क्रांतीकारकांची वैशिष्ट्ये !

चंद्रशेखर आझाद

हे एका खिशात भगवद्गीता आणि दुसर्‍या खिशात बंदूक ठेवत असत. एकदा त्यांचा मित्र त्यांना म्हणाला, ‘बंदूक ठेवणे शोभत नाही, योग्य नाही.’ त्यावर चंद्रशेखर म्हणाले, ‘कृष्णाच्या मुखात गीता आणि हातात सुदर्शन चक्र शोभते, तर माझ्या हातात गीता आणि बंदूक यात काय वाईट आहे ?’

पोलिसांनी अनन्वित छळ करूनही सहकारी क्रांतीकारकांची नावे न सांगणारे क्रांतीकारक बटुकेश्वर दत्त !

‘लाहोर कटाच्या खटल्यात भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा झाली. फाशीच्या शिक्षेतून क्रांतीकारक बटुकेश्वर दत्त वाचले होते. लाहोरच्या कारावासात असतांना क्रांतीकारकांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी झालेल्या १४४ दिवसांच्या आमरण उपोषणात दत्त सहभागी होते. याच उपोषणात क्रांतीकारक जतिन दास यांचा मृत्यू झाला. ब्रिटिश पोलीस आणि तुरुंगाधिकारी यांनी प्रचंड यमयातना देऊन, छळ करूनही दत्त यांनी त्यांच्या सहकारी क्रांतीकारकांची नावे सांगितली नाहीत.’

भाई बालमुकुंद

‘भाई मतिदासांचे वंशज भाई बालमुकुंद यांचा जन्म पंजाब प्रांतातील चकवाल या गावी ख्रिस्ताब्द १८८५ मध्ये झाला. इस्लाम धर्म स्वीकारायला नकार दिल्याने क्रूरकर्मा औरंगजेबाने करवतीने उभे चिरून गुरुतेगबहादुरांचे सहकारी भाई मतिदासांची हत्या केली होती. बालमुकुंद पदवीधर झाल्यानंतर भाई परमानंद या स्वतःच्या चुलत भावाच्या संपर्कात आले आणि कट्टर क्रांतीकारक बनले.

 

तात्यासाहेब रायरीकर

‘तात्यासाहेबांनी तरुणपणीच प्रतिज्ञा केली, ‘इंग्रजांचे या देशातून उच्चाटन केल्याविना मी कोणताही उपभोग घेणार नाही.’ एवढेच काय पण दूध, तूप हेसुद्धा वर्ज्य करून केवळ भुईमुगाचे दाणे आणि गूळ याच आहारावर त्यांनी दिवस घालवले !’ तात्यासाहेबांनी तरुणांची अंतःकरणे पेटवण्याच्या कार्यासह दैवी शक्तीचे साहाय्य मिळवून आपल्या लौकिक प्रयत्नांना यशस्वी बनवण्याच्या मार्गास लागावे, यासाठी प्रयत्न केले.

भाई परमानंद

‘भाई परमानंद देशभक्त, क्रांतीकारी समाजसुधारक, विचारवंत, हिंदु धर्मप्रसारक आणि बलिदानी होते. ते हिंदु धर्माच्या प्रसारासाठी १९०५ या वर्षी दक्षिण अफ्रिकेत गेले होते.

भागोजी नाईक

‘क्रांतीकारक भागोजी नाईक हे पूर्वा नगर जिल्ह्याच्या पोलीस दलात कार्यरत होते. ब्रिटिशांविरुद्ध उभारलेल्या लढ्याच्या गोष्टी भागोजींनी ऐकल्या आणि आपल्याच लोकांच्या विरोधात कारवाई करणे त्याच्या स्वाभिमानी मनाला मानवेना. ‘भागोजी क्रांतीकारकांना साहाय्य करतो’, असा संशय इंग्रज अधिकार्‍यांना येऊ लागला. त्यांनी त्याला एक वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावून बडतर्फ केले. भागोजीने परिसरातील तरुणांना प्रशिक्षण देऊन सशस्त्र मोहिमा चालू केल्या. सरकारी कचेर्‍या जाळणे, सरकारचा खजिना लुटणे असे प्रकार तो करू लागला. १०.८.१८५७ या दिवशी त्याने मोठा उठाव केला. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने नगरचा पोलीसप्रमुख जेम्स विल्यम हेन्री याला सशस्त्र कुमक घेऊन पाठवले. ४ ऑक्टोबरला झालेल्या संघर्षात भागोजीकडून हेन्री मारला गेला; पण ११.११.१८५९ या दिवशीच्या चकमकीत भागोजी मारला गेला.’

संदर्भ : झुंज क्रांतीविरांची

Leave a Comment