Menu Close

#ShameOnYouRanveerSingh : हिंदूंच्या विरोधानंतर आणि HJSच्या तक्रारीमुळे अभिनेता रणवीर सिंहची माफी

विरोधानंतर अभिनेता रणवीर सिंह यांनी क्षमा मागितली !

५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (‘आंचिम’मध्ये) बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यांनी चामुंडादेवीचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यांच्या विरोधात १ डिसेंबर या दिवशी सायंकाळी पणजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर अभिनेता रणवीर सिंह यांनी २ डिसेंबर या दिवशी दुपारी प्रसारमाध्यमात त्यांच्या ‘एक्स’वरील खात्यावरून ‘कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या असल्यास मी क्षमा मागतो’, असे म्हटले आहे.

गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यांनी ‘कांतारा – चॅप्टर १’ या कन्नड चित्रपटातील देवीच्या अवताराची रंगमंचावर नक्कल केली आणि चित्रपटात दाखवलेल्या पवित्र दैवत कोटीतुलू समाजातील चामुंडादेवी हिला ‘फिमेल घोस्ट’ (भूत) असे संबोधले होते. या घटनेचे तीव्र पडसाद नंतर सामाजिक माध्यमातून उमटले आणि अभिनेता रणवीर सिंह यांचा अनेकांनी निषेध केला. या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीने ‘अभिनेता रणवीर सिंह यांच्या विरोधात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवावा’, अशी मागणी करणारी तक्रार पणजी पोलीस ठाण्यात १ डिसेंबर या दिवशी नोंदवली. त्यानंतर तक्रारीचे वृत्त राष्ट्रीय प्रसारमाध्यमावर झळकले. यानंतर अभिनेता रणवीर सिंह यांनी या घटनेविषयी पुढील शब्दांत क्षमा मागितली. ‘यामागील माझा उद्देश ‘कांतारा – चॅप्टर १’ या चित्रपटातील प्रमुख कलाकार ऋषभ शेट्टी यांच्या अप्रतिम कामगिरीवर प्रकाश टाकणे हे होते.

एक कलाकार या नात्याने ऋषभ शेट्टी यांनी चित्रपटात चामुंडी देवीची भूमिका बजावणे किती कठीण आहे, हे मी समजू शकतो आणि यासाठी मला त्यांचा आदर आहे. मी माझ्या देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा यांचा नेहमी आदर राखला आहे.


हिंदु जनजागृती समितीकडून अभिनेता रणवीर सिंह यांच्या विरोधात पोलीस तक्रार !

पणजी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री. साहिन शेट्ये यांच्याकडे तक्रार वजा निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रमोद तुयेकर आणि दिलीप शेट्ये.

 

गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (‘इफ्फी’च्या) समारोप सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यांनी ‘कांतारा – चॅप्टर १’ या कन्नड चित्रपटातील देवीच्या अवताराची रंगमंचावर नक्कल केली आणि चित्रपटात दाखवलेले पवित्र दैवत कोटीतुलू समाजातील ‘श्री चामुंडी दैवा’ हिला ‘फिमेल घोस्ट’ (महिला भूत), असे संबोधले आहे. या प्रकरणी अभिनेता रणवीर सिंह यांच्यावर चामुंडी दैवाचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीने पणजी पोलीस ठाण्यात दिले आहे.

या वेळी पणजी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक साहिन शेट्ये यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रमोद तुयेकर आणि श्री. दिलीप शेट्ये यांनी हे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ‘श्री चामुंडी दैवा’ हे कर्नाटकातील तुलू समाजाचे आराध्य आणि कुलदैवत आहे. देवीला ‘भूत’ म्हणणे आणि तिच्या दैवी अवताराची करमणुकीच्या हेतूने सर्वांसमोर नक्कल करणे, ही अत्यंत अवमानकारक आणि हिंदु समाजाच्या श्रद्धास्थानावर आघात करणारी कृती आहे. या घटनेमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सार्वजनिक शांतता बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी रणवीर सिंह यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २९९, १९४, ३०२ नुसार धार्मिक भावना जाणूनबुजून दुखावणे आणि समाजात वैरभाव पसरवणे या गुन्ह्यांशी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करावी.

‘इफ्फी’चे आयोजक आणि संबंधित अधिकारी यांनीही भविष्यात अशा कार्यक्रमांत कोणत्याही धर्माच्या देवतांचा अवमान होऊ नये, यासाठी स्पष्ट आचारसंहिता सिद्ध करावी आणि त्याची काटेकोर कार्यवाही करावी. हिंदु जनजागृती समितीने ‘रणवीर सिंह यांनी सार्वजनिकरित्या श्री चामुंडी दैवाची क्षमा मागावी आणि पुढे अशा प्रकारचे वक्तव्य अथवा अभिनय न करण्याची हमी द्यावी’, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्व हिंदु बांधवांना कायद्याचा मार्ग अवलंबून शांततामय, संयमी; पण ठामपणे या अवमानाचा निषेध नोंदवण्याचे आवाहनही समितीने केले आहे.

Latest News