गंगास्नानाने पावन होण्यासाठी यात्रेकरूंमध्ये खरा भाव आवश्यक !

एकदा काशीमधील मोठे तपस्वी शांताश्रमस्वामी यांचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याशी पुढील संभाषण झाले.

स्वामी : महाराज, इतके लोक काशीत गंगास्नान करूनही पावन का होत नाहीत ?

गोंदवलेकर महाराज : कारण त्यांच्यामध्ये खरा भाव नाही !

स्वामी (उत्तर न पटल्याने) : त्यांच्यात खरा भाव असल्याविना ते कसे येतील ?

गोंदवलेकर महाराज : ते लवकरच दाखवीन. नंतर चार दिवसांनी गोंदवलेकर महाराजांनी शांताश्रमस्वामींच्या हातापायांना चिंध्या गुंडाळून त्यांना महारोग्याचे रूप दिले आणि जेथे पुष्कळ लोक गंगास्नानासाठी उतरत, तेथे त्यांना नेऊन बसवले. महाराज स्वतः बैराग्याचा वेश धारण करून त्यांच्या शेजारी उभे राहिले.

काही वेळाने बरीच मंडळी जमली. बैरागी उपस्थितांना म्हणाला, ‘‘लोकहो, ऐका ! हा महारोगी माझा भाऊ आहे. गेल्या वर्षी आम्ही दोघांनी विश्वेश्वराची अत्यंत मनापासून सेवा केली. तेव्हा त्याने प्रसन्न होऊन भावाला वर दिला, ‘या गंगेमध्ये स्नान केल्यावर आपले पाप नाहीसे होऊन आपण शुद्ध झालो’, असा भाव असलेल्या यात्रेकरूने तुला एकदा आलिंगन दिले, तर तुझा रोग नाहीसा होईल.’ येथे आपण इतके जण आहात, कोणीतरी माझ्या भावावर एवढा उपकार करावा !’’ बैराग्याचे बोलणे ऐकून गर्दीतील ८-१० लोक पुढे सरसावले. त्या क्षणी बैरागी त्या लोकांना थांबवून म्हणाला, ‘‘क्षणभर थांबा ! विश्वेश्वराने पुढे असेही सांगितले आहे, ‘जो यात्रेकरू याला आलिंगन देईल, त्याला तो रोग लागेल; पण त्याने पुन्हा गंगेत स्नान केल्यावर त्याचा भाव शुद्ध असल्यामुळे तो रोगमुक्त होईल.’’ असे सांगितल्यावर सर्व जण निघून गेले; मात्र तेथील एका तरुण शेतकर्‍याने अधिक विचार न करता मोठ्या निष्ठेने शांताश्रमस्वामींना आलिंगन दिले. त्यानंतर लगेच गोंदवलेकर महाराजांनी स्वतःहून शेतकर्‍याला आलिंगन दिले आणि ते उद्गारले, ‘‘बाळ, तुझी काशीयात्रा खरी फळाला आली. तुझ्या जन्माचे कल्याण झाले, असे निश्चित समज !’’

शांताश्रमस्वामींना या सगळ्या प्रसंगाचा अर्थ आपोआपच कळला !’

संदर्भ : पू. बेलसरेलिखित ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय’