प्लास्टिकचा वापर विनाशाला कारणीभूत

शास्त्रज्ञांनी न गंजणारी, वजनाने हलकी अशी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे ‘प्लास्टिक’ हा पदार्थ बनवला खरा; पण तो टाकाऊ झाल्यावर त्याचा जिवाणूंमुळे र्‍हास होत नसल्याने तो नष्ट करता येत नाही.
त्यामुळे प्रदूषण होते. परत वापरात न आणता येणारे प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे आणि त्यांची विल्हेवाट लावायची कशी, ही समस्या जगभर चर्चिली जात आहे. प्लास्टिक उद्योगातून लक्षावधी लोकांना रोजगार मिळाला आहे, तरीही केवळ रोजगार निर्मितीचे साधन आहे म्हणून प्लास्टिकचा वापर चालू ठेवणे धोकादायक ठरेल.

१. जमीन नापीक होणे ! :
अ. ‘एका प्लास्टिक पिशवीचे विघटन होण्यात १०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी व्यय होतो. या काळात त्या प्लास्टिकचे विघटन होऊन मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक बाहेर पडतात. त्यामुळे त्या भागातील जमीन नापीक होण्याची प्रक्रिया चालू होते. – श्री. अरविंद जाधव, फोंडा, गोवा

आ. प्लास्टिकच्या पिशव्या जलाशयात जातात. हे प्लास्टिकयुक्त पाणी शेतीला दिले गेल्यास त्या भूमीच्या धारणक्षमतेवर, तसेच उत्पन्नावर परिणाम होतो.

२. पूर येणे : २६ जुलै २००५च्या मुसळधार पावसानंतर मुंबईत जो महाप्रलय आला, त्याला जी अनेक कारणे होती त्यांपैकी ‘प्लास्टिक पिशव्यांचा वापर’ हेही एक कारण होते. – श्री.मिलिंद मुरुगकर, महेश शेलार (लोकसत्ता, १०.२.२०११)

३. प्राण्यांच्या पोटात कचर्‍यातील प्लास्टिक जाऊन त्यांना आजार होणे यांसारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
सद्यस्थिती : प्लास्टिक पिशव्यांसंबंधी सरकारने एक दंडक (कायदा) संमत केला होता. त्यानुसार विशिष्ट आकाराच्याच पिशव्यांचीच निर्मिती करावी, असे बंधन उत्पादकांवर घालण्यात आले. मात्र मिळणार्‍या लाभामुळे या गोष्टीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून पर्यावरणाला घातक प्लास्टिकची निर्मिती निर्धोकपणे चालू आहे.
– श्री. अरविंद जाधव, फोंडा, गोवा

उपाय
१. घरातून निघतेवेळी सामान घेण्यासाठी प्रत्येकाने ज्यूटच्या पिशव्या, कापडी पिशव्या यांचा वापर करायचे ठरवले, तर हा प्रश्न ९० टक्के सुटू (कमी होऊ) शकतो. ‘प्लास्टिक’च्या सामानाचा न्यूनतम वापर करा. मंडई किंवा पेठेतून सामान आणतांना शक्यतो ते मोठ्या पिशवीतून आणा.
– (मासिक पत्रिका गीता स्वाध्याय, सप्टेंबर २०१०)

२. संयुक्त अरब अमिरात या देशात राबवलेल्या प्रभावी प्लॅस्टिक बंदी प्रक्रियेमुळे आणखी २ वर्षांत त्या देशात प्लास्टिक पिशव्या दिसणार नाहीत. (संदर्भ : दैनिक तरुण भारत, २२.१.२०११)

३. युरोप आणि अमेरिका येथे प्लास्टिकचा वापर या जनजागृतीतूनच न्यून झाला आहे. – श्री. मिलिंद मुरुगकर, महेश शेलार (लोकसत्ता, १०.२.२०११)