Menu Close

‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिना’निमित्त हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन

  • शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेची ३५० वर्षांची गौरवगाथा !

  • सोलापूरमध्ये ५ जण पुन्हा हिंदु धर्मात !

  • ‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकार करण्यासाठी हिंदू संघटित व्हा! – श्री. सुनील घनवट

व्यासपीठावर डावीकडून श्री. रवी गोणे, महंत मावजीनाथ महाराज, श्री. सर्वेश मेंहदळे व श्री. सुनील घनवट

सोलापूर – स्वराज्याचे दुसरे सरसेनापती नेताजी पालकर यांना औरंगजेबाने कपटाने छळ करून मुसलमान होण्यास भाग पाडले. तब्बल १० वर्षांनंतर मोगलांच्या तावडीतून निसटून ते रायगडावर परत आले, तेव्हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विधीवत्पणे हिंदु धर्मात परत घेतले. तो दिवस होता आषाढ वद्य चतुर्थी, संवत्सर शके १५९८ ! शिवछत्रपतींनी ३५० वर्षांपूर्वी चालू केलेल्या शुद्धीकरण मोहिमेचा आदर्श समोर ठेवून हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र सेना यांच्या पुढाकाराने ५ जणांना सोलापूर येथे विधीवत् हिंदु धर्मात परत घेण्यात आले.

स्वेच्छेने आणि विधीवत् हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करतांना हिंदु

२ ऑगस्ट या दिवशी झालेल्या या कार्यक्रमात प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित यांनी ५ जणांचे विधीवत् शुद्धीकरण करून त्यांना त्यांच्या इच्छेने त्यांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करून घेतला. या ५ जणांनी कोणतेही भय अथवा भीती न बाळगता आनंदाने स्वधर्मात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळेच समाधान दिसत होते. या कार्यक्रमापासून हिंदु जनजागृती समितीने राष्ट्रीय स्तरावरील ‘शुद्धीकरण’ मोहिमेचा शुभारंभ केला !

हिंदु धर्मात परत येणार्‍यांसाठी शिवछत्रपतींचा आदर्श रुजवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन !

उपस्थित हिंदु

नेताजी पालकर यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ स्वधर्मात परत घेतले असे नाही, तर महाराजांनी नेताजींच्या जानोजी या मुलाशी स्वतःची मुलगी कमलाबाई यांचा विवाह लावून ‘रोटी बेटी’ व्यवहारही चालू केला. आज ३५० वर्षांनंतरही अनेक भोळसट हिंदू फसवणूक, दबाव किंवा ‘लव्ह जिहाद’ यांसारख्या षड्यंत्रांना बळी पडून धर्मांतरित होत आहेत. अशांना हिंदु धर्मात परत यायचे असल्यास त्यांना साहाय्य करून शिवछत्रपतींचा आदर्श रुजवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शुद्धीकरणाचा कार्यक्रम झाल्यावर पुणे येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. सर्वेश मेहेंदळे, तुळजापूर येथील गरीबनाथ मठाचे मठाधिपती महंत मावजीनाथ महाराज, हिंदु राष्ट्र सेनेचे सोलापूर शहरप्रमुख श्री. रवि गोणे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमासाठी तरुणांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.

मान्यवरांचे मनोगत !

धर्मांतरित हिंदूंना स्वधर्मात परत आणण्यासाठी संघटित प्रयत्न करा ! – रवि गोणे, हिंदु राष्ट्र सेना

प्रारंभी ‘हे कार्य कसे करावे ?’, याविषयी मनात दडपण होते; मात्र देवतांचे आशीर्वाद आणि गुरूंचे मार्गदर्शन यांमुळे सर्व अडचणींवर मात करून हे कार्य अधिक प्रभावीपणे करता आले. प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य न हरता धर्मांतरित हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्यासाठी सातत्याने प्रबोधन करण्यात आले. या कार्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी त्याचे कौतुकही केले. समाजातील अनेक व्यक्तींना पुन्हा हिंदु धर्मात परत यायची इच्छा असून त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना स्वधर्मात आणण्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करावेत.

परधर्मात गेलेल्या हिंदूंना स्व-धर्मात आणण्याचा एकमुखी निर्धार करूया ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर या छुप्या षड्यंत्राच्या माध्यमातून हिंदूंना बाटवणे चालू आहे. हे षड्यंत्र थांबवायचे असेल, तर आपल्याला ‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ चालू करावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे आपण सर्वांनी ‘हिंदु राष्ट्रा’ची प्रतिज्ञा घेऊया. परधर्मात गेलेला शेवटचा हिंदु जोपर्यंत स्वधर्मात परत येत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशा निष्ठेने कार्य करूया. राष्ट्रीय शुद्धीकरण दिनाच्या निमित्ताने केवळ इतिहास वाचणारे नव्हे, तर इतिहास घडवणारे मावळे होण्याचा संकल्प करून परधर्मात गेलेल्या हिंदूंना स्वधर्मात आणण्याचा एकमुखी निर्धार करूया.

हिंदु समाजाने संघटित, सजग आणि सक्रीय व्हावे ! – सर्वेश मेहेंदळे

‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ यासंह विविध माध्यमांतून हिंदु समाजावर आघात होत आहेत. अलीकडेच देहली येथे झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनामध्ये डाव्या विचारसरणीच्या घटकांनी त्यांचा ‘अजेंडा’ पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. धर्मांतरामुळे अनेक भागांत पूर्वी हिंदू बहुसंख्य असलेला समाज आज अल्पसंख्यांक होत आहे. ही परिस्थिती राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून हिंदु समाजाने संघटित, सजग आणि सक्रीय होऊन या आव्हानांना सामोरे जाण्याची आवश्यकता आहे.

हिंदूंनी धर्मांतरित होणार्‍यांचे प्रबोधन करावे ! – महंत मावजीनाथ महाराज, महंत, गरीबनाथ मठ, तुळजापूर

स्वतःच्या धर्मामध्ये मृत्यू आला, तरी कल्याणकारी आहे; परंतु परधर्मांमध्ये गेल्यास जीवनासाठी घातक आहे, असे गीतेमध्ये वर्णन केले आहे. हिंदु धर्मामध्ये मोक्षाची संकल्पना आहे, मुक्तीची संकल्पना आहे. केवळ याच धर्मात मुक्ती मिळू शकते; म्हणून हिंदूंनी हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व जाणून घेऊन धर्मांतरित होणार्‍यांचे प्रबोधन करावे आणि त्यांना स्वधर्मातच ठेवण्याचा प्रयत्न करावा.

श्री. सुनील घनवट या वेळी म्हणाले, ‘‘हिंदु आज शिवछत्रपतींचा इतिहास विसरला आहे, म्हणूनच ही दुःस्थिती आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासंबंधातील ‘नॅरेटिव्ह’ (थोटे कथानक) पसरवणे थांबवले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वधर्मसमभावी आणि पुरोगामी दाखवण्याचा प्रयत्न करू नका. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलीदान दिले; परंतु परधर्म स्वीकारला नाही, हा महान आदर्श आपल्यासमोर आहे.

ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून त्यांचा पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश करून घेतला, त्याचप्रमाणे ‘लव्ह जिहाद’मध्ये धर्मांतरित झालेल्या मुली आणि धर्मांतरित हिंदू यांना पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश करण्यासाठी हिंदु धर्माची द्वारे खुली करूया. ‘स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ।’ या भगवद्गीतेतील वचनाप्रमाणे ‘स्वतःच्या धर्मात मरण आले तरी चालेल; परंतु परधर्म स्वीकारणार नाही’, असा बाणा आपण सर्वांनी निर्माण केला पाहिजे, असे ओजस्वी आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, तसेच मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले.

Latest News