मुलांनो, मनाचे कार्य जाणून घ्या !

‘नमस्कार बालमित्रांनो, आपण नेहमी ‘माझ्या मनात हा विचार आला, मला मनातून असे वाटते, माझ्या मनात देशाविषयी प्रेम आहे’, असे शब्दप्रयोग करत असतो. आपण जे ‘मन’ म्हणून संबोधतो, ते मन म्हणजे नेमके काय असते ? त्याची रचना आणि कार्य कसे असते ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. हो ना ? या लेखातून आपण मन आणि मनाचे कार्य यांविषयी अधिक माहिती घेऊया.

१. मनाची रचना आणि कार्य

 

1354292956_Sanskar

मनाचे दोन भाग असतात. एक बाह्यमन आणि दुसरे अंतर्मन. अंतर्मन हे बाह्यमनापेक्षा ९ पट अधिक मोठे असते. दोन्ही मनांचे कार्य हे भिन्न असते. आपण जे विचार जाणीवपूर्वक करतो, ते विचार करण्याचे काम बाह्यमनाचे असते, उदा. विनोद झाल्यावर हसणे, आईस्क्रीम पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटणे, कारल्याची भाजी पाहिल्यावर ती आवडत नसल्यास ‘खाऊ नये’, असा विचार मनात येणे, हे विचार ज्या मनातून येतात, ते बाह्यमऩ.

२. अंतर्मनाचे कार्य

मित्रांनो, वर सांगितल्याप्रमाणे अंतर्मन हे बाह्यमनाच्या ९ पट मोठे असते. यावरून आपण समजू शकतो की, अंतर्मनाचे कार्य किती मोठे असेल ! आपल्या जडणघडणीमध्ये अंतर्मनाचा मोठा सहभाग असतो. आई-वडील, नातेवाईक, शेजारी, शिक्षक, समाज या सर्वांकडून कळात-नकळत मुलांच्या मनावर चांगले-वाईट संस्कार होतात, उदा. आई-वडील मुलांना ‘नेहमी खरे बोलावे’, असे शिकवतात; पण बाबांना दूरभाष आल्यावर ते मुलाला सांगतात, ‘मी घरी नाही, असे सांग.’ या वेळी त्या मुलावर नकळतपणे ‘कोणाला तरी टाळण्यासाठी खोटे बोलणे चालते’, असा संस्कार होतो. या वेळी ‘आपण मुलाला खोटे बोलण्यास शिकवत आहोत’, हे वडिलांच्या लक्षात येत नाही.

३. संस्काराचे केंद्र

अशा नकळत झालेल्या संस्काराची केंद्रे अंतर्मनात निर्माण होतात. ज्या संस्काराचे केंद्र मोठे असते, त्या संस्कारांचा प्रभाव मुलावर अधिक प्रमाणात दिसून येतो. असे कळत-नकळतपणे चांगले-वाईट संस्कार अंतर्मनावर झालेले असतात. त्यांच्यामुळेच मनामध्ये विचार येऊन ते वागण्या-बोलण्यातून व्यक्त होतात. जाणीवपूर्वक केलेल्या संस्कारांचा ठसा प्रथम बाह्यमनावर आणि कालांतराने अंतर्मनावर उमटतो; पण अजाणतेपणी म्हणजे नकळत झालेल्या संस्कारांचा ठसा थेट अंतर्मनावर उमटतो.

बालमित्रांनो, सद्गुण वाढवून आपले अंतर्मन निर्मळ करूया. आत्मपरीक्षण करून अंतर्मनातील गुण आणि दोष यांची यादी बनवूया !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !’