अजयमेरू (राजस्थान) – देहली येथे डिसेंबर २०२५ या महिन्यात पार पडलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मध्ये उपस्थित राहिलेल्या अजयमेरू (अजमेर) येथील धर्मप्रेमींनी येथे विविध कार्यक्रम आणि बैठका यांचे आयोजन केले. या बैठकांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधन करण्यात आले. त्याचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.

१. मंदिरांमध्ये धर्मशिक्षणावरील प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन
अजयमेरू येथे ‘पौष बडा प्रसादी’निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्शनगर येथील शिव मंदिर आणि पंचशील कॉलनी येथील सीताराम मंदिर येथे धर्मशिक्षणासंबंधी प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी समितीचे राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी भाविकांना संबोधित केले. या कार्यक्रमांचा २५० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. आदर्शनगर येथील कार्यक्रमासाठी उद्योजक श्री. संतोष आचार्य यांनी, तर पंचशील कॉलनीमध्ये पूजा चौधरी आणि पुजारी संपतराज उपाध्याय यांच्या सहकार्याने प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सौ. सुगंध मिश्रा यांनी कुलदेवतेचा नामजप करण्याचे महत्त्व विषद केले. पंचशील कॉलनी येथील कार्यक्रमाला सध्या अमेरिकेत वास्तव्यात असणारे श्री. संजय सोनी उपस्थिती होते. त्यांनी धर्माचरणाविषयी मिळालेल्या वैज्ञानिक ज्ञानाविषयी आनंद व्यक्त केला.

शिव मंदिरात मार्गदर्शन करतांना श्री. आनंद जाखोटिया
२. साई विहार कॉलनी आणि कीर्तीनगर येथे विचारवंतांच्या बैठकांचे आयोजन
‘आग्रह व्रत अभियाना’चे क्रियाशील सदस्य श्री. राहुल सिसोदिया यांनी त्यांच्या निवासस्थानी साई विहार कॉलनीतील विचारवंतांसाठी एक बैठक आयोजित केली. या बैठकीत समितीद्वारे चालवल्या जाणार्या विविध राष्ट्र आणि धर्म रक्षण मोहिमांची माहिती देण्यात आली. या वेळी समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘धर्मशिक्षणासह राष्ट्र आणि धर्म यांच्याप्रती स्वतःचे दायित्व’ याविषयी मार्गदर्शन केले. श्री. राहुल श्रीवास्तव आणि श्री. भंवर सिंह राठोड यांनी धर्माचरण अन् साधना यांमुळे स्वतःसह कुटुंबियांनी अनुभवलेले परिवर्तन सांगितले. अशाच प्रकारे ‘हनुमान जागरण मंच’चे श्री. गुलाबचंद यांनी कीर्तिनगर येथील विचारवंतांसाठी एक बैठक आयोजित केली. या बैठकीला समितीचे श्री. जाखोटिया आणि श्री. भंवर सिंह राठोड यांनी संबोधित केले.
३. ‘आदेश सेवा समिती’च्या पदाधिकार्यांसमवेत समन्वय बैठकीचे आयोजन
‘हिंदु जनजागृती समिती’च्या संकेतस्थळाचे वाचक श्री. जेठो बलाणी यांच्या प्रयत्नांनी ‘आदेश सेवा समिती’च्या पदाधिकार्यांसह एक समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला ‘आदेश सेवा समिती’चे अध्यक्ष मोनू सेन आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्र आणि धर्म यांसाठी आपण परस्पर सहकार्याने कोणते उपक्रम हाती घेऊ शकतो ? याविषयी चर्चा करण्यात आली.
४. ‘पौष बडे’ महोत्सवात आध्यात्मिक मार्गदर्शन
येथील एम्.डी. कॉलनीतील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात श्री. जेठो बलाणी यांच्या माध्यमातून ‘पौष बडे’ महोत्सवात एक आध्यात्मिक मार्गदर्शन ठेवण्यात आले. या वेळी सौ. सुगंध मिश्रा आणि सौ. चंद्रा लालवाणी यांनी कुलदेवता अन् दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व विषद केले. या कार्यक्रमाचा लाभ अनेक महिलांनी घेतला.


