Menu Close

हिंदू जनजागृती समितीच्या प्रयत्नांना यश : महामार्गावरील साईनबोर्डवर ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘अहिल्यानगर’ लिहिण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आदेश

हिंदु जनजागृती समितीकडून निवेदनाद्वारे पाठपुरावा

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले (उजवीकडे) यांना निवेदन देताना हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी

मुंबई – राज्यशासनाने आपला गौरवशाली इतिहास जपण्यासाठी अनेक शहरांची परकीय आणि जुनी नावे पालटून त्यांना नवीन अधिकृत नावे दिली आहेत. यामध्ये ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘अहमदनगर’चे ‘अहिल्यानगर’, ‘उस्मानाबाद’चे ‘धाराशिव’, तसेच ‘इस्लामपूर’चे ‘ईश्वरपूर’ आणि ‘वेल्हे’चे ‘राजगड’ असे नामकरण करण्यात आले आहे; मात्र महामार्गांवरील दिशादर्शक फलकांवर अद्यापही जुनी आणि परकीय नावे सर्रास झळकत आहेत. जुनी नावे तत्काळ हटवून त्याजागी शासनाने संमत केलेली नवीन नावे लिहावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. याची गंभीर नोंद घेत मंत्री महोदयांनी ‘ही नावे पालटली पाहिजेत, यामध्ये तातडीने कारवाई झाली पाहिजे’, असे सांगितले. यासंदर्भात ‘सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना आदेश देऊन लगेच कारवाई करण्यासाठी सांगतो’, असे आश्वासनही त्यांनी दिले. निवेदन देतांना समितीचे मुंबई येथील श्री. सतीश सोनार, श्री. अरविंद पानसरे आणि श्री. रवींद्र नलावडे प्रामुख्याने उपस्थित होते, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली आहे.

अशा प्रकारचे आदेश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्रीश्री. इंद्रनील नाईक यांनीही दिले आहेत. राज्यशासनाने रीतसर शासन निर्णय आणि राजपत्र प्रसिद्ध करून या नवीन नावांना कायदेशीर मान्यता दिलेली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,

१. एकदा राजपत्र काढून नावात पालट केल्यानंतर सर्व शासकीय दप्तरी आणि सार्वजनिक फलकांवर नवीन नावांचा वापर करणे प्रशासनाला कायदेशीररित्या बंधनकारक असते. असे असतांनाही जुन्या नावांचे फलक तसेच ठेवणे, हा अधिकृत शासकीय निर्णयाचा प्रशासकीय अवमान आहे.

२. मार्गदर्शक तत्त्वे आणि बांधकाम विभागाची कार्यपद्धत यांनुसार दिशादर्शक फलक अद्ययावत् नसणे ही प्रवाशांची दिशाभूल असून राजपत्रित आदेशाचे पालन न करणे, ही संबंधित अधिकार्‍यांची थेट दायित्वशून्यता ठरते.

३. दिशादर्शक फलकांवरील नावांचा विषय केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते विकास महामंडळ यांनी जुने फलक हटवून नवीन नावे अद्ययावत करण्यासाठी तात्काळ परिपत्रक काढावे.


२६ जून

महामार्गांवरील फलकांवर ‘अहिल्यानगर’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर’ नावे त्वरित लावावीत !

हिंदु जनजागृती समितीची अहिल्यानगर येथे निवेदनाद्वारे मागणी !

निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना निवेदन देतांना (डावीकडून) सर्वश्री बापू ठाणगे, रामेश्वर भुकन, संजय जोशी

अहिल्यानगर – ‘अहमदनगर’चे ‘अहिल्यानगर’ आणि ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण होऊन बराच कालावधी लोटला; मात्र विविध राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील दिशादर्शक फलकांवर अजूनही जुन्याच नावांचा उल्लेख आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो. अधिकृत शासकीय निर्णयाची प्रभावी कार्यवाही झालेली दिसत नाही.

या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथे जाणार्‍या सर्व महामार्गांवरील दिशादर्शक अन् अंतर दर्शवणारे फलक, तसेच शहरांच्या हद्दीतील जुने फलक पालटून नव्या नावांचे फलक तातडीने लावावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना देण्यात आले. ‘प्रशासनाने येत्या ७ दिवसांत कार्यवाही चालू न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल’, अशी चेतावणीही निवेदनातून देण्यात आली आहे.

गीते यांनी निवेदन स्वीकारून यासंदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री रामेश्वर भुकन, जिल्हा हिंदु संघटक बापू ठाणगे, हिंदुत्वनिष्ठ संजय जोशी, दिगंबर गेंट्याल, चैतन्य शेकडे, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Latest News