Menu Close

‘पुणे सार्वजनिक सभे’कडून अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार प्रदान

डावीकडून श्री. शरद गर्भे, श्री. विद्याधर नारगोलकर, पुरस्कार स्वीकारतांना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, ज्येष्ठ विधीज्ञ नंदू फडके

पुणे – ‘पुणे सार्वजनिक सभा’ या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या संघटनेकडून ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ज्येष्ठ विधीज्ञ नंदू फडके यांच्या हस्ते ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उपस्थित नागरिक

हिंदु धर्मावर विविध माध्यमांतून होणार्‍या आघातांच्या विरोधात कायदेशीर लढा देऊन हिंदुत्वाचे रक्षण करण्याचे व्यापक कार्य ते करत असल्याविषयी त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष श्री. विद्याधर नारगोलकर, कार्यवाहक श्री. शरद गर्भे, कार्याध्यक्ष श्री. अनिल शिदोरे, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच अनेक राष्ट्र-धर्म प्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचा आरंभ दीपप्रज्वलनाने झाला. त्यानंतर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

ज्येष्ठ विधीज्ञ नंदू फडके (मध्यभागी) यांचा सत्कार करतांना श्री. विद्याधर नारगोलकर, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, श्री. अनिल शिदोरे, श्री. शरद गर्भे

या कार्यक्रमात प्रतिवर्षीप्रमाणे काही होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. अनिल शिदोरे यांनी पुणे सार्वजनिक सभेचा इतिहास सांगत संघटनेच्या कार्याची माहिती दिली. या वेळी ज्येष्ठ विधीज्ञ नंदू फडके अन् श्री. रमेश शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. श्री. विद्याधर नारगोलकर यांनी दोन्ही अधिवक्त्यांची वैशिष्ट्ये सांगत ‘पुणे सार्वजनिक सभेला पुढील काळात राष्ट्र-धर्म यांच्या रक्षणाचे कार्य करतांना काही विधी साहाय्य लागल्यास दोन्ही अधिवक्ता कायम उभे रहातील’, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचा शेवट आभारप्रदर्शन आणि वन्दे मातरम् गायनाने झाला.

देशात राहून देशविरोधी कार्य करणार्‍या छुप्या शत्रूंपासून सावध व्हा ! – ज्येष्ठ विधीज्ञ नंदू फडके

नुकतेच भारतामध्ये झालेले कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन ही गंभीर घटना आहे. देशविरोधी घोषणा, अश्लाघ्य आणि अश्लील टीका करणारे हे युवक पाहून राष्ट्रभक्त नागरिक चिंतेत आहेत. स्वातंत्र्यानंतर आलेल्या सरकारने शांतताप्रिय समाजाला कायम झुकते माप दिले. अनेक दशकांमध्ये हिंदूंचा बुद्धीभेद केला गेला. या सर्व गोष्टींमुळेच आज हे संकट आपल्यासमोर आहे. देशात राहून देशविरोधी कार्य करणार्‍या छुप्या शत्रूंपासून आपण सावध व्हा. ही देशद्रोही विचारसरणी नष्ट होण्यासाठी हिंदूंचे संघटित आंदोलन उभे करावे लागेल.

पुढील पिढीने विधी क्षेत्रात येऊन राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करावे ! – वीरेंद्र इचलकरंजीकर

मनोगत व्यक्त करतांना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

मला मिळालेला हा पुरस्कार त्यांच्यासाठी आहे, जे हिंदुत्व रक्षणासाठी विधी क्षेत्रात प्राणपणाने लढत आहेत. त्यांचा प्रतिनिधी म्हणून जरी हा पुरस्कार स्वीकारत असलो, तरी या पुरस्काराने माझ्यावरील राष्ट्र-धर्म रक्षणाचे दायित्व आणखी वाढले आहे. आज देशभरात फोफावलेल्या वैचारिक आतंकवादाच्या विरोधात लढायला हवे आणि अधिवक्ता हे मोठे शस्त्रच आहे. हिंदूंवर होणार्‍या आघातांची वारंवारता पहाता हिंदुत्वासाठी लढणार्‍या अधिवक्त्यांची संख्या सहस्रोंच्या संख्येने वाढायला हवी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आवाहन करतो की, ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली, त्यांनी आणि एकूणच पुढील पिढीने विधी क्षेत्रात येऊन राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करावे.

Latest News