Menu Close

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील गायरान भूमी ‘इस्लामिक सेंटर’ला देण्यात येऊ नये ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत काळगे यांना निवेदन देतांना नितीन काकडे, रमेश भोरे, तसेच अन्य

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – हुपरी येथील गट क्रमांक ८४४/अ/१ ब यातील क्षेत्र ११ ‘आर्.’ची जागा ही सरकारी गायरान भूमीसाठी राखीव आहे. या भूमीवर मुस्लिम सुन्नत जमियत यांनी अवैधरित्या कह्यात घेऊन येथे मदरसा उभारला होता. हे अतिक्रमण शासनाने निष्काषित करून ही भूमी कह्यात घेतली. असे असतांना ‘मुस्लिम सुन्नत जमियत’ने ही भूमी परत एकदा ‘इस्लामिक सेंटर’च्या उभारणीसाठी मागितली आहे. 

ही भूमी हुपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी योग्य असून त्यासाठी त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे. तरी सदरची भूमी ही कोणत्याही परिस्थितीत अल्पसंख्यांकांच्या ‘इस्लामिक सेंटर’साठी देण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने इचलकरंजी येथील अपर तहसीलदार यांना दिले. सदरचे निवेदन प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत काळगे यांनी स्वीकारले.

या प्रसंगी हुपरी येथील श्री. नितीन काकडे, अखिल भारत हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. रमेश भोरे उपस्थित होते. सदरची मिळकत ही शासकीय भूमी असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या ‘महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी’ (स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण) सुधारणा नियम २०२५ च्या नियम ९ प्रमाणे कोणत्याही धार्मिक प्रयोजनासाठी देता येणार नाही, असे आहे. तरी ही भूमी शहराचे रक्षण करणार्‍या पोलिसांच्या सोयीसुविधेसाठी देण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Read more on Hindu Organisations

Latest News