मुलांनो, आदर्श व्यक्‍तीमत्त्वाची गुरुकिल्ली असलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवा !

आपल्या अंतर्मनात सर्व प्रकारचे अनुभव, भावना, विचार, इच्छाआकांक्षा वगैरे सर्वकाही साठवलेले असते. असे असले, तरी त्याची कल्पना बाह्यमनाला अजिबात नसते; कारण अंतर्मन व बाह्यमन या दोहोंमध्ये एक प्रकारचा पडदा असतो. आपल्या अंतर्मनातील संस्कार आपल्या कृतीतून जेव्हा सातत्याने व्यक्‍त होतात, तेव्हा त्यांना `स्वभाव' असे म्हणतात, उदा. एखादी व्यक्‍ती लहानसहान कारणावरून रागावत असेल, तर तिला आपण रागीट स्वभावाची व्यक्‍ती म्हणतो. एखादी व्यक्‍ती तिला दिलेले कोणतेही काम करण्याचा सारखा कंटाळा करत असेल, तर तिला आपण आळशी म्हणतो.

स्वभावदोष दूर करण्यासाठी स्वयंसूचना द्या ! व्यक्‍तीच्या गुण व दोष या दोहोंचाही अंतर्भाव स्वभाववैशिष्ट्यामध्ये असतो. स्वभावातील दोषांमुळे व्यक्‍तीवर व तिच्या संपर्कात येणार्‍या व्यक्‍तींवर वाईट परिणाम होतो . स्वभावदोष दूर करण्यासाठी स्वत:च्या अंतर्मनात योग्य तो संस्कार रुजवणे आवश्यक असते. हा संस्कार रुजवण्यासाठी तसा विचार मनात सातत्याने करावा लागतो, याला स्वयंसूचना म्हणतात. यामध्ये आपण आपल्या बाह्यमनाने अंतर्मनाला आवश्यक त्या सूचना देतो. सूचना देणे म्हणजे सूचनेची वाक्यरचना मनातल्या मनात म्हणणे व त्यातील शब्दांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे. प्रत्येक स्वयंसूचना ५ वेळा म्हणावी. अशा दिवसातून पाच वेळा दोन ते तीन दोषांवर सूचना देऊ शकतो. सुरुवातीला कुलदेवतेचा किंवा आवडत्या देवतेचा नामजप करत मन एकाग्र करावे व मन एकाग्र झाले की मनामध्ये सूचनेची वाक्ये म्हणावीत. स्वभावदोषांची लक्षणे दाखवणारे काही प्रसंग, त्यामध्ये दिसून येणारे स्वभावदोष व त्यावरील सूचना यांची काही उदाहरणे आता आपण पाहू. स्वभावदोषांसंबंधी सूचना देतांना प्रसंग, व्यक्‍ती या सर्वांचा त्या सूचनेत विचार होणे आवश्यक असते. यामुळे ती देतांना प्रसंगानुरूप, व्यक्‍तीनुरूपच द्यावी.

स्वयंसूचना देण्याच्या पद्धती

स्वयंसूचना देण्याची पहिली पद्धत आहे. – `अयोग्य कृतीची जाणीव व तीवर ताबा'

या पद्धतीत दिलेल्या सूचनेच्या वाक्यरचनेमुळे अयोग्य विचार, भावना व कृती यांची व्यक्‍तीला जाणीव होते व त्यांच्यावर ताबा मिळवणे व्यक्‍तीला शक्य होते.
सूचनेची वाक्यरचना – `जेव्हा माझ्या मनात चुकीचे विचार किंवा भावना येतील किंवा माझ्या हातून चुकीची कृती घडत असेल, तेव्हा मला त्याची जाणीव होऊन ती थांबवता येईल.'

सौरभ गणिताचा अभ्यास करत असतांना दर २ मिनिटांनी इकडे-तिकडे पहात होता. मधेच भावाशी गप्पा मारत होता.

या प्रसंगात त्याचा दिसून येणारा स्वभावदोष – एकाग्रतेचा अभाव व विषयाचे गांभीर्य नसणे यासाठी सूचना कशी द्यायची हे आता आपण समजून घेऊ.

सूचना – सौरभच्या उदाहरणातील एकाग्रतेचा अभाव या दोषासाठी पुढीलप्रमाणे सूचना देऊ शकतो. `गणिताचा अभ्यास करत असतांना जेव्हा जेव्हा माझे मन विचलित होत असेल अथवा मी भावाशी वायफळ बोलत असेन तेव्हा ताबडतोब मला त्याची जाणीव होईल व माझे मन परत गणिताच्या अभ्यासावर एकाग्र करीन. गणिताचा अभ्यास गांभीर्याने करण्यासाठी `गणित या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत, हे मी लक्षात ठेवेन' अशा प्रकारची विषयाचे महत्त्व लक्षात आणून देणारी सूचनाही देऊ शकतो. या पद्धतीने सूचना कशा द्याव्यात याची आणखी काही उदाहरणे आपण पाहू.

स्वातीने शाळेतून घरी आल्यावर तिचे दप्‍तर व शाळेचा गणवेश बिछान्यावरच टाकला.

स्वभावदोष – अव्यवस्थितपणा

सूचना – `जेव्हा मी माझे दप्‍तर व शाळेचा गणवेश अव्यवस्थितपणे बिछान्यावर ठेवत असेन, तेव्हा मला त्याची जाणीव होईल व मी ते योग्य ठिकाणी व्यवस्थित ठेवेन.'

घरी ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा पोहोचलेल्या संदीपला त्याच्या वडिलांनी `कुठे गेला होतास ?, असे विचारले. तेव्हा त्याने वडिलांना रागावून उत्तर दिले.

स्वभावदोष – राग येणे व उद्धटपणा

सूचना – `जेव्हा वडील मला `कुठे गेला होतास ?', असे विचारतील, तेव्हा ते माझ्या भल्यासाठी विचारत आहेत, हे लक्षात ठेवून त्यांना मी शांतपणे व नम्रपणे उत्तर देईन.'

महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या तासिकेला शर्वरी `महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात मी कशा प्रकारे सहभाग घेऊ शकते, माझी वेशभूषा, केशभूषा कशी असेल ?, इत्यादी विचार करत होती.

स्वभावदोष – मनोराज्यात रमणे आपण एखादी कृती करत असतांना त्याच्या व्यतिरिक्‍त अन्य गोष्टींचा विचार करत असतो अथवा एकाच विचारप्रक्रियेत रमलेलो असतो, या स्वभावदोषाला मनोराज्यात रमणे असे म्हणतात. आपण सातत्याने अशा प्रकारचे विचार करत असतो, तेव्हा तो आपला स्वभावदोष बनून जातो.

सूचना – `महाविद्यालयात इंग्रजीचा तास सुरू असतांना जेव्हा मी स्नेहसंमेलनाच्या विचारांमध्ये रमलेली असेन, तेव्हा मला त्याची जाणीव होईल व मी त्वरित वस्तूस्थितीत येऊन शिकवल्या जाणार्‍या विषयाकडे लक्ष देईन.

आता आपण विविध प्रसंगांमध्ये मनात उमटणार्‍या प्रतिक्रियांविषयी विचार करू. प्रत्येक प्रसंगात व्यक्‍तीची काहीतरी प्रतिक्रिया होते. ती प्रतिक्रिया अयोग्य असेल किंवा योग्य असेल. अयोग्य प्रतिक्रिया स्वभावातील दोषांमुळे होते, तर योग्य प्रतिक्रिया स्वभावातील गुणांमुळे होते. सूचना दिल्यामुळे अयोग्य प्रतिक्रियेच्या ऐवजी योग्य प्रतिक्रिया होत राहिली, तर स्वभावातील दोषाच्या जागी गुण निर्माण होतो. दुसर्‍यावर टीका करणे, चिडचिडेपणा, रागीटपणा, भांडखोरपणा, हट्टीपणा, संशयी वृत्ती वगैरे दोष नाहीसे करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो.

विनयच्या वडिलांनी तो बराच वेळ बाहेर खेळत असल्यामुळे त्याला अभ्यास करण्यास सांगितले. तेव्हा त्याला वाईट वाटले. येथे विनयला वडिलांच्या बोलण्यामागे हेतू काय आहे, हे लक्षात आले नाही. तो बराच वेळ खेळत असल्यामुळे अभ्यास झाला नव्हता. तो पूर्ण करण्याची जाणीव त्याला वडिलांनी करून दिली. या उदाहरणात विनयचे वडील त्याला सांगतात, “आता खेळ पुरे झाला; अभ्यास कर बघू व त्यामुळे त्याला वाईट वाटते. अयोग्य प्रतिक्रियेऐवजी योग्य प्रतिक्रिया निर्माण व्हावी म्हणून विनय स्वत:ला पुढील सूचना देऊ शकेल. – `जेव्हा माझे वडील `आता खेळ पुरे झाला; अभ्यास कर बघू ' असे सांगतील, तेव्हा ते तसे का सांगत आहेत हे माझ्या लक्षात येईल व मी अभ्यास करायला सुरुवात करीन.'

अभिजितला शिक्षकांनी वर्गाचा वर्गप्रमुख होण्यास सांगितले. तेव्हा त्याच्या मनात `आपल्याला अभ्यास सांभाळून ते करणे कसे शक्य आहे ? एवढ्या मुलांना सांभाळणे आपल्या क्षमतेच्या पलीकडे आहे. वर्गातला दारासिंग असलेल्या सौरभने आपले ऐकले नाही, तर काय करायचे ? अशा अनेक प्रतिक्रिया आल्या व त्याने `मला ते जमणार नाही, असे सांगितले. येथे आत्मविश्‍वासाचा अभाव, तसेच भीती व दुसर्‍याचे न ऐकणे हे स्वभावदोष दिसतात. येथे शिक्षकांनी आपल्याला आपली क्षमता पाहूनच ते सांगितले आहे, तेव्हा आपण आज्ञापालन म्हणून त्यांना लगेच होकार देणे ही योग्य कृती होईल. यावर पुढीलप्रमाणे सूचना देऊ शकतो.- `जेव्हा शिक्षक मला वर्गाच्या वर्गप्रमुख पदाची जबाबदारी घ्यायला सांगतील, तेव्हा मी ती त्वरित स्वीकारेन व जबाबदारीमध्ये काही अडचण आल्यास वेळोवेळी शिक्षकांना विचारून घेईन.

आपल्याला परीक्षेला पेपर व्यवस्थित सोडवता येतील का, याची काळजी वाटणे; तोंडी परीक्षा, मुलाखतीला जाणे, वक्‍तृत्व स्पर्धेत लोकांसमोर भाषण करणे अशा प्रसंगांच्या वेळी भीती वाटणे, यासारख्या प्रसंगांमध्ये जेव्हा मनावर ताण येतो तेव्हा `प्रसंगाचा सराव करणे', ही पद्धत वापरतात. या पद्धतीत आपण कठीण प्रसंगाला यशस्वीरीत्या तोंड देत आहोत, असे विद्यार्थी नामजप करून कल्पना करतो. यामुळे मनात त्या प्रसंगाला तोंड द्यायचा एक प्रकारे सराव होत असल्याने प्रत्यक्ष प्रसंगाच्या वेळी मनावर ताण येत नाही.

उदा. विद्यार्थ्याच्या मनातील परीक्षेची भीती घालवण्यासाठी कशा प्रकारे सूचना देता येतील ते पाहू. प्रथम विद्यार्थ्याने एका खुर्चीत पाठ टेकून बसावे व डोळे मिटून ३ ते ४ मिनिटे कुलदेवतेचा किंवा आवडत्या देवतेचा नामजप करावा. शांत मनाने पुढील सूचनांकडे लक्ष द्यावे व सूचनांशी मनाने एकरूप व्हावे.

सूचना – `तुझी परीक्षेच्या सर्व विषयांची तयारी झाली आहे. उद्या परीक्षा आहे. आपल्या आजच्या विषयाची टाचणे तू भराभर चाळत आहेस. आता कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर चांगल्या प्रकारे लिहू शकेन, असे तुला वाटत आहे. तू परीक्षागृहात वेळेवर पोहोचलेला आहेस. पहिली घंटा वाजलेली आहे. आपल्या जागेवर बसून डोळे मिटून निर्विचार अवस्थेत तू शांत चित्ताने बसलेला आहेस. आता दुसरी घंटा वाजलेली आहे. तुझ्या हातात पेपर मिळाला आहे. प्रत्येक प्रश्‍न वाचून व गुण पाहून तू कोणते प्रश्‍न सोडवणार आहेस, याचा विचार केलेला आहेस. परीक्षेचे सर्व प्रश्‍न सोपे आहेत. तुझ्या प्रत्येक प्रश्‍नाची उत्तरे समाधानकारक लिहिली जात आहेत. शेवटची १० मिनिटे राहिल्याची बेल वाजत आहे. तू भराभर सर्व पाने चाळून सर्व प्रश्‍न बरोबर लिहिले आहेस का, याची खात्री करून घेतलेली आहेस. शेवटची घंटा वाजली आहे व तू आपला पेपर पर्यवेक्षकांच्या हातात आणून देत आहेस. तू आता घरी आला आहेस व घरातील सर्वांना पेपर सोपा गेला, असे सांगत आहेस. आता तू विश्रांती घेऊन उद्याच्या पेपरची तयारी करणार आहेस.' याच प्रकारे अन्य प्रसंगांची तयारी आपण करू शकतो. त्यामुळे या प्रसंगांना आत्मविश्‍वासाने सामोरे जाता येईल.

संकलक – श्री. यज्ञेश सावंत, पनवेल.