Menu Close

तुळस (महाराष्ट्र) येथील भव्य सकल हिंदू संमेलनात हिंदू जनजागृती समितीचा सहभाग

हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करण्याचे समस्त हिंदूंना आवाहन

व्यासपिठावर डावीकडून सर्वश्री अमित नाईक, गणेश गोविंद उपाख्य राजू जोशीगुरुजी, ज्येष्ठ कीर्तनकार सुबोध मराठे, नितीन लिंगोजी आणि बोलतांना श्री. सत्यविजय नाईक

वेंगुर्ला – हिंदु समाजामध्ये एकात्मता, संघटन आणि धर्मजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाजाच्या वतीने २१ जूनच्या सायंकाळी तुळस येथील उत्सव मंगल कार्यालयात भव्य सकल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या माध्यमातून ‘हिंदु समाजाने संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प सर्वांनी करूया’,  असे आवाहन समस्त हिंदूंना करण्यात आले.

संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कीर्तनकार श्री. सुबोध मराठे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर सर्वश्री गणेश गोविंद उपाख्य राजू जोशीगुरुजी, अमित गोपाळ नाईक, नितीन लिंगोजी, हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक सत्यविजय नाईक आदी उपस्थित होते. संमेलनाच्या प्रारंभी सभागृहाबाहेर तुळस येथील उद्योजक श्री. आनंद तांडेल यांनी सपत्नीक गोमातेचे पूजन केले. तुळस, पाल, अणसूर, पेंडूर, मातोंड, होडावडा आणि वजराट या गावांतील हिंदु बांधवांच्या संयुक्त पुढाकाराने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी दाखवण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रात्यक्षिकांमुळे संमेलनात उत्साह निर्माण झाला होता.

या वेळी श्री. गणेश गोविंद उपाख्य राजू जोशीगुरुजी म्हणाले, ‘‘हिंदु धर्माचे पालन आपल्या घरापासून केले पाहिजे. संतांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे, त्यानुसार आचरण करावे.’’

ज्येष्ठ कीर्तनकार श्री. सुबोध मराठे आणि श्री. अमित नाईक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी, तर प्रास्ताविक श्री. नितीन लिंगोजी यांनी केले.

या संमेलनाला वेंगुर्ला तालुका संघचालक बाबुराव खवणेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उपाख्य बाळू देसाई, पंचायत समितीचे सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, तुळस उपसरपंच सचिन नाईक, मातोंड सरपंच मयुरी वाडाचेपाटकर, पाल सरपंच कावेरी गावडे, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, वजराट सरपंच अनन्या पुराणिक, होडावडा उपसरपंच राजबा सावंत यांच्यासह हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदु समाज संघटित असेल, तर राष्ट्र अधिक सक्षम होऊन सुरक्षित राहील ! – श्री. सत्यविजय नाईक

या वेळी श्री. सत्यविजय नाईक म्हणाले, ‘‘आपली संस्कृती, परंपरा, भाषा, सण-उत्सव आणि धार्मिक मूल्ये जपण्याचे दायित्व प्रत्येक हिंदूचे आहे. हिंदु समाज संघटित असेल, तर राष्ट्र अधिक सक्षम आणि सुरक्षित राहील. आपल्या संतांनी नेहमीच समाजाला एकतेचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून धर्म, संस्कृती आणि स्वाभिमान यांचे रक्षण केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही समाजहितासाठी कार्यरत राहिले पाहिजे.’’

Latest News