Menu Close

एन्.सी.ई.आर्.टी.च्या ८ वीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि माहिती देणारा नकाशा त्वरित पुन्हा समाविष्ट करावा – हिंदु जनजागृती समिती

शासन आणि प्रशासन यांच्याकडे मागणी  

‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ म्हणजे एन्.सी.ई.आर्.टी.कडून शालेय पाठ्यक्रम पुस्तकातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास सांगणारा ‘अटक ते कटक’ असा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्यात आला. एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता ८ वीच्या पाठ्यपुस्तकातून वगळलेला हा मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा तात्काळ समाविष्ट करावा, या मागणीचे निवेदन देशाचे पंतप्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री, सचिव शिक्षण विभाग भारत सरकार यांच्या नावे आधिकाऱ्याना देण्यात आले. 

सांगली

‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) इतिहासविरोधी आणि मनमानी निर्णयाचा निषेध करण्यासाठी सांगली येथे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने १ मे या दिवशी भव्य ‘मराठा साम्राज्य सन्मान’ राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे यांसह विविध सरदारांचे वंशज आणि इतिहास संशोधक यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन चौगुले यांनी दिली.

श्री. नितीन चौगुले म्हणाले की, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान प्रतिवर्षी ‘हिंदवी स्वराज्य सेनेचा पराक्रम विश्वाला सांगणारी मोहीम’ आयोजित करते. यापूर्वी पानिपत, गोवळकोंडा, सुरत आणि गोमंतक (गोवा) या ठिकाणी संघटनेने मोहिमेचे आयोजन केले आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानसह इतिहास संशोधक, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक संघटना यांनी ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ८ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून वर्ष १७५९ चा मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

श्री. नितीन चौगुले पुढे म्हणाले की, वर्ष १७५९-१७६० या कालखंडात मराठा साम्राज्याने उत्तर भारतात अटकेपार झेंडे लावून प्रभावी वर्चस्व प्रस्थापित केले होते. राजस्थान, माळवा, बुंदेलखंड, देहली आणि पंजाबपर्यंत मराठ्यांचे अधिराज्य होते. याचे पुरावे पेशवे दप्तर, तहपत्रे, महसूल नोंदी आणि समकालीन अभिलेख यांमध्ये स्पष्ट आहेत. कोणताही सल्लामसलत न करता घेतलेला हा निर्णय शैक्षणिकदृष्ट्या त्रुटीपूर्ण आणि घटनाविरोधी आहे.

वर्ष १७५९ चा मराठा साम्राज्याचा नकाशा पाठ्यपुस्तकात तात्काळ पुनर्स्थापित करावा, इतिहासकारांची स्वतंत्र समिती नेमावी आणि केंद्र सरकारने यात तात्काळ हस्तक्षेप करून स्पष्टीकरण द्यावे. जर या मागण्या अमान्य झाल्या, तर १ मेच्या मोर्च्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल. प्रसंगी सरकारविरुद्ध न्यायालयीन लढा उभारण्याची चेतावणीही श्री. चौगुले यांनी दिली आहे.

रत्नागिरी

जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे साधक

एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता ८ वीच्या पाठ्यपुस्तकातून वगळलेला मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा तात्काळ समाविष्ट करावा, या मागणीचे निवेदन देशाचे पंतप्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री, सचिव शिक्षण विभाग भारत सरकार यांच्या नावे येथील जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्याकडे १७ एप्रिलला देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे गोविंद भारद्वाज, गणपत निवळकर, छगनलाल चव्हाण, अरविंद बारस्कर, संजय पावस्कर, संजय जोशी, मंगेश राऊत आणि अमितराज खटावकर उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की,

राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन प्रशिक्षण संस्था (एन्.सी.ई.आर्.टी.) ने इयत्ता ८ वीच्या ‘हमारे अतीत’ या समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळल्याचे निदर्शनास आले आहे. ही कृती केवळ शैक्षणिक चूक नसून ती भारताच्या वैभवशाली इतिहासाचे पद्धतशीर खच्चीकरण करण्याचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ प्रादेशिक सत्ता नव्हती, तर ती आक्रमक परकीय शक्तींविरुद्ध उभारलेली एक सांस्कृतिक आणि नैतिक क्रांती होती. हा नकाशा वगळण्याचा निर्णय घेणार्‍या दायित्वशून्य अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे जर एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकांमध्ये आजही अनेक ठिकाणी मोगल आक्रमकांना महान ठरवले गेले असेल, तर केवळ हा नकाशाच नव्हे, तर संपूर्ण पाठ्यपुस्तकांचे तज्ञांकडून पुनरावलोकन करण्यात यावे. जर इतरही महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ, किल्ले किंवा क्रांतीकारकांची माहिती वगळली असेल, तर ती त्वरित समाविष्ट करण्यात यावी.

Latest News