पंढरपूर येथील कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर पुरातत्त्व विभागाद्वारे २३-२४ जून रोजी नियोजित असलेल्या रासायनिक वज्रलेपन प्रक्रियेला (Epoxy/Silicon) वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने कडाडून विरोध केला आहे. कोरोना काळात केलेले लेपन पुढील १० वर्षे टिकेल असा दावा प्रशासनाने केला होता; मात्र अवघ्या ४-५ वर्षांतच मूर्तीला पुन्हा लेपनाची आवश्यकता भासणे हे या रासायनिक प्रक्रियेचे अपयश सिद्ध करते. तब्बल २८ युगे विटेवर सुखरूप उभा असणार्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाला कोरोना टाळेबंदीच्या काळात खड्डा कसा पडला आणि श्री रुक्मिणीमातेचे पाय का खराब झाले, याचे कोणतेही शास्रीय उत्तर अद्याप मंदिर समिती किंवा पुरातत्त्व विभागाला देता आलेले नाही. कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊन मूर्ती आतून ठिसूळ होण्याचा गंभीर धोका असल्याने, वारकरी संत-महंत आणि मूर्तीशास्रज्ञांना विश्वासात न घेता प्रशासनाने एकतर्फी पाऊल उचलल्यास संपूर्ण महाराष्ट्रात जनक्षोभ निर्माण होईल. इतके झाल्यावरही रासायनिक लेपन प्रक्रिया लादण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्व विभाग यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिला पत्रकार परिषदेत दिला आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व मंदिरे समिती यांना सादर करण्यात आले आहे.
या प्रसंगी वारकरी पाईक संघाचे ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित, हिंदुराष्ट्र समन्वय समितीचे जिल्हा संयोजक श्री. चंद्रकांत रमणशेट्टी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. विनोद रसाळ आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे उपस्थित होते.
१० वर्षांपूर्वी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीला सेंद्रीय लेपन प्रक्रिया वापरून वज्रलेप, तर पंढरपूर येथील मूर्तीला रासायनिक लेपनाचा अट्टाहास का ?
१० वर्षांपूर्वी जेव्हा कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीला केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी एम्.आर्. सिंह यांनी २२ जुलै ते ६ ऑगस्ट २०१५ या कालावधीत वज्रलेप केला होता. त्या वेळी श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती ज्या पाषाणात घडवली होती त्या पाषाणाची भुकटी यांचे विशिष्ट प्रमाणातील मिश्रण मूर्तीमध्ये सोडण्यात आले होते. या प्रक्रियेत मूर्तीवर बेहडा, दुर्वा यांचा अर्क आणि बिब्ब्याचे तेल वापरून सेंद्रीय मिश्रणाचा वापर करण्यात आला होता. त्या काळी जर श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीला सेंद्रीय लेपन प्रक्रिया वापरून वज्रलेप करण्यात आला होता, तर आता पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला रासायनिक लेपनाचा अट्टाहास का ? त्या वेळी करण्यात आलेली कृती जर योग्य असेल, तर आताची कृती अयोग्य आहे, असेच म्हणावे लागेल. अत्यल्प निधीमध्ये होणार्या सेंद्रीय लेपनाऐवजी खर्चित रासायनिक आणि अशास्रीय लेपनाचा आग्रह धरून पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वहाणे यांना काय साध्य करायचे आहे ? यातून खर्च पडणारा अधिक निधी यांसाठीच तर हे षडयंच रचले जात नाही ना ? अशी शंका घेण्यास निश्चित इथे वाव आहे !
मूर्तीला रासायनिक लेपन करणे चुकीचे ! – श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठ, करवीर
या संदर्भात करवीर पीठाचे श्री स्वामी जगद्गुरु शंकराचार्य यांचे मत विचारले असता त्यांनी, ‘‘यथा देहे तथा देवे’ या उक्तीनुसार रासायनिक वज्रलेप केल्यास या पद्धतीने कोणतेही रसायन आपल्या शरीराचा दाह करते, तसेच त्या मूर्तीचा दाह होता. त्यामुळे ‘रासायनिक वज्रलेप करू नये’, असे आमचे स्पष्ट मत आहे.’’ असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. त्यामुळे शंकराचार्य यांच्यासारख्या आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीपेक्षा पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांना अधिक कळते का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
वारकरी पाईक संघाचे ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत मूर्तीवर ४ ते ५ वेळा रासायनिक प्रयोग करण्यात आले आहेत, ज्याचा परिणाम म्हणून मूर्तीची हानी होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे मूर्तीचे अतोनात नुकसान झाले होते, हा इतिहास डोळ्यांसमोर असताना पंढरपुरात पुन्हा तीच चूक केली जात आहे. कोणत्याही शास्त्रीय प्रक्रियेपूर्वी याचे दिवाणी व फौजदारी उत्तरदायित्व(Legal Liability) निश्चित होणे आवश्यक आहे; त्यामुळे या प्रक्रियेत विठ्ठल किंवा रुक्मिणीमातेच्या मूर्तीला कोणतीही हानी पोहोचल्यास संबंधित अधिकारी आणि मंदिर समितीवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी वारकरी व हिंदु संघटना न्यायालयात धाव घेतील.’’
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी धर्मशास्त्रानुसार लेपनच आवश्यक – महाराष्ट्र मंदिर महासंघ
रासायनिक लेपनाला विरोध

सोलापुर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलमूर्तीची झीज रोखण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून पुन्हा एकदा रासायनिक लेपन किंवा स्टोन पावडर पद्धतीचा घाट घातला जात आहे. यापूर्वी कोरोना काळात केलेले रासायनिक लेपन ८ ते १० वर्षे टिकेल असा दावा करण्यात आला होता, मात्र अवघ्या ४-५ वर्षांतच मूर्तीला पुन्हा लेपनाची आवश्यकता भासल्याने ही प्रक्रिया सदोष असल्याचे सिद्ध झाले आहे. कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊन मूर्ती आतून ठिसूळ होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा रासायनिक आणि विघातक प्रक्रियांना तातडीने स्थगिती देऊन वारकरी संत-महंत, जाणकार यांचे मार्गदर्शन घेऊन धर्मशास्त्रानुसार लेपन करावे, अन्यथा तीव्र जनक्षोभाला सामोरे जावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिला आहे. याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष व कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
श्री. घनवट पुढे म्हणाले की, मूर्ती संवर्धन हा केवळ भौतिक विषय नसून तो कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेशी आणि आध्यात्मिक भावनेशी जोडलेला आहे. त्यामुळे संवर्धनासाठी कृत्रिम रसायने किंवा स्टोन पावडरमधील रासायनिक बाइंडर्स वापरण्याऐवजी, प्राचीन आगम ग्रंथ आणि हिंदु धर्मशास्त्रात नमूद केलेल्या उपाययोजनांचा विचार करावा. देहू येथील जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान आणि धुळे येथील राम मंदिरात अशाच नैसर्गिक प्रक्रियांनी मूर्तींचे यशस्वी संवर्धन झाले असल्याचा दाखला देण्यात आला आहे. त्या जोडीला मूर्तीची झीज होत आहे, हे कारण पुढे करून शेकडो वर्षांची परंपरा असलेला श्री विठ्ठलाचा ‘चरणस्पर्श’ किंवा ‘अभिषेक’ यांवर कोणत्याही प्रकारची बंदी आणणे अथवा निर्बंध लादणे, हा यावरील उपाय असू शकत नाही, अशी ठाम भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.
श्री विठ्ठल मूर्तीबाबतचा कोणताही निर्णय बंद खोलीत घाईगडबडीत न घेता, तो वारकरी संप्रदायातील संत-महंत, शंकराचार्य, मूर्तीशास्त्राचे अभ्यासक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार यांच्या मार्गदर्शनाखालीच घेण्यात यावा. हा विषय महाराष्ट्राच्या धार्मिक अस्मितेचा असल्याने प्रशासनाने सर्व आक्षेपांचे निरसन करूनच पुढील पावले उचलावीत. कोट्यवधी भाविकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून याविषयी कोणताही एकतर्फी निर्णय घेतल्यास महाराष्ट्रात तीव्र जनक्षोभ निर्माण होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.







