Menu Close

गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी अखेर ६ महिन्यानंतर समितीची स्थापना

कोल्हापूर – राज्यातील सर्व गड-दुर्गांच्या संदर्भात शासनाने एक आदेश दिला केला असून सर्व गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात एक समिती नेमण्याचे परिपत्रक शासनाने जानेवारी मासात प्रसारित केले होते. यावर कृती करत तब्बल ६ महिन्यांनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने समितीची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या या १४ सदस्यीय समितीत १० सदस्य प्रशासकीय अधिकारी असून ४ सदस्य हे अशासकीय सदस्य आहेत. निवासी उपजिल्हाधिकार्‍यांकडे याचे सचिव पद देण्यात आले आहे.

या ४ सदस्यांमध्ये ‘कोल्हापूर हिल रायहर्स फाऊंडेशन’चे श्री प्रमोद पाटील आणि श्री. राम यादव, गडहिंग्लज येथील ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’चे श्री. संतोष हासूरकर, तसेच कोल्हापूर येथील मोडी लिपिक अभ्यासक श्री. अमित अडसूळ यांचा समावेश आहे.

१. वस्तूत: या समितीने ३१ मेपर्यंत कालबद्ध पद्धतीने अतिक्रमणे हटवण्याचे काम करावे आणि वेळोवेळी केलेल्या कामांचा अहवाल शासनास सादर करावा, असे नमूद केले होते; मात्र जुलै महिन्यात ही समिती स्थापन झाली आहे. आता या समितीची बैठक होईल. यानंतर अतिक्रमणांवर चर्चा होऊन प्रत्यक्ष कारवाई होईल.

२. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘१४ सदस्यीय समितीत १० सदस्य हे शासकीय अधिकारी आहेत. वस्तूत: गड-दुर्गांसाठी ज्या संघटना प्रत्यक्ष काम करतात, अशा सदस्यांची संख्या अधिक असणे अपेक्षित होते. अशासकीय सदस्यांमध्ये जे गड-दुर्गांच्या संदर्भात प्रत्यक्षात अनेक वर्षे जिवाचे रान करून काम करतात, अशा सदस्यांची नेमणूक झाली असती, तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. आता या समितीने तात्काळ बैठका घेऊन गड-दुर्गांच्या संदर्भात अतिक्रमण हटवण्याचे काम करून शिवप्रेमींना दिलासा द्यावा.’’

Latest News