स्थानिक संघटनांचा लव्ह जिहादचा आरोप

गौहत्ती (आसाम) – येथील गुवाहाटी विद्यापिठात शिकणारी २२ वर्षीय विद्यार्थिनी निमिषा ठाकूरिया ही आसिफ अली नावाच्या तरुणासह गराल भागातील एका होमस्टेमध्ये (एखाद्या स्थानिक व्यक्तीच्या घरात रहाण्याची व्यवस्था) मुक्कामाला होती. २६ सप्टेंबरला पहाटे ती बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर तिला तातडीने स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून तिला गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हालवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला भरती करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी २६ वर्षीय आसिफ अली याला कह्यात घेतले आहे. विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा आसिफ याने केला असला, तरी पोलिसांना हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
१. मृत्यूपूर्वी तरुणीने मध्यरात्री आईला दूरभाष करून ‘हे मला मारून टाकतील’ असे सांगितल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला. पश्चिम गौहत्तीचे पोलीस उपायुक्त बोलिन देवरी यांनी सांगितले की, संशयित आरोपी आसिफ अली याने निमिषाने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे; मात्र आम्ही त्याच्या जबाबावर विश्वास ठेवलेला नाही. प्राथमिक अन्वेषणात ही हत्या असल्याचा संशय येत असून सखोल चौकशी चालू आहे.
२. या घटनेनंतर स्थानिक पातळीवर काही हिंदु संघटनांनी या घटनेला लव्ह जिहाद सांगत तीव्र निदर्शन केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण होऊन रास्ता बंद करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आहे.







