Menu Close

आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांवर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

म्हापसा येथील आंदोलनात ‘उमर खालिद याला मुक्त करा’चे फलक

पणजी – राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेतील (‘नीट’ परीक्षेतील) प्रश्नपत्रिका फुटीच्या (पेपरफुटीच्या) प्रकरणी म्हापसा येथील लोहिया उद्यानात २५ जुलै या दिवशी सायंकाळी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी निदर्शने करण्यात आली. यामध्ये फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या देहली दंगलीचा कट रचणे, तसेच हिंसाचार भडकवणे यां प्रकरणी बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आलेल्या आणि सध्या कारागृहात असलेल्या उमर खालिद याच्या समर्थनार्थ फलक घेतलेले विद्यार्थी सहभागी झाले होते.

या निदर्शनात ‘आझादी हम लेके रहेंगे’च्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी एक विद्यार्थिनी ‘उमर खालीद याला मुक्त करा’, हा फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाली होती.  या आंदोलनात ‘बॉलिवूड’ अभिनेता अभिषेक बॅनर्जी यांच्यासह नेत्या सिसिल रॉॅड्रिग्ज, फ्रान्सिस कुएल्हो, राहुल म्हांब्रे, सुदीप दळवी, चेतन कामत, दुर्गादास कामत आदींचाही सहभाग होता. ‘नीट’ पेपरफुटीसंबंधी आंदोलनाचा ‘उमर खालिद’ याच्याशी कोणता संबंध आहे ? या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आंदोलन भरकटवणारे आणि देशद्रोह्यांना पाठिंबा देणारे यांच्यावर प्रशासन अन् पोलीस यांनी कारवाई करावी, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी आहे.

उमर खालिदच्या समर्थनार्थ फलक दाखवणारी व्यक्ती कह्यात

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या त्यागपत्रानंतर देहलीतील आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या गोव्यातील काही विद्यार्थ्यांनी पणजी येथील आझाद मैदानात ‘फ्री उमर खालिद, शर्जिल इमाम, भिमा कोरेगाव १६’, असा फलक घेऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा फलक ज्या व्यक्तीने घेतला होता, त्याला पणजी पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

Latest News