Menu Close

लोणी काळभोर (पुणे) येथे आयोजित हिंदु महिला महोत्सवात हिंदु जनजागृती समितीतर्फे महिलांना मार्गदर्शन

लोणी काळभोर (जिल्हा पुणे) – गुढीपाडवा आणि हिंदु नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर ‘संस्कृती संवर्धन’ आणि ‘श्री शक्तीचा जागर’ करण्याच्या उद्देशाने येथे आयोजित ‘हिंदु महिला महोत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात पार पडला. या महोत्सवांतर्गत भव्य दुचाकी फेरी काढण्यात आली. पुष्कळ रणरागिणींनी पारंपरिक वेशभूषेत या फेरीत सहभागी होऊन हिंदुत्वाचा जयघोष केला. फेरीच्या सांगता समारंभात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. समितीच्या  कु. प्राची शिंत्रे यांनी सांगितले की, आजच्या असुरक्षित वातावरणात केवळ शारीरिक सक्षमता पुरेशी नसून धर्माचरण आणि धर्मशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा आयोजनात सहभाग होता.

शौर्य प्रशिक्षण शिबिराचा अनुभव !

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे कु. आर्या पाठक हिचे अनुभवकथन ! कसबा पेठ येथे झालेल्या शौर्य प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या आर्याने स्वत:चा अनुभव मांडतांना सांगितले की, प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. येणार्‍या संकटांचा सामना करण्यासाठी प्रत्येक युवतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक असून समितीच्या कार्यात सहभागी व्हावे, असे तिने आवाहन केले.

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग

या कार्यक्रमाला ‘अहिल्यादेवी सेवा समिती’, राष्ट्र सेवा समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसह अनेक संघटनांच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यामध्ये अहिल्यादेवी शाखा, लोणी काळभोर येथील प्रमुख पदाधिकार्‍यांचा सक्रीय सहभाग होता. प्रामुख्याने सौ. संध्या विशाल वेदपाठक (अहिल्यादेवी शाखा कार्यवाहिका तथा लष्कर भाग सेवाप्रमुख) आणि सौ. भाग्यश्री हरिश्चंद्र भिकोले (अहिल्यादेवी शाखा बौद्धिक प्रमुख तथा लष्कर भागसह बौद्धिक) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कदम वाकवस्ती आणि लोणी काळभोर येथील समस्त हिंदु महिलांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला.

Latest News