Menu Close

सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवप्रेमींकडून स्वच्छता मोहीम

हिंदु जनजागृती समितीद्वारे ‘एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सान्निध्यात’ मोहीम

मालवण – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३० नोव्हेंबर २०२५ या दिवशी ‘एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सान्निध्यात’ या मोहिमेच्या अंतर्गत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. याला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री भवानीमाता यांच्या चरणी पुष्पहार अन् श्रीफळ अर्पण करून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर किल्ल्यातील पालापाचोळा आणि प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला, तसेच गवत काढून काटेरी झुडपे तोडण्यात आली. या वेळी श्री भवानीदेवीचा नामजप, गड भ्रमंती, स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून बलोपासना करण्यात आली. जिल्ह्यातील ५० हून अधिक शिवप्रेमींनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. उपस्थित सर्वांनी श्री भवानीदेवीचा भावपूर्ण नामजप केला. या वेळी शिवप्रेमींना गडावरील स्थानिक शिवप्रेमी श्री. हितेश वायंगणकर यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास सांगितला.

मोहीम यशस्वी होण्यासाठी श्री शिवराजेश्वर मंदिराचे अध्यक्ष आणि मुख्य पुजारी श्री. सयाजी सकपाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन सर्व शिवप्रेमी हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध झाले.

वैशिष्ट्यपूर्ण

किल्ल्यावरील स्थानिक व्यावसायिकांनी समितीच्या या उपक्रमाचे पुष्कळ कौतुक केले. ‘याआधी अनेक संघटना यायच्या; पण तुम्ही पुष्कळ चांगल्या प्रकारे स्वच्छता केली’, असे व्यावसायिकांनी सांगितले.

Latest News