ब्राह्मणाचे दारिद्र्य श्रीगुरुकृपेने गेले !


बालमित्रांनो, अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तगुरु यांचा तिसरा अवतार होय. त्यांनी अनेक भक्तांवर कृपा केली. त्यापैकी एक आहे, आजच्या गोष्टीतील गरीब ब्राह्मण.

श्रीगुरु भिलवडीहून कुरवपूर या क्षेत्री आले. कुरवपूरला पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम आहे. या क्षेत्राला दक्षिणकाशी असे म्हणतात. श्रीगुरु नित्य दुपारी अमरपुरात भिक्षेसाठी जात असत आणि खऱ्या भक्तांवर कृपा करत असत.

या अमरपुरात एक गरीब ब्राह्मण रहात होता. तो प्रतिदिन गावात भिक्षा मागत असे. जे मिळेल त्यात आनंदाने रहात असे. दारी येणाऱ्या अतिथींची तो पूजा करून त्यांना घरात जे असेल, त्याची भिक्षा वाढत असे. त्याची पत्नीसुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळया हाती परत पाठवत नसे. भिक्षान्न, अतिथीसेवा आणि ईश्वराचे भजन यांत ते मोठ्या सुखात होते.

एकदा श्रीगुरु त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले. ब्राह्मण भिक्षेसाठी बाहेर गेला होता. भिक्षा वाढावयास घरात काहीच नव्हते. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने श्रीगुरुंना आसन दिले. त्यांची पूजा केली; पण आता त्यांना भिक्षा काय वाढायची, याचा ती विचार करू लागली. घरात तर काहीच नव्हते. बराच विचार केल्यावर तिला एक युक्ती सुचली. तिच्या दारात एक घेवड्याचा मोठा वेल होता. त्याला पुष्कळ शेंगा आल्या होत्या. त्या ब्राह्मणाच्या बायकोने शेंगा काढल्या. त्याची भाजी केली आणि ती श्रीगुरुंना वाढली. श्रीगुरु प्रसन्न झाले. ‘तुझे दारिद्र्य गेले’, असा आशीर्वाद दिला आणि परत जातांना त्यांनी घेवड्याचे मूळ कापून टाकले.

श्रीगुरुंनी घेवड्याचे मूळ कापलेले पाहून ती बाई दु:खी झाली. ती रडू लागली. थोड्या वेळाने ब्राह्मण घरी परत आला. त्याला तिने सारा प्रकार सांगितला. तो ज्ञानी ब्राह्मण म्हणाला, ”श्रीगुरुंनी तुला आशीर्वाद दिला आहे. त्यावर विश्वास ठेव !”

घेवड्याचा वेल तर श्रीगुरुंनी कापला होता. आता तो सगळा उपटून टाकावा; म्हणून त्या ब्राह्मणाने कुदळ घेतली. घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास त्याने प्रारंभ केला आणि काय आश्चर्य! त्या वेलाचे मूळ उकरतांना त्या ब्राह्मणाला धनाचा एक हंडा सापडला ! ते पाहून त्या दोघांनाही फार आनंद झाला. ते दोघे श्रीगुरूंकडे गेले. त्यांची पूजा केली आणि घडलेली सारी गोष्ट त्यांना सांगितली.

बालमित्रांनो, अतिथीसेवा केल्याने आणि भक्तीभावाने दिलेल्या कोणत्याही गोष्टीने परमेश्वर संतुष्ट होतो, हे या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आले असेलच.