ध्वनीप्रदूषण : कारणे आणि दुष्परिणाम

१. विविध प्रसंगात निर्माण होणारा ध्वनी (डेसिबलमध्ये)

१ अ. दोन माणसांतील संवाद: ३० ते ३५

१ आ. सहन करण्याजोगा ध्वनी: ५० ते ५५

१ इ. दिवाळीतील फटाक्यांचा ध्वनी: १४० ते १६०

२. ध्वनीप्रदूषण आणि नियम

२ अ. रात्रीच्या वेळी ध्वनीक्षेपक वापरावर उच्च न्यायालयाकडून बंदी !: रात्रीच्या वेळी ध्वनीक्षेपक वापरावर बंदी घालणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने दिला आहे. तसेच रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत समुद्र किनार्‍यावर किंवा मोकळ्या जागेत ध्वनीक्षेपक लावण्यास या आदेशाद्वारे बंदी घालण्यात आली आहे. (दैनिक गोवा टाइम्स, १२.७.१९९९)

३. ध्वनीप्रदूषण करणारे विविध घटक

३ अ. गाडीचे हॉर्न

३ अ १. एखाद्याला बोलावण्यासाठी हॉर्नचा अनावश्यक वापर होणे: सध्या कोणाला हाक मारण्याकरताही ५-७ मिनिटे नुसतेच गाड्यांचे हॉर्न वाजवणे चालू असते. आजूबाजूला वृद्ध, रुग्णाईत व्यक्ती, अभ्यास करणारे विद्यार्थी असतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या अयोग्य वर्तनाने आजूबाजूच्या लोकांना काय त्रास होतो, याचे भान ठेवायला हवे. – सुरेश देशपांडे, ठाणे. (दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २१.४.१९९९)

३ आ. इतरांच्या शांतपणे जगण्याच्या आणि झोपण्याच्या अधिकारावर आक्रमण करणारी कर्णकर्कश संगीताच्या ठेक्यात नववर्ष साजरा करण्याची स्पर्धात्मक पाश्चात्त्य संस्कृती !: नववर्षाचे स्वागत करतांना कर्णकर्कश संगीताच्या ध्वनीमुद्रिका आणि कानात दडे बसण्याएवढा मोठा नाद करणारे ध्वनीवर्धक वापरण्याची काहीच आवश्यकता नाही. एखाद्या साध्या ध्वनी-चकतीवर हे ऐकणे शक्य आहे. मंद स्वरातच संगीताचा खरा आस्वाद घेता येतो; परंतु संगीतापेक्षा इतरांचे आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचे. तू जास्त मोठा ध्वनी करतोस कि मी, याची स्पर्धा लावायची आणि इतरांच्या शांतपणे जगण्याच्या, तसेच झोपण्याच्या मूलभूत अधिकारावरही आक्रमण करायची संस्कृती पोसायची. आपण २१ व्या शतकात जात आहोत; परंतु आचाराने आपण पुराणकाळात वावरत आहोत, हेच खरे. – राम ना. गोगटे, वांद्रे, मुंबई. (दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २३.१२.१९९९)

४. ध्वनीप्रदूषणाचे दुष्परिणाम !

४ अ.ध्वनीप्रदूषणामुळे डोळ्यांची आग होणेे, कानात दडे बसणे, रक्तदाब वाढणे आणि हृदयविकाराच्या तक्रारी निर्माण होणे, अशा प्रकारचे त्रास होतात. शहरी वर्दळ, विसंबद्ध ध्वनी आणि गोंगाट म्हणजेच नागरी संस्कृती, असे समीकरण बनत गेल्याने शहरवासियांची पंचेंद्रिये आणि विशेषतः कर्णेंद्रिये निकामी होत आहेत.

४ आ.गरोदर स्त्रियांनाही गोंगाटाचा पुष्कळ त्रास होतो आणि मानसिक ताण वाढून संप्रेरकांचे प्रमाण वाढत जाते. साहजिकच अकाली प्रसूती होण्याचे प्रकार घडतात.

४ इ.ध्वनीप्रदूषणामुळे आजारी व्यक्तींना या काळात जगणे नकोसे होते. त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते. याकडे जनते इतकेच शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.

संदर्भ : दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २१.४.२००२