क्रांतीकारकांची वैशिष्ट्यपूर्ण क्रांतीगाथा

हुतात्मा बाल क्रांतीकारक !

‘ऑगस्ट १९४२ मध्ये ‘चले जाव’ चळवळ देशभरात सुरू झाली. या चळवळीला शाळकरी मुलांनीही प्रतिसाद दिला. शाळकरी मुलांपैकी काहींनी चळवळीत सक्रीय सहभाग घेतला, तर काहींनी या काळात क्रांतीकार्य केले. भारतीय क्रांतीकारकांच्या दिव्य हौतात्म्यातून प्रेरणा घेऊन मिसरूडही न फुटलेली अनेक कोवळी मुले पोलिसी गोळीबाराला धैर्याने सामोरी गेली. त्यांचे हौतात्म्य सर्वपक्षीय राज्यकर्ते विसरले, तरी आपण ते विसरून चालणार नाही. किंबहुना तसे करणे म्हणजे देशासाठी बलीदान करणार्‍या बाल क्रांतीकारकांविषयी कृतघ्नपणा होईल !

१. सुशील सेन

२६ ऑगस्ट १९०७. कोलकाता येथील न्यायालयात अरविंद घोष यांच्यावर अभियोग (खटला) चालू होता. बाहेर जमलेल्या समुदायाने ‘वन्दे मातरम्’ च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून सोडले. त्या देशभक्तांवर इंग्रज शिपाई अंदाधुंद लाठीमार करू लागले. १५ वर्षांच्या सुशील सेन याला ते पहावले नाही. त्याने एका धिप्पाड शिपायाला हातानेच तडाखा लगावला ! पुन्हा एकदा ! आणखी एक !!

बाकीच्या शिपायांनी सुशीलला घेरले आणि रक्तबंबाळ होईपर्यंत मारले. दुसर्‍या दिवशी न्यायालयाने सुशीलला १५ फटक्यांची कठोर शिक्षा दिली. धीरोदात्तपणे सुशीलने ती भोगली !

सुशीलचे हे वर्तन पाहून आजही म्हणावेसे वाटते –

मुक्या मनाने किती उडवावे शब्दांचे बुडबुडे।
तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे॥

नारायण दाभाडे
हा नववीत शिकणारा विद्यार्थी ९.८.१९४२ या दिवशी पुण्यातील काँग्रेस कार्यालयाजवळ निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात घायाळ होऊन जागीच ठार झाला.

दत्तू रंगारी
हिंदुस्थानी क्रांतीकारकांच्या दिव्य हौतात्म्यातून प्रेरणा घेऊन मिसरूडही न फुटलेली अनेक कोवळी मुले ऑगस्ट १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत इंग्रज पोलिसांच्या गोळीबाराला धैर्याने सामोरी गेली. दत्तूरंगारी हा बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल या गावातील अवघ्या १३ वर्षांचा मुलगा. २३ ऑगस्ट १९४२ या दिवशी झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात दत्तू रंगारी वीरगती पावला !

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार ।
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार ॥
खळखळू द्या या अदय*शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात ?

* निर्दय

काशिनाथ पागधरे
ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील सातपाटी या गावच्या या तरुणाने वयाच्या १४ व्या वर्षापासून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यास आरंभ केला होता. १९४०च्या एका सत्याग्रहात सहभागी झाल्यामुळे त्याला सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ‘चले जाव’ चळवळीत १४.८.१९४२ या दिवशी त्याने पालघरच्या मामलेदार कचेरीवर चार सहस्र जनसमुदाय घेऊन मोर्चा काढला. या मोर्च्यावर झालेल्या गोळीबारात पागधरे जागीच ठार झाला.

शंकर दादाजी महाले
हा इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झालेला १७ वर्षे वयाचा गिरणी कामगार. ९, १० आणि ११.८.१९४२ असे तीन दिवस नागपूरमधील आंदोलकांनी हरताळ पाळून सभा घेतल्या आणि शासकीय कार्यालये अन् पोलीस चौक्या यांवर मोर्चे काढले. या आंदोलकांवर शासनाने केलेल्या गोळीबारात अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले. शंकर महालेला एका पोलीस शिपायाच्या हत्येस उत्तरदायी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ जानेवारी १९४३ या दिवशी नागपूरच्या कारागृहात त्याच्यावरील फाशीची कार्यवाही करण्यात आली.’

भास्कर कर्णिक

भास्कर हा मुंबई विद्यापिठाची विज्ञान शाखेची पदवी उच्च श्रेणीत मिळवलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुद्धीमान तरुण. शिक्षणानंतर पुण्याच्या दारूगोळा अन् स्फोटके यांची निर्मिती करणार्‍या कारखान्यात तो नोकरीला लागला. बेचाळीसच्या चळवळीतील भूमीगत कार्यकर्त्यांनी पुण्याच्या चित्रपटगृहाच्या मालकांना ‘चित्रपट संपल्यावर ‘वन्दे मातरम्’ हे गीत वाजवले जावे’, असे कळवले; परंतु या चित्रपटगृहात बहुसंख्य गोरे अधिकारी येत असल्याने त्या मालकांनी ‘वन्दे मातरम्’ गीत वाजवण्यास नकार दिला. मग या चित्रपटगृहात बाँबस्फोट घडवून गोर्‍या लोकांना मारण्याचा कट क्रांतीकारकांनी रचला. या कामी स्फोटके पुरवण्याचे काम भास्करने केले. २४.१.१९४३ या दिवशी ‘कॅपिटॉल’ चित्रपटगृहात भूमीगत कार्यकर्त्यांनी केलेल्या बाँबस्फोटात काही गोरे अधिकारी ठार झाले. या कटाच्या संबंधात भास्करला अटक करण्यात आली. ‘आपल्याकडून चळवळीतील भूमीगत कार्यकर्त्यांची नावे छळ करून वदवून घेतील’, या जाणिवेने स्वच्छतागृहात जाऊन सायनाईड हे विषारी द्रव घेऊन त्याने मृत्यूला कवटाळले.

हेमू

हा ‘स्वराज्य सेना’ या संघटनेचा सदस्य. २३.१०.१९४२ या दिवशी सैनिकांनी भरलेली रेल्वेगाडी उडवण्याच्या हेतूने रुळावरील फिशप्लेट्स काढण्याच्या प्रयत्नात असतांनाच हेमूला अटक झाली. हेमूची सैनिकी न्यायालयापुढे चौकशी होऊन त्यास फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. अवघ्या १८ वर्षांचा हा तरुण २१.१.१९४३ या दिवशी सक्कर कारागृहात ‘ब्रिटीश साम्राज्य नष्ट होवो’, अशा घोषणा देत फाशी गेला.

संदर्भ : झुंज क्रांतीविरांची

Leave a Comment