Menu Close

आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !

महाराष्ट्र मंदिर महासंघाने निवेदन देऊन केली होती बंदीची मागणी

पंढरपूर – आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ (२) अन्वये पंढरपूर शहरात १५ ते २९ जुलै या कालावधीत मांस, मटण, मासे विक्री, प्राणी कत्तल, तसेच मांसजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी लागू केली आहे. आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आणि भाविक पंढरपुरात येत असल्याने कायदा अन् सुव्यवस्था, तसेच धार्मिक वातावरण कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे आषाढी यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहर मद्य-मांसमुक्त घोषित करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. 

याशिवाय मानाच्या पालख्यांचा मुक्काम होत असल्याने करकंब, पांढरेवाडी, व्होळे, देवडे आणि खेडभोसे या गावांमध्ये २० ते २५ जुलै या कालावधीत वरीलप्रमाणे बंदी लागू करण्यात आली आहे. विविध सामाजिक, राजकीय संघटना, तसेच भाविक यांच्याकडून अशी मागणी करण्यात आली होती.


८ जुलै 

आषाढी यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहर मद्य-मांसमुक्त घोषित करण्याची ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी

तहसीलदार श्रीमती सरस्वती पाटील यांना निवेदन देताना हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते

सोलापूर – आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २२ ते २९ जुलै या कालावधीत पंढरपूर शहर मद्य-मांसमुक्त घोषित करावे, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली. तहसीलदार श्रीमती सरस्वती पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदनात लाखो वारकरी आणि भाविक पंढरपूर येथे येत असल्याने यात्रेची पवित्रता, सात्त्विक वातावरण आणि धार्मिक परंपरा टिकून रहाव्यात, यासाठी मद्य आणि मांसविक्रीवर बंदी घालण्याचे प्रशासकीय परिपत्रक काढावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या वेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे जिल्हा संघटक विनोद रसाळ, धनंजय बोकडे, रोहन कलशेट्टी आदी उपस्थित होते, तसेच या निवेदनावर १५ मंदिरांचे विश्वस्त, पुजारी आणि पुरोहित यांनी स्वाक्षर्‍या केल्या. यामध्ये ‘महासिद्ध देवस्थान’चे पुजारी संतोष पुजारी, ‘वैष्णव मारुति देवस्थान’चे नारायण दुभाषी, श्री हनुमान मंदिर (जोड बसवण्णा चौक) येथील श्रीनिवास गुर्रम, ‘पोषमा देवस्थान’चे प्रकाश चन्ना, व्यंकटेश देवस्थान (पाटकुल) येथील आबासाहेब शिंदे, तसेच पुरोहित संघटनेचे व्यंकटेश जिल्ला, बालराज दोन्तुल आणि विनायक कोरे यांचा समावेश आहे.

Latest News