Menu Close

मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार ! – गृहराज्यमंत्री योगेश कदम

  • गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे हिंदु जनजागृती समितीला आश्वासन !

  • लवकरच संयुक्त बैठक बोलावणार !

गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. सुनील घनवट, श्री. सतीश सोनार

मुंबई – मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकल रेल्वे गाड्यांमध्ये चालणारे ख्रिस्ती मिशनर्‍यांचे छुप्या धर्मांतराचे षड्यंत्र आणि अंधश्रद्धा पसरवणार्‍या भोंदूबाबांची विज्ञापने यांना कायमचा आळा घालण्यासाठी राज्य सरकार विशेष नियमावली (एस्.ओ.पी.) सिद्ध करील, असे आश्वासन राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. या धर्मद्रोही कृत्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच मुंबई पोलीस आयुक्त आणि रेल्वे प्रशासन यांची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार आहे.

लोकल गाड्या बनल्या ख्रिस्ती मिशनरी आणि भोंदूबाबा यांचे केंद्र !

पनवेल-सी.एस्.एम्.टी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनेस) मार्गावरील वातानुकूलित लोकलसह अन्य रेल्वे गाड्यांमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून ‘जीवनारेखा हवी आहे का ?’ किंवा ‘येशू हाच एकमेव देव आहे’ अशी पत्रके वाटली जातात. याद्वारे हिंदु प्रवाशांचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करण्याचे मोठे जाळे विणले जात आहे. यासह मध्य, पश्चिम आणि हार्बर या मार्गांवरील लोकलगाड्यांमध्येही केवळ प्रार्थनेने कर्करोगासारखे गंभीर आजार बरे करण्याचे खोटे दावे करणारी पत्रके, तसेच ‘बंगाली बाबा’, ‘१०० टक्के वशीकरण’ अशी फसवी आणि समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलणारी विज्ञापने चिकटवल्यामुळे निष्पाप प्रवाशांची मोठी आर्थिक आणि मानसिक लूट चालू आहे. या समाजविघातक अन् धर्मद्रोही प्रकारांची गंभीर नोंद घेत हिंदु जनजागृती समितीने पोलीस महासंचालक आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना निवेदन देऊन मुख्य सूत्रधारांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याची मागणी केली होती. प्रशासनाने १५ दिवसांत ठोस पावले न उचलल्यास तीव्र जनआंदोलन करण्याची चेतावणीही समितीने दिली होती.

गृहराज्यमंत्र्यांकडून समितीच्या मागण्यांची तात्काळ नोंद !

या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, श्री. सतीश सोनार आणि श्री. रवींद्र नलावडे यांच्या शिष्टमंडळाने २५ जून या दिवशी गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली. अनेक वर्षांपासून चालू असलेला हा प्रकार कायमचा मोडून काढण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मान्य करत गृहराज्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून आजपासूनच ‘एस्.ओ.पी’ (विशेष नियमावली) सिद्ध करण्याचा आदेश संबंधित प्रशासनाला दिला.

हिंदु जनजागृती समितीने गृहराज्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केलेल्या मागण्या –

१. केवळ वरवरची कारवाई न करता संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी रेल्वेने ‘व्हॉट्सॲप हेल्पलाइन’ चालू करावी आणि साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवावी.

२. विज्ञापनांवरील दूरध्वनी क्रमांक आणि संकेतस्थळ यांचे सायबर पोलिसांद्वारे अन्वेषण करावे. भोंदूबाबा, संबंधित संस्था आणि अशी विज्ञापने छापणारी मुद्रणालये यांच्याविरुद्ध थेट गुन्हे नोंदवून त्यांचे परवाने कायमचे रहित करावेत.

३. गेल्या ५ वर्षांत अशा अनधिकृत आणि फसव्या विज्ञापनांवर रेल्वे प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली ?, याची ‘श्वेतपत्रिका’ घोषित करून ती जनतेसमोर आणावी.


मुंबई लोकलमध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या मुख्य सूत्रधारांवर गुन्हे नोंदवा अन्यथा जनआंदोलन करू – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीची रेल्वे प्रशासनाला चेतावणी

लोकलमध्ये लावण्यात आलेली पत्रके

मुंबई – लोकलमध्ये लावण्यात आलेल्या पत्रकाच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी केलेल्या धर्मांतराच्या प्रकाराविषयी हिंदु जनजागृती समितीने थेट राज्याचे पोलीस महासंचालक, गृह विभाग आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना सविस्तर निवेदन पाठवले आहे. यामागील मुख्य सूत्रधारांवर, तसेच विज्ञापने प्रसिद्ध करणार्‍या मुद्रणालयांवर तातडीने गुन्हे नोंदवावेत, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे. प्रशासनाने १५ दिवसांत ठोस पावले न उचलल्यास जनआंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे.

समितीने निवेदनात म्हटले की, 

१. प्रवाशांच्या भावनिक आणि मानसिक कोंडीचा गैरफायदा घेत धर्मांतराचे अत्यंत नियोजनबद्ध जाळे रेल्वे डब्यांमध्ये विणले जात आहे. भावनिक मथळ्यांची पत्रके डब्यांत लावून नैराश्यग्रस्त किंवा अडचणीत असलेल्या प्रवाशांचा बुद्धीभेद केला जात आहे.

२. या विज्ञापनांवर संकेतस्थळांचे पत्ते देऊन प्रवाशांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्याची ही मोठी यंत्रणा उघडकीस आली आहे. रेल्वेसारख्या सार्वजनिक मालमत्तेचा असा उघड गैरवापर अत्यंत संतापजनक आहे.

३. ख्रिस्ती धर्मप्रचारक फादरच्या ‘चंगाई सभां’ची भित्तीपत्रके लावून केवळ प्रार्थनेने कर्करोगासारखे अनेक गंभीर आजार बरे करण्याचे अशास्त्रीय दावे करत आहेत.

४. ‘१०० टक्के वशीकरण’ आणि ‘प्रेम प्रकरण नीट करून देणारे बंगाली बाबा’ अशा फसव्या विज्ञापनांमुळे प्रवाशांची आर्थिक लूट चालू आहे. जादूटोणाविरोधी कायद्यानुसार हे अजामीनपात्र गुन्हे असून रेल्वे प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.

५. प्रवाशांना तातडीने तक्रार करता यावी, यासाठी रेल्वेने ‘व्हॉट्सॲप हेल्पलाइन’ चालू करावी. रेल्वेने साध्या वेशातील विशेष पथके नेमून या समाजकंटकांना रंगेहात पकडावे; तसेच विज्ञापनांवरील भ्रमणभाष क्रमांक आणि संकेतस्थळे यांचे सायबर पोलिसांनी सखोल अन्वेषण करून त्यामागे असलेल्या संस्था, फादर आणि भोंदूबाबा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा. समाजविघातक विज्ञापने छापणार्‍या मुद्रणालयांचा शोध घेऊन त्यांच्यावरही गुन्हे नोंदवावेत आणि त्यांचे परवाने रहित करावेत.

६. गेल्या ५ वर्षांत अशा अनधिकृत विज्ञापनांवर रेल्वे प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली ? याची श्वेतपत्रिका सार्वजनिक करावी.

Latest News