Menu Close

संतांच्या प्रयत्नांमुळे देशभरात धर्मांतरित पुन्हा हिंदु धर्मात येण्याची प्रक्रिया वेगात – आलोक कुमार

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. मोहन आमशेकर, अधिवक्ता आलोक कुमारजी आणि श्री. संजय मुद्राळे

फोंडा (गोवा) – विविध संप्रदायांतील संतांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे देशभरात धर्मजागृतीचे व्यापक वातावरण निर्माण होत असून देशभरातील गावांमधून घरवापसीची (धर्मांतरित व्यक्ती पुन्हा हिंदु धर्मात येण्याची) प्रक्रिया वेगात चालू आहे, असे वक्तव्य विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष असलेले अधिवक्ता आलोक कुमार यांनी केले. गोव्यात कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे गोवा विभाग मंत्री श्री. मोहन आमशेकर, धर्माचार्य संपर्क प्रमुख श्री. परशुराम दुबे, तसेच गोवा मंदिर-अर्चक संपर्क प्रमुख श्री. श्याम नाईक यांची उपस्थिती होती.

अधिवक्ता आलोक कुमार पुढे म्हणाले, ‘‘नुकत्याच मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या भागांत पार पडलेल्या ५ दिवसीय संतसंवाद प्रवासाच्या कालावधीत संत समाज आता समाजजागरणाच्या कार्यात सक्रीयपणे पुढे येत असल्याचा स्पष्ट अनुभव आला. देशभरात संतदर्शन आणि संतसंवाद यांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येणार असून या माध्यमातून संत समाज धर्मांतरासारख्या विषयांवर समाजात जागृती निर्माण करेल आणि लोकांना त्यांच्या मूळ संस्कारांकडे परतण्यास प्रेरित करेल.’’

धर्मांतराच्या विरोधात विश्व हिंदु परिषदेचे प्रयत्न

ते पुढे म्हणाले, ‘‘जे लोक परत येऊ इच्छितात, त्यांना धार्मिक संस्कार आणि शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे सन्मानपूर्वक स्वीकारले जाईल. देशभरातील संत या कार्यात पुढे येत आहेत आणि त्यांच्या सहकार्याने परिषद हा उपक्रम देशव्यापी स्वरूपात राबवत आहे. संत संवादासारख्या उपक्रमांमुळे हे कार्य अधिक व्यापक होईल. धर्मजागृतीच्या वाढत्या प्रभावामुळे समाजामध्ये मूळ संस्कारांबद्दल आकर्षण वाढत असून येत्या काळात घरवापसीच्या प्रयत्नांना आणखी वेग मिळेल.’’

अधिवक्ता आलोक कुमार यांनी घेतले सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी यांचे आशीर्वाद !

अधिवक्ता आलोक कुमार यांना गोव्याशी संबंधित ग्रंथ भेट देतांना सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी

कुंडई – श्री. आलोक कुमार यांनी कुंडई येथील श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी लोककल्याणकारी आणि राष्ट्रोत्थानासंबंधी विविध विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. याप्रसंगी गोवा प्रदेश प्रांत प्रमुख श्री. मोहन आमशेकर, श्री दत्त पद्मनाभ पीठाचे केंद्रीय पदाधिकारी, कृपाकांक्षी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी आलोक कुमार म्हणाले, ‘‘आपला हिंदु धर्म पुढच्या पिढ्यांना चांगल्या प्रकारे समजावा, यासाठी आई-वडिलांनी मुलांना लहानपणीच ॠषिमुनी, साधूसंत, वीर पुरुष यांच्या कथा सांगायला प्रारंभ केला पाहिजे. चराचरांमध्ये भगवंताचा वास आहे, असा मानणारा हिंदु समाज आहे, तर प्रत्येकाला वेद शिकण्याचा अधिकार आहे. सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामीजींचे दर्शन तथा मार्गदर्शन यांखाली जे काही विषय समाजापुढे चालले आहेत, त्यावर चर्चा करण्यासाठी आज मी तपोभूमी गुरुपीठावर आलो होतो. पूज्य स्वामीजी विश्व हिंदु परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आहेत.’’

सद्गुरु ब्रह्मेशानंदस्वामीजी म्हणाले, ‘‘हिंदूंनी दुसर्‍या धर्मातील लोकांना आपल्या धर्मात आणण्यासाठी युद्ध केले नाही, प्रयत्नही केला नाही. आपले साधूसंत, ॠषिमुनी आपल्याला सांगतात की, मरण पत्कारावे लागले तरी चालेल; पण दुसर्‍या धर्मात जायचे नाही. आज सर्वांनी लोकांना जागृत करण्याची आवश्यकता आहे.’’

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Latest News