Menu Close

श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील चोरीच्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे – हिंदू जनजागृती समिती

मंदिराच्या दानपेटीतील अर्पणाची चोरी, हे महापाप आहे; मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच असले पाहिजे – हिंदू जनजागृती समिती

अयोध्या येथील श्रीराम मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जगभरातील कोट्यवधी हिंदूंच्या शतकांच्या बलिदानाचे, दीर्घकालीन संघर्षाचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. मंदिराच्या दानपेटीतील अर्पणाची चोरी करणे हे महापाप आहे आणि प्रभू श्रीराम त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा नक्कीच देतील. परंतु सरकारने या प्रकरणात नक्की कोण दोषी आहे, याची तातडीने चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

आम्ही यापूर्वीही अनेकदा अशी मागणी केली आहे की, कोणत्याही मंदिराच्या समितीत केवळ देवाचे भक्तच असायला हवेत. भक्त हा ईश्वराचा उपासक असल्याने तो देव-निधी चोरण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही. जर खऱ्या अर्थाने मंदिरांचा उद्धार करायचा असेल, तर देवाचे असे भक्तच मंदिर व्यवस्थेत असायला हवेत. अशा प्रकरणांमुळे सरकार ‘मंदिरांचे सरकारीकरण (अधिग्रहण)’ करण्याचा प्रयत्न करते, ज्याला आमचा नेहमीच विरोध असेल, अशी स्पष्ट भूमिका समितीने घेतली आहे.

जे सरकारी अधिकारी स्वतः भ्रष्ट असतात, जे सरकारी अधिकारी शासन व्यवस्थेत खोलवर रुजलेल्या भ्रष्ट यंत्रणेचा भाग असतात, ते सरकारी अधिकारी मंदिर समितीतील भ्रष्टाचार कसा काय रोखू शकणार? म्हणूनच धार्मिक स्थळांमध्ये धर्मनिरपेक्ष सरकारचा हस्तक्षेप नसायला हवा. मंदिरांचे सरकारीकरण झाल्यानंतर मंदिराच्या निधीमध्ये भ्रष्टाचार वाढल्याची अनेक उदाहरणे देशभरात आहेत. या दृष्टीने देवाचा सच्चा भक्त, जो मंदिराची जबाबदारी ही भगवंताची सेवा मानून स्वीकारेल, अशा भक्तांकडेच मंदिरांची जबाबदारी सोपवली पाहिजे, असे मत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केले.

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील अपहार ही अतिशय गंभीर घटना ! – अधिवक्ता विष्णुशंकर जैन

नवी देहली – श्रीराममंदिराची उभारणी केल्यानंतर आपण तेथे सर्वांनी प्रभु श्रीरामांची स्थापना केली. त्या वेळी सर्वांनी ‘हे संपूर्ण देशात एक आदर्श मंदिर व्हावे’, असा विचार केला होता. त्यामुळे त्य ाठिकाणी अपहाराची घटना घडणे, हे अतिशय गंभीर आहे. या घटनेचे सखोल अन्वेषण होईलच; पण अशा गोष्टी भविष्यात परत घडू नयेत, यासाठी तेथे एक विशेष व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे, असे मत सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी व्यक्त केले.

अधिवक्ता विष्णु शंकर जैन पुढे म्हणाले की,

मंदिर न्यासाच्या कोषाध्यक्षांनी नैतिकता म्हणून त्यागपत्र दिले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष अन्वेषण पथकाने गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना अन्वेषण अहवाल सादर केला आहे. अन्वेषण संस्था आता त्याचे अन्वेषण करतील. त्यात जे दोषी आढळतील, त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल आणि आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले जाईल. समजा त्यात एखाद्याचे नाव नसेल, तर ते पुरवणी आरोपपत्रात जोडता येईल.

मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त झाली पाहिजेत !

अधिवक्ता जैन म्हणाले की, सध्याच्या स्थितीत मंदिरे ही सरकारच्या नियंत्रणातून मुक्त झाली पाहिजेत. या पार्श्वभूमीवर येथे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि समाजातील विचारवंत यांचा सहभाग असतांना, जर अशा प्रकारचे आरोप समोर येत असेल, तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अतिशय गांभीर्याने झाले पाहिजे. भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी कशा प्रकारे व्यवस्था निर्माण केली पाहिजे ?, याचा विचार देशातील सर्व सरकारे आणि समाज यांनी करणे आवश्यक आहे.

Latest News