Menu Close

भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ मोडून काढणे आवश्यक – हिंदु जनजागृती समिती

‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया करच’ – श्री. रमेश शिंदे

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. योगेश केरकर, श्री. निरंजन शिंदे, बोलतांना श्री. रमेश शिंदे, श्री. शिवानंद स्वामी, श्री. संभाजीराव भोकरे, श्री. गजानन गुरव, मागील बाजूस श्री. अशोक गुरव आणि श्री. किशोर घाटगे

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’ने ‘हलाल’ प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले आहे. ‘हलाल’प्रमाणपत्र देणारी ‘जमियत उलेमा हिंद’ ही संघटना ७०० हून अधिक आतंकवाद्यांचे खटले लढवते आणि हा पैसा जे प्रमाणपत्र घेतात त्यांच्या माध्यमातून गोळा करत आहे. सामान्य शेतकर्‍याला अंधारात ठेवून ‘गोकुळ’चा पैसा ‘हलाल’साठी वापरणे ही लाखो शेतकऱ्यांची फसवणूकच आहे ! वर्ष २०१३ मध्ये चालू झालेली हलाल अर्थव्यवस्था आज जागतिक स्तरावर २.१ अमेरिकन ट्रिलियन डॉलर्सपर्यंत (१७९.६ लाख कोटी रुपये) पोचली आहे. हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘हलाल टॅक्स’ हा प्रत्यक्षात हिंदूंसाठी ‘जिझिया कर’च आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ मोडून काढणे आवश्यक असून त्यासाठी भारत देश ‘हलाल’मुक्त झाला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

ते कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी ‘हिंदू एकता आंदोलना’चे श्री. गजानन गुरव, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव उपस्थित होते.

या वेळी श्री. रमेश शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे देशातील ५ व्या क्रमांकाचे दूध उत्पादक राज्य आहे. राज्यात होणार्‍या एकूण उत्पन्नाच्या २.५ दशलक्ष लिटर दुधाची कमतरता आपल्याला असून अशा स्थितीत आपल्याला दूध निर्यात करण्याची आवश्यकताच काय ? जगातील १९२ देशांनी जर ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ (FSSAI) ला मान्यता दिली आहे, तर भारतात मात्र धर्मावर आधारीत ‘हलाल’ प्रमाणपत्राला आपण मान्यता का देतो ? ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ने जे एखाद्या पदार्थाच्या सर्व चाचण्या केल्यावर ‘यात मांसाशी संबंधित कोणतेही पदार्थ नाही’, असे सांगितले, तर त्यांच्यावर विश्वास न ठेवता आणखी एका ‘हलाल’ प्रमाणपत्राची आवश्यकता काय?

प्रारंभी केवळ ‘मांसापुरती’ मर्यादित असलेले ‘हलाल प्रमाणपत्र’ दूध, तुलसी अर्क, साखर, ‘डेटिंग ऍप’, निवासी संकुल, शेअर बाजार यांपासून आज बहुतांश प्रत्येक जीवनोपयोगी उत्पादन ‘हलाल प्रमाणित’ आहे. हिंदू घेत असलेली जवळपास प्रत्येक वस्तू ‘हलाल’असून हिंदूंच्या खिशातून जाणारा पैसा हा ‘हलाल’साठी खर्च केला जातो. ‘हलाल’मध्ये केवळ मुसलमानांच्या धार्मिकतेचा विचार केला असून यात हिंदूंसाठी पवित्र असलेली गोमातेच्या संदर्भातील कोणतेही उत्पादन वापरले जाणार नाही याची कोणतीही खात्री देत नाही, असेही श्री. शिंदे यांनी या वेळी सांगितले.

Related News