समर्थ रामदासस्वामींची क्षात्रवृत्ती दर्शवणारी कथा

१. महाराष्ट्रात अत्याचारी मोघल अधिकार्‍यांनी थैमान घालून धर्माचरण करणार्‍या हिंदूंना त्रास देणे

श्रीसमर्थ रामदासस्वामींचे शिष्य प्रचारकार्यासाठी सर्वत्र संचार करत होते. श्री शिवरायांचा नुकताच उदय होऊ लागला होता. महाराष्ट्रात जागोजागी अत्याचारी मोघल अधिकारी थैमान घालत होते. सातारा भाग विजापूरच्या अदिलशाहाच्या कह्यात होता. त्याचा एक मोघल ठाणेदार संगम माहुलीला रहात होता. हा ठाणेदार फार अत्याचारी होता. तो हिंदूंना फारच त्रास देत असे. तो नेहमी गरीब ब्राह्मण, गोसावी, बैरागी, संन्यासी यांना फार पीडा देत असे. त्याने ब्राह्मणांची स्नान-संध्या, होमहवन, यज्ञयाग बंद पाडले. पुराणे आणि कीर्तने बंद पाडली.

२. मोघल ठाणेदाराने प्रवचन करणार्‍या श्रीसमर्थशिष्य उद्धवस्वामी आणि त्यांच्या समवेतचे लोक यांना मारझोड करून अन्यायाने अंधारकोठडीत टाकणे

त्याच वेळी श्री समर्थशिष्य उद्धवस्वामी यांचा मुक्काम माहुलीस पडला. त्यांनी तेथे समवेतच्या मंडळीसह स्नान, संध्या, पूजाअर्चा चालू केली. कृष्णामाईच्या घाटावर प्रवचन चालू केले. ठाणेदाराला याची वर्दी मिळताच त्याने उद्धव गोसावींना पकडले. मारझोड केली आणि त्यांना त्यांच्या समवेतच्या चार लोकांसह अंधार कोठडीत टाकले. सर्व लोक घाबरून सैरावरा पळून गेले. समर्थांचा एक शिष्य मात्र संधी साधून पळाला.

३. शिष्यावरील अन्यायाच्या वृत्ताने रागाने लालबुंद होऊन समर्थ रामदासस्वामींनी अत्याचारी ठाणेदाराला सर्वांसमक्ष अर्धमेला होईपर्यंत चोपून काढणे

त्या वेळी श्री समर्थ चाफळला होते. शिष्य धावत पळत दुसर्‍या दिवशी सकाळी चाफळला आला. त्याने घडलेला सर्व वृत्तांत समर्थांना निवेदन केला. समर्थ रागाने लालबुंद झाले. त्यांचे डोळे आग ओकू लागले. त्यांनी कल्याणस्वामींकडून एक वेताची झणझणीत छडी मागून घेतली. ते आसनावरून ताडकन् उठून चालू लागले. त्या वेळी त्यांना अडवणार कोण ?

समर्थ न खाता-पिता चालले होते. सूर्यास्ताला एक घंटा अवधी असतांना ते माहुलीला पोहोचले. ते थेट ठाणेदाराच्या वाड्यात शिरले. ठाणेदार हुक्का ओढीत बसला होता. समर्थांनी एका झेपेत ठाणेदाराला मानगुट धरून खेचले आणि हातातील छडीने त्याला अर्धमेला होईपर्यंत झोडपावयास आरंभ केला. समर्थांनी त्याला भर रस्त्यावर आणले. छडीचे तडाखे चालूच होते. ठाणेदाराच्या किंचाळ्यांनी वातावरण भरून गेले. ठाणेदाराचे सेवक तोंडात बोटे घालून उभे होते. समर्थांची उग्र नरसिंह मूर्ती पाहून सारे भयभीत होते. ठाणेदाराला सोडवायचे सामर्थ्य कुणातही नव्हते.

४. श्रीसमर्थांचा दांडगा प्रभाव पडलेल्या ठाणेदाराने पाय धरून त्यांची क्षमा मागणे आणि कुराणावर हात ठेवून यापुढे कुणाचाही छळ करणार नाही वा अन्यायाने बाटवणार नाही, अशी शपथ घेणे

ठाणेदाराच्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. तो गयावया करून समर्थांच्या पाया पडला. अंधारकोठडीतील कैद्यांना प्रथम बाहेर काढ ! अशी श्री समर्थांनी गर्जना केली. ठाणेदाराने आपल्या चाकरांना आदेश दिला. अंधारकोठडी उघडण्यात आली. उद्धवस्वामी आणि समवेतच्या मंडळींनी येऊन समर्थांच्या पायावर लोटांगण घातले. ठाणेदारावर श्रीसमर्थांचा दांडगा प्रभाव पडला. त्याने समर्थांचे पाय धरून क्षमा मागितली. येथून पुढे कुणाचा छळ करणार नाही. भजन-कीर्तन-पुराण बंद पाडणार नाही आणि कुणालाही अन्यायाने बाटवणार नाही, अशी त्याने कुराणावर हात ठेवून शपथ घेतली.

५. कनवाळू समर्थांनी ठाणेदारास क्षमा करून त्याच्या मारावर औषधोपचारही करणे

इतके झाल्यावर श्रीसमर्थ रामदासस्वामींनी दयार्द्र अंतःकरणाने त्या ठाणेदारास क्षमा तर केलीच; पण त्याव्यतिरिक्त त्याला दिलेल्या मारावर त्यांनी स्वतः झाडपाल्याचे औषध लावून मलमपट्टीही केली. श्री समर्थ सर्व दिवस उपाशी आहेत, हे कळताच गावातील लोकांनी समर्थ आणि उद्धवस्वामी यांच्या, तसेच अन्य सर्व मंडळींच्या भोजनाची व्यवस्था केली.

६. समर्थांनी सर्वांशी समत्वाने वागावे, या विषयावर तेथे प्रवचन करणे

त्या रात्री श्रीसमर्थांनी माहुलीच्या घाटावर सर्व प्राणीमात्र भगवंताची लेकरे आहेत. सर्वांशी समत्वाने वागावे या सूत्रावर निरनिराळे दृष्टान्त आणि उदाहरणे देऊन सुश्राव्य प्रवचन केले. माहुलीची जनता तृप्त झाली.

– श्री. श्रीपाद मोकाशी (संदर्भ : मासिक धार्मिक, मार्च १९८५)

मित्रांनो, संत केवळ देवतांच्या तारकरूपाचीच नव्हे, तर वेळप्रसंगी आवश्यकतेनुसार मारक रूपाचीही साधना कशी करतात, याचेच हे उदाहरण आहे. जुलूम आणि अत्याचार होत असतांना कनवाळू संतही त्याचा प्रतिकार करतात, बघ्याची भूमिका घेत नाहीत, हा बोध घेऊन आपणही जागृत होऊन वैध मार्गाने अत्याचाराला प्रतिकार करायला हवा. देवाशी एकरूप होण्यासाठी भक्ताला त्याच्या तारक आणि मारक दोन्ही रूपांची उपासना करणे आवश्यक असते. काळानुसार तर आता क्षात्रधर्म साधनेचे महत्त्व अधिकच आहे.