
कागल (जिल्हा कोल्हापूर) – कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा, तसेच हरित लवाद आणि उच्च न्यायालय यांच्या आदेशांनुसार तातडीने झाडांच्या भोवती असलेले काँक्रीटीकरण काढावे, या मागणीसाठी हिंदु विधीज्ञ परिषदेने कागल नगर परिषदेत मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना निवेदन दिले. निवेदन स्वीकारल्यावर ‘झाडांवरील खिळे, झाडांवर लावलेले विज्ञापनाचे फलक तात्काळ काढून घेऊ, तसेच झाडांभोवती असलेले सिमेंट काढण्यासाठी संबंधित विभागाला तात्काळ सूचना देऊ’, असे मुख्याधिकार्यांनी सांगितले. या प्रसंगी हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अविनाश पोवार, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. किरण कुलकर्णी, शिवसेनेचे श्री. धनाजी नांगराळे आणि श्री. वैभव आडके, हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रणव निंबाळकर, ‘ग्राहक पंचायत’चे श्री. अनिल जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. बळवंत नाडगौडा उपस्थित होते.
निवेदनात करण्यात आलेल्या काही मागण्या
१. हरित लवादाने मे २०२५ मध्ये दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करत झाडांच्या मुळांना इजा न होता काँक्रीट काढण्यात यावे आणि काँक्रीट ओतणार्या कंत्राटदारावर दंड आकारून त्यांच्या खर्चातून काँक्रीट काढण्यात यावे.
२. झाडावर ठोकलेले खिळे, जाहिरातीचे फलक आणि तारा काढण्यासाठी विशेष मोहीम राबवून संबंधित लोकांवर गुन्हे नोंद करावेत.
३. नगर परिषदेने काँक्रीटमुक्त केलेल्या झाडांची संख्या, दोषी कंत्राटदारांची नावे आणि झाडांची स्थिती संकेतस्थळावर सार्वजनिक करावी.







