-
काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांना हिंदू रक्षा महाआघाडीचे सडेतोड प्रत्युत्तर !
-
सी-कॅथेड्रल चर्चपासून प्रारंभ करण्याची मागणी

पणजी (गोवा) – ‘हात कातरो खांब प्रकरणाविषयी कोणतेही पुरावे नाहीत, निर्णय पुराव्यावर आधारित असावा’, असे आमदार कार्लुस फेरेरा यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षा महाआघाडीने ठोस भूमिका मांडली आहे. निर्णय खरोखरच पुराव्यावर आधारित घ्यायचा असेल, तर संभाव्य पुरावे जिथे असल्याचा दावा केला जातो, त्या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करणे आवश्यक असल्याचे महाआघाडीने स्पष्ट केले आहे.
हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य सहसमन्वयक श्री. नितीन फळदेसाई यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे,‘‘ हात कातरो खांबाच्या संदर्भातील पुरावे गोव्यातील जुन्या चर्च आहेत, त्या खाली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काही वर्षांपूर्वी माजी पुरातत्व खाते प्रमुख के.के. महंमद यांनी या संदर्भात प्रयत्न केले होते; मात्र त्या वेळी तत्कालीन काँग्रेस सरकारने ती प्रक्रिया रोखली होती. त्यामुळे ‘पुरावे नाहीत’ असे सरसकट सांगण्याऐवजी वैज्ञानिक पडताळणी करून वस्तूस्थिती समोर आणणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य उत्खनन प्रक्रियेचा प्रारंभ सॅ-कॅथेड्रल चर्चचा परिसर आणि पालास द इन्क्विझिशनच्या जागी करावा, अशी मागणी हिंदू रक्षा महाआघाडीने केली आहे.
पुरातत्व विभाग, इतिहासतज्ञ आणि तांत्रिक तज्ञ यांच्या देखरेखीखाली पारदर्शक पद्धतीने उत्खनन केल्यास सत्य समोर येईल आणि चालू असलेल्या वादावर अंतिम निर्णय घेता येईल, असेही हिंदू रक्षा महाआघाडीने नमूद केले.
हिंदू रक्षा महाआघाडीच्या प्रमुख मागण्या
१. संभाव्य पुरावे असलेल्या चर्च परिसरात वैज्ञानिक उत्खननास अनुमती द्यावी.
२. तंत्र तज्ञ समिती नेमून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवावी.
३. सॅ-कॅथेड्रल येथून उत्खननाला प्रारंभ करावा.
४. संपूर्ण अहवाल सार्वजनिक करून अंतिम निर्णय पुराव्यावर आधारित घ्यावा.
पुराव्यावर आधारित निर्णयाची भूमिका मांडली जात असेल, तर उत्खननास अनुमती देणे, हाच सर्वांत योग्य मार्ग असल्याचे नितीन फळदेसाई यांनी स्पष्ट केले. सत्य समोर आणण्यासाठी वैज्ञानिक तपासणी आवश्यक असून यामुळे जनतेतील संभ्रम दूर होण्यास साहाय्य होईल, असेही महाआघाडीने नमूद केले.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात







