Menu Close

पालघर येथे हिंदूंच्या धर्मांतरासाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांची मोठी यंत्रणा कार्यरत !

  • कॅटरर्सचे भोजन, तिकीट, तसेच अन्य सोयीसुविधांसाठी मिशनर्‍यांकडून व्यवस्था  

  • हिंदूंच्या सतर्कतेमुळे २२ महिलांच्या विरोधात गुन्हा नोंद

मुंबई – पालघर येथील मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथील आदिवासी पाड्यांमधील हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती मिशनर्‍यांची मोठी यंत्रणा कार्यरत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे. हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी भाग्यनगरमधून आलेल्या २० महिला आणि त्यांना सहकार्य करणार्‍या २ स्थानिक महिला, अशा २२ जणींविरुद्ध या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे या सर्व महिलांचा येण्या-जाण्याचा, भोजनाचा, तसेच अन्य सुविधांचा खर्च ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून केला जात आहे. त्यांच्या दुपारच्या भोजनासाठी ठाणे जिल्ह्यातून एका चारचाकी गाडीतून ‘कॅटरर्स’चे भोजनही पाठवण्यात आले होते.

विश्व हिंदु परिषद, भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ आणि भाजप यांच्या जागरूक कार्यकर्त्यांनी धर्मांतरासाठी आलेल्या महिलांना रोखले. २२ ऑगस्ट या दिवशी या महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. श्री. अक्षय कान्हात या युवकाने या महिलांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. तक्रारीनुसार २१ ऑगस्ट या दिवशी दुपारी १ वाजता या महिला श्री. अक्षय कान्हात यांच्या घरी आल्या होत्या. त्यांनी ‘नवा करार’ आणि ‘पवित्र शास्त्र’ ही ख्रिस्ती धर्माची पुस्तके अक्षय यांना विनामूल्य दिली.

हिंदूंच्या देवतांची उपासना न करण्याचे आवाहन !

या वेळी त्या महिला म्हणाल्या, ‘‘हिंदु धर्म आणि हिंदूंच्या देवता यांवर विश्वास ठेवू नकोस. त्यांची पूजा करू नकोस. ही पुस्तके वाचल्यानंतर तुला ख्रिस्ती धर्मात यावेसे वाटेल. ही पुस्तके वाचल्यानंतर तुला कोणतीही व्याधी होणार नाही आणि व्याधी असेल, तर ठीक होईल.’’ त्यांनी दिलेली पुस्तके अक्षय यांनी स्वीकारली नाहीत. त्या वेळी घराच्या दरवाज्याजवळ पुस्तके ठेवून त्या निघून गेल्या.

धर्माचा प्रसार करणार्‍यांचा आर्थिक भार उचलत आहेत मिशनरी !

अक्षय यांनी घडलेला प्रकार भाजपचे तालुकाध्यक्ष श्री. मिलिंद झोले यांना सांगितल्यावर त्यांच्यासह भगिनी निवेदिता उत्कृर्ष मंडळाचे कार्यकर्ते श्री. बन्सी हमरे आणि विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते यांनी त्या महिलांचा शोध घेतला. त्या वेळी पाड्यातीलच एका स्थानिक महिलेच्या घरी त्या भोजन करत होत्या. त्यांचे भोजन घेऊन ठाणे जिल्ह्यातून एका कॅटरर्सची गाडी तेथे आली होती. त्यांचे भोजन झाल्यावर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांच्यासह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार प्रविष्ट केली.

रेल्वेगाडी चुकल्यावर जाण्यासाठी विमानाची व्यवस्था केली ?

या २० महिलांचे भाग्यनगर येथे जाण्यासाठी सायंकाळच्या गाडीचे आरक्षणही करण्यात आले होते. पोलीस ठाण्यात विलंब झाल्यामुळे त्यांची गाडी सुटण्याची वेळ टळून गेली. त्या वेळी त्यांतील एका महिलेने कुणाला तरी दूरभाष करून गाडी चुकल्याचे सांगितले. त्या वेळी त्यांची जाण्याची व्यवस्था विमानाद्वारे करण्यात येत असल्याची चर्चा त्या महिलांमध्ये चालू होती. तेथे असलेल्या एका हिंदुत्वनिष्ठांनी ही चर्चा ऐकली. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला माहिती देतांना या हिंदुत्वनिष्ठाने हा प्रसंग सांगितला.

Latest News