गुरूंसंदर्भातील श्लोक


न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः।
तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ।।

अर्थ : गुरुतत्त्व हे सर्वश्रेष्ठ तत्त्व आहे, गुरूंपेक्षा वरचढ दुसरे काही नाही. गुरुसेवा आणि गुरुभक्ती यांहून श्रेष्ठ असे दुसरे तप नाही. तत्त्वज्ञानापेक्षा दुसरे कोणतेही ज्ञान श्रेष्ठ नाही. अशा श्रेष्ठ सद्गुरूंना नमस्कार असो.


गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतम् ।
गुरोः परतरं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः।।

अर्थ : गुरु आदी म्हणजे प्रथमपासून आहे, सर्वांचे मूळ उगमस्थान आहे. पण गुरूंना स्वतःला दुसरे उगमस्थान नाही. गुरुतत्त्व स्वयंभू आहे. गुरुच परम दैवत आहे. गुरुंहून दुसरे श्रेष्ठ काही नाही. अशा श्रीगुरुंना माझा नमस्कार असो.


अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।।

अर्थ : अज्ञानरूपी अंधाराने अंध झालेल्या जीवाच्या नेत्रांत ज्याने ज्ञानस्वरूपी अंजन घालून दिव्य चक्षू उघडले आणि त्याला आत्मस्वरूपाचा महानिधि दाखविला त्या श्रीगुरुला नमस्कार असो.

गुरुपादाम्बुजं स्मृत्वा जलं शिरसि धारयेत् ।
सर्वतीर्थावगाहस्य संप्राप्नोति फलं नरः ।।
अर्थ : श्रीगुरुचरणकमलांचे स्मरण करून मस्तकावर पाणी ओतले असता म्हणजेच स्नान केले असता (चरणतीर्थ मस्तकी धारण केल्यास), सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ साधकाला मिळते. सद्गुरूंचे चरणतीर्थ निरंतर सर्व तीर्थांचे माहेर होय.

गुरोः पादोदकं पीत्वा
गुरोरुच्छिष्टभोजनम् ।
गुरुमूर्तेः सदा ध्यानं गुरुमन्त्रं सदा जपेत् ।।

अर्थ : गुरुचरणांचे तीर्थ प्राशन करून,गुर्वाज्ञापालन हेच उच्छिष्ट भोजन मानून, श्रीगुरुमूर्तीचे अंतरी सदैव ध्यान करत गुरूने दिलेल्या मंत्राचा सदा जप करावा.


गुरुमूर्तिं स्मरेन्नित्यं गुरुनाम सदा जपेत् ।
गुरोराज्ञां प्रकुर्वीत गुरोरन्यं न भावयेत् ।।

अर्थ : श्रीगुरुमूर्तीचे नित्य स्मरण करावे, गुरुनामाचा सदा जप करावा, श्रीगुरुची आज्ञा मनःपूर्वक कटाक्षाने पाळावी, गुरुखेरीज मनात
अन्य भावभावना ठेवू नये.


गुरुवक्त्रस्थितं ब्रह्म प्राप्यते तत्प्रसादतः ।
गुरोध्र्यानं सदा कुर्यात् कुलस्त्री स्वपतेर्यथा ।।

अर्थ : गुरु ब्रह्मरूप होय. गुरुमुखस्थित ब्रह्म हे गुरूंच्या कृपेनेच प्राप्त होते. म्हणून कुलीन स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीचे चिंतन करते त्याप्रमाणे गुरूंचे ध्यान, चिंतन सदा करावे.


गुकारस्त्वन्धकारश्च रुकारस्तेज उच्यते ।
अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः।।

अर्थ : ‘गु’ म्हणजे अज्ञानांधकार आणि ‘रु’ म्हणजे ज्ञानप्रकाश, तेज होय.अज्ञानाचा नाश करणारे सगुण ब्रह्म गुरुच होत ह्यात मुळीच संशय नाही.


कर्मणा मनसा वाचा नित्यमाराधयेद्गुरुम् ।
दीर्घदण्डं नमस्कृत्य निर्लज्जो गुरुसन्निधौ ।।

अर्थ : आचरणाने, मनाने, वाणीने सदैव गुरूंची आराधना करावी. गुरूंच्या समोर सर्व लाजलज्जा,लोकेषणा कडेला ठेवून दीर्घ साष्टांग
प्रणाम करावा.


शरीरमिन्द्रियं प्राणं सद्गुरुभ्यो निवेदयेत् ।
आत्मदारादिकं सर्वं सद्गुरुभ्यो निवेदयत् ।।

अर्थ : शरीर, इंद्रिये, प्राण ही सद्गुरूंना अर्पण करावीत. ममत्वाची आणि स्वामित्वाची भावना संपूर्णपणे त्यागावी आणि गुरूंना शरण जावे.


गुरोः कृपाप्रसादेन आत्मारामं निरीक्षयेत् ।
अनेन गुरुमार्गेण स्वात्मज्ञानं प्रवर्तते ।।

अर्थ : गुरूंच्या कृपाप्रसादाने आत्मारामाचे निरीक्षण करावे. ह्या गुरुमार्गानेच आपल्या स्वरूपाचे ज्ञान होते. आत्मज्ञान, आत्मबोध आणिआत्मसाक्षात्कारासाठी गुरूंचीच कृपा हवी.

Leave a Comment