मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी

पणजी : गोव्यात मद्यविक्रीच्या दुकानांना हिंदु देवतांची नावे वापरण्यावर बंदी घालावी. धर्मातील पूजनीय व्यक्ती, देवता किंवा धार्मिक प्रतिके यांचा मद्यविक्री व्यवसायासाठी वापर केला जाऊ नये, यासाठी सरकारने स्पष्ट नियम सिद्ध करावे, अशी मागणी गोमंतक मंदिर महासंघाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन देतांना गोमंतक मंदिर महासंघाच्या शिष्टमंडळामध्ये गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी, हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक श्री. गोविंद चोडणकर, श्री. युवराज गावकर, श्री. रघुनाथ मडकईकर आणि सौ. विशाखा म्हांबरे यांचा समावेश होता.

गोमंतक मंदिर महासंघाच्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, सध्या गोव्यात अनेक ठिकाणी मद्यविक्रीच्या दुकानांना हिंदु देवतांची नावे किंवा हिंदूंच्या धार्मिक प्रतिमांचा संदर्भ वापरून नावे दिली जात आहेत. हा धार्मिक भावना दुखावणारा प्रकार आहे. हिंदु धर्मामध्ये देवतांना सर्वाेच्च आदराचे स्थान आहे आणि यामुळे देवतांचे नाव मद्यविक्री व्यवसायाला दिल्याने देवतांचा अनादर होण्याबरोबरच समाजात चुकीचा संदेश जात आहे. सरकारने मद्यविक्रीच्या दुकानांना हिंदु देवतांची नावे वापरण्यास अनुमती देऊ नये आणि सध्या मद्यविक्रीच्या दुकानांना अशी नावे असल्यास संबंधितांना ती त्वरित पालटण्यासाठी निर्देश द्यावे. भविष्यात असा प्रकार न होण्यासाठी कठोर कायदा करावा.







