देवस्थानाच्या भूमींचे रक्षण होण्यासाठी प्रयत्न करणारे विश्वस्त आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांचे अभिनंदन !

अमरावती – अचलपूर तालुक्यातील मौजा काकडा येथील श्री मारोती संस्थानाच्या (श्रीराम आणि हनुमान मंदिर) मालकीची शेतभूमी कुळ कायद्यांतर्गत खरेदी करण्याचा प्रयत्न कायदेशीर लढ्यामुळे हाणून पाडण्यात आला. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि संस्थानचे विश्वस्त यांच्या आक्षेपानंतर अचलपूरचे तहसीलदार सुदर्शन शहारे यांनी ३० जुलै २०२६ या दिवशी अर्ज नाकारत देवस्थानाच्या बाजूने निकाल दिला.
१. संस्थानाच्या मालकीची शेतभूमी कुळ कायद्यांतर्गत खरेदी करून मिळण्यासाठी पंजाबराव महादेवराव पाटील आणि इतर यांनी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. त्याला संस्थानाचे विश्वस्त आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांनी कायदेशीर विरोध दर्शवला. महासंघाच्या वतीने राज्य पदाधिकारी सर्वश्री अनुप जयस्वाल, मयुर दीक्षित आणि सुरेंद्र प्रजापती यांनी सविस्तर आक्षेप प्रविष्ट केला, तर संस्थानाच्या वतीने सर्वश्री प्रकाश बोंडे, अनिल बोंडे, गजानन बोंडे, हरीश पाटील, रामेश्वर बोरकर, राहुल वैद्य, सुनील बोंडे, देवानंद ठाकरे, प्रशांत बोंडे, सुरेश बोंडे, अविनाश बोंडे, विलास बोंडे, राधेश्याम नाथे, रामदास पांडे, प्रकाश अलाटकर यांच्यासह अन्यांनी बाजू मांडली.
२. शेतभूमीचे कुळ खरेदी प्रकरण ३० नोव्हेंबर १९६६ या दिवशी रहित झाले होते. याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. जुन्या निकालाचा संदर्भ देत, तसेच नव्याने प्रविष्ट केलेले कुळ कायद्यांतर्गत खरेदीचे प्रकरण त्वरित रहित करून ‘दप्तरी प्रविष्ट करण्याची’ (प्रकरण बंद करण्याची) मागणी महासंघाने केली.
३. दोन्ही बाजूंचे साक्षी-पुरावे पडताळल्यावर तहसीलदारांनी अंतिम आदेश पारित केला. न्यायाधिकरणाद्वारे यापूर्वीच आदेश झालेला असून तो रहित झाल्याचा पुरावा उपलब्ध नाही. परिणामी ‘अर्जदारांना ही भूमी खरेदी करण्याचे हक्क प्राप्त होत नाहीत’, असा निष्कर्ष नोंदवत तहसीलदारांनी अर्जदारांची मागणी फेटाळली.







