क्रांतीकारकांनी केलेल्या बाँबस्फोटाचे लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून केलेले समर्थन !

‘ख्रिस्ताब्द १९०८ मध्ये खुदीराम बोसने किंग्ज फोर्डवर बाँब टाण्याचा जो प्रयत्न केला, त्याविषयी शासकीय आणि ब्रिटिश पत्रकारांनी जहालमतवाद्यांना धारेवर धरले. ‘पायोनिअर’, ‘स्टेट्समन’, ‘इंग्लिशमन’, ‘एशियन’ या वर्तमानपत्रांनी फारच भडक लेखन केले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने तर देशातील तरुणांची डोकी भडकावून देण्यास हिंदुस्थानी वृत्तपत्रे आणि पुढारीच उत्तरदायी आहेत’, असा स्पष्ट आरोप केला. हे सहन न होऊन लोकमान्य टिळकांनी १२.५.१९०८ च्या केसरीत ‘देशाचे दुर्दैव’ हा लेख लिहिला.

यात ते म्हणतात, ज्या तरुण बंगाली गृहस्थांनी या गोष्टी केल्या, ते काही चोर किंवा बदमाश नव्हते. बंगालमधील तरुण पिढीचा गुप्त कट हा जरी रशियातील बंडखोर लोकांप्रमाणे अधिकार्‍यांचा गुप्त खून करण्याकरिता झाला असला, तरी तो स्वार्थाकरिता नसून अनियंत्रित आणि बलाढ्य अशा गोर्‍या अधिकारी वर्गाच्या एकमुखी सत्तेने उत्पन्न झालेला आहे, हे त्यांनी दिलेल्या जबान्यांवरून स्पष्ट होते. मनुष्यमात्राच्या सहनशीलतेलाही काही मर्यादा आहे, ही गोष्ट अनियंत्रित सत्ता चालवणार्‍या राज्यकर्त्यांनी सदा लक्षात ठेवली पाहिजे. एका देशाने दुसर्‍या देशावर राज्य करण्यात स्वार्थ हाच राज्यकर्त्यांचा प्रधान हेतू असतो. राज्यकर्त्या अधिकार्‍यांचा खून न होण्यास प्रजेने साहाय्य करावे, हा प्रजेचा ज्याप्रमाणे धर्म आहे, त्याचप्रमाणे राज्यपद्धती अविचारी न ठेवता सध्याच्या कालमानाप्रमाणे लोकमताचा त्यात समावेश करणे, हे राज्यकर्त्यांचेही कर्तव्य आहे. यानंतर ९.६.१९०८ ला ‘हे उपाय टिकाऊ नाहीत’ हा दुसरा लेख केसरीत लिहिला. त्यात ते म्हणतात, ‘दडपशाहीचे भूत पाच-दहा वर्षांनी हिंदुस्थान सरकारच्या अंगात संचार करत असते. आपल्या बुद्धीचा, शरिराचा आणि स्वार्थत्यागाचा उपयोग आपल्या देशाचे कल्याण करण्याच्या कामी माथेफिरूपणाशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने होणार नाही, अशी तीव्र निराशा झाल्यानंतर चळवळ करणारे माथेफिरू होतात. जागृतीची क्रिया बंद पाडण्यासाठी वर्तमानपत्रांचे नवे दंडविधान शासनाने संमत केले आहे. त्यामुळे निराशेचे स्वरूप अधिक भयंकर होऊन विचारी अन् शांत स्वभावाच्या लोकांतही माथेफिरू निर्माण होण्याचा संभव आहे. बाँबगोळे नाहीसे करण्यासाठी खरा अन् टिकाऊ उपाय म्हणजे स्वराज्याचे महत्त्वाचे अधिकार देण्यास आरंभ करणे, हा होय.

– डॉ. सच्चिदानंद शेवडे (‘वाचा आणि गप्प बसा’, दैनिक तरुण भारत, बेळगाव आवृत्ती (७.९.२००८))

Leave a Comment