संतांची सर्वज्ञता


बालमित्रांनो, संत हे ईश्वराचे सगुण रूप असतात. त्यामुळे ईश्वराचे सर्व गुण त्यांच्यामध्ये आढळतात. या गोष्टीवर श्रद्धा असलेल्या भक्तांना याची प्रचीती अनेक वेळा आलेली असते; परंतु काही लोकांचा यावर विश्वास नसतो. अशा वेळी संत प्रतिदिन घडणाऱ्या घटनांमधून त्यांना याची जाणीव करून देतात आणि ईश्वराप्रती त्यांची श्रद्धा वाढवतात. दत्तअवतारी अक्कलकोटचे स्वामी श्रीसमर्थ यांनी एका मुलाला संत हे ईश्वराप्रमाणे सर्वज्ञ असतात, याची जाणीव कशी करून दिली, ते आपण पाहूया.

स्वामी समर्थ आपले भक्त श्री. चोळप्पा यांच्या आग्रहास्तव त्यांच्याकडे रहावयास गेले. एके दिवशी चोळप्पांचे घरी त्यांची मेहुणी आली होती. रात्री झोपतांना तिने आपली नथ अंथरुणावर ठेवून झोपली. चोळप्पांच्या पुतण्याने ते पाहिले. प्रतिदिन पहाटे उठून तो बागेत फुले आणावयास जात असे. त्या दिवशी जाते वेळी त्याने नथ हळूच पळवली. बाई सकाळी उठून पहाते तो नथ नाही. ती घाबरली आणि सर्वत्र शोधू लागली; पण नथ काही सापडली नाही. मोठ्या प्रयत्नाने तिच्या नवऱ्याने ती नथ नुकतीच केली होती. अक्कलकोटवासियांचे आरक्षक, वैद्य, ज्योतिष सर्व स्वामी श्रीसमर्थच होते. त्यामुळे इतरांप्रमाणे तीही स्वामी श्रीसमर्थ यांच्याकडे गेली. आपली नथ चोरीस गेल्याचे तिने रडत रडतच त्यांना सांगितले. स्वामी श्रीसमर्थ तिचे सांत्वन करत म्हणाले, ”रडू नकोस. शांत हो आणि माझ्याजवळ बैस. तुझी नथ तुला सापडेल.” बाईने आपले डोळे पुसले आणि ती स्वामी श्रीसमर्थ यांच्याजवळ बसली. एक घंटा गेला. पुन्हा एकदा ती स्वामी श्रीसमर्थांजवळ विनवणी करू लागली. तेव्हा ते म्हणाले, ”थांब जरा, तुझी नथ तुला मिळेल. घाबरतेस का ?”

थोड्या वेळाने चोरी करणारा मुलगा फुले देवळात ठेवून घरात आला. स्वामी श्रीसमर्थ त्याला पाहून म्हणाले, ”अरे, ती रडत आहे. तिची नथ तिला दे.” हे एकून तो मुलगा जरा चपापला; पण लगेचच स्वत:ला सावरून ‘कुठली नथ, मला काही ठाऊक नाही’ म्हणू लागला. त्यावर स्वामी श्रीसमर्थ एकदम संतापले. मोठ्या आवाजात ते म्हणाले, ”सकाळी अंथरुणाखालची नेलेली नथ तिला परत देऊन टाक.” स्वामी श्रीसमर्थ रागावलेले पाहून त्या मुलाने नथ गुपचुप काढून दिली.

बालमित्रांनो, संत सर्वज्ञ असल्याचे तुम्हाला या गोष्टीतून कळलेच असेल. संतांपासून काहीच लपून रहात नाही. चोरी करणे, खोटे बोलणे हे महापाप आहे. आपल्याला वाटते, ईश्वराला काही कळत नाही; पण तसे नसते. केलेले पाप केव्हाना केव्हा उघडकीस येतेच; म्हणून नेहमी सचोटीने रहावे.

Leave a Comment