न्यायव्यवस्था, सैन्य आणि शिक्षण व्यवस्था यांवरील डाव्यांचे आक्रमण उधळून लावा ! – अधिवक्ता सत्येंद्र मुळे

पुणे – लोकशाहीची मूळ संकल्पना हिंदु धर्माने जगाला दिली आहे. भारत हा अत्यंत मुक्त विचारांचा देश आहे; मात्र डावी विचारधारा आपल्या प्रगतीत अडथळे आणत आहे. ‘अवॉर्ड वापसी गँंग’, नर्मदा बचाव आंदोलन आणि शेतकरी आंदोलन सारख्या घटनांमुळे देशाच्या विकासाची कामे दशकानुदशके रखडली गेली. लोकशाहीच्या स्तंभांवर म्हणजेच न्यायव्यवस्था, सैन्य, प्रसारमाध्यमे आणि शिक्षण व्यवस्थेवर जाणीवपूर्वक आक्रमणे केली जात आहेत. ‘जेन झी’ (वर्ष १९९७ ते २०११ या कालावधीत जन्मलेली मुले) पिढीला भ्रमणभाष आणि इंटरनेट लवकर मिळाले आहे. या पिढीला ‘सोशल मीडिया’मुळे माहिती लवकर मिळते; परंतु त्या माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता त्यांच्याकडे अल्प असू शकते.
जंतर-मंतर सारख्या ठिकाणची आंदोलने त्यांना थेट दिसतात; पण त्यामागचे षड्यंत्र त्यांना समजत नाही. आपल्याला केवळ सरकारवर अवलंबून न रहाता देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी स्वत:चे योगदान कायम द्यावेच लागेल. यासाठी युवा पिढीला आणीबाणी, मोगल साम्राज्याच्या व्यतिरिक्तचा इतिहास आणि प्रगतीला होणारा विलंब यांची माहिती दिली पाहिजे. असे विधान मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता सत्येंद्र मुळे यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘सीजेपी आंदोलनात अर्बन नक्षलवाद ?’ या विषयावर पुण्यातील ‘माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालया’तील गणेश सभागृह येथे परिसंवाद पार पडला. या कार्यक्रमाला सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक, सामाजिक आणि राजकीय विश्लेषक श्री. सर्वेश मेहेंदळे हे उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ नितीन प्रधान, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्हिडिओ पाठवून त्याद्वारे विचार मांडले. कार्यक्रम चालू होण्यापूर्वी दाभोलकर हत्येप्रकरणात जामीन मिळालेले सचिन अंदुरे यांचे अधिवक्ता नितीन प्रधान यांनी चलचित्राद्वारे पाठवलेले मनोगत दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला ‘ज्येष्ठ नागरिक संघा’चे श्री. माधव वाणी, पुणे सार्वजनिक सभेचे श्री. विद्याधर नारगोलकर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. महेंद्र देवी, सावरकरप्रेमी श्री. ज्ञानेश क्षीरसागर, ‘स्वयंभू रामेश्वर देवस्थान ट्रस्ट’चे विजय माझिरे यांच्यासह ३०० हून अधिक नागरिक उपस्थित होते.
‘अर्बन नक्षलवादा’चा कर्करोग वैचारिक शस्त्रकर्मानेच दूर होईल ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था
पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ‘दिमागी नक्षलवादापासून सावध रहा’ असे सांगत देशाला अतिशय महत्त्वाचा संदेश दिला. साम्यवाद, ‘अर्बन नक्षलवाद’ म्हणजे भारतीयत्वाला, देशाला होत असलेला मेंदूचा कर्र्करोग आहे. असे म्हणतात की, मेंदूचा कर्करोग दूर करायचा असेल, तर शस्त्रकर्माविना पर्याय नाही. आपल्यालासुद्धा हे शस्त्रकर्म वैचारिक, बौद्धिक स्तरावर करावे लागेल. साम्यवाद्यांचे बुरखे फाडून ‘जेन झी’ (वर्ष १९९७ ते २०११ या कालावधीत जन्मलेली मुले) पिढी समोर साम्यवाद्यांचे सत्य आणून दाखवावे लागेल.
साम्यवाद्यांचा दुतोंडीपणा आपण समजून घेऊन पुढच्या पिढीला सांगणे, हेच आपले कर्तव्य आहे. सनातन संस्थेने याच अर्बन नक्षलवादाच्या वैचारिक भ्रम पसरवण्याच्या कौशल्याचा अनेक वर्षे अनुभव घेतला आहे. आज सीजेपीचा उद्देश तोच असून उद्या यांची सत्ता आल्यास ‘पुण्यातील शनिवारवाडा हा ब्राह्मणी विचारांचे प्रतीक’, असे सांगत शनिवारवाडा विकायलाही मागे-पुढे पहाणार नाहीत, अशी यांची विकृत विचारसरणी आहे.
‘सीजेपी’ आंदोलनामागे परकीय निधी आणि डाव्या संघटनांचे षड्यंत्र ! – सर्वेश मेहंदळे
सोनम वांगचूक यांच्या नावावर ३०० नव्हे, तर केवळ एकच पेटंट आहे; त्यांच्या ‘सेकमोल’ या संस्थेचा ‘एफ्.सी.आर्.ए.’ परवाना सरकारने रहित केला आहे. सीजेपी आंदोलनाला ‘आयसा’ (डाव्या विचारसरणीची मुख्य विद्यार्थी संघटना), ‘एस्.एफ्.आय.’ आणि काही ख्रिस्ती मिशनरी संघटनांनी पाठिंबा दिला असून परकीय निधीविषयक कायद्यातील कठोर पालटांना विरोध करणे, हाच ‘सीजेपी’ आंदोलनामागे मुख्य उद्देश होता.
अर्बन नक्षलवादाचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी कृतीशील व्हा, जागरूक रहा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
आज देशात गांधी हत्येनंतर पुढे हत्याच झाल्या नाहीत आणि त्यानंतर ४ पुरोगाम्यांच्या हत्या झाल्या, असे वातावरण निर्माण करण्याचे काम अर्बन नक्षलवाद्यांनी केले. प्रत्यक्षात केवळ भारतामध्ये नक्षलवाद्यांनी १४ सहस्रांहून अधिक हत्या केल्या आहेत.
यावर अर्बन नक्षलवादी बोलत नाहीत, बोलणार नाहीत. दाभोलकर हत्या प्रकरणात आम्ही हेच अनुभवले. या प्रकरणात आज एका निष्पाप हिंदुत्वनिष्ठाला जामीन मिळाला. या प्रकरणातील अनेक त्रुटी आम्ही न्यायालयासमोर मांडल्या आहेत. अर्बन नक्षलवादाचे हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी आपण सर्वांनीच कृतीशील व्हा, जागरूक रहा !







